Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'Sulli Deals': मुस्लीम महिलांना 'ट्रोल' करण्यासाठी अॅपचा वापर, काय आहे हे प्रकरण?

Webdunia
गुरूवार, 8 जुलै 2021 (21:23 IST)
कीर्ती दुबे
"सोशल मीडियावरील लोकांसाठी सर्वांत सोपं काही असेल तर ते आहे महिलांना ट्रोल करणं. त्यातही जास्त ट्रोलिंग हे वैयक्तिकच असतं.
 
मात्र मुस्लीम महिलांना त्रास देताना नीचपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या जात आहेत.
 
हे सर्व एवढं वाईट आहे की, मी या प्लॅटफॉर्मवर का थांबलेय असंही वाटायला लागतं. मी आता लिहिणं-बोलणंही सोडावं की काय?
 
आम्हाला होणारी शिविगाळ आमच्या स्त्री अण्यावर तर हल्ला असतोच, पण ते इस्लामविरोधीही असतं."
 
नसरीन (नाव बदललेलं) जेव्हा हे बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये भीतीपेक्षाही रागाच्या भावना अधिक असतात.
 
समजा तुम्ही एकेदिवशी झोपेतून जागे झाला, तुमचे फोटो, खासगी माहितीसह टाकून इंटरटेनटवर तुमची बदनामी केली जात असेल. अथवा काही लोक तुमच्याबद्दल अश्लील बोलत असतील, याहून भयानक म्हणजे कोणी तुमचा लिलाव करत आहे, तुमच्यावर भाव लावत आहे तर तुम्हाला कसं वाटेल?
 
रविवारी आणि सोमवारी असंच काहीतरी घडलं. अनेक मुस्लीम महिलांच्या सोशल मीडियावरील फोटोंचा वापर करून एक ओपन सोर्स अॅप तयार करण्यात आलं. या अॅपचं नाव होतं - 'सुल्ली फॉर सेल'.
 
'सुल्ली' हा मुस्लीम महिलांसाठी वापरला जाणारा एक अपमानास्पद शब्द आहे.
 
या अॅपमध्ये वापरली जाणारी मुस्लीम महिलांची माहिती ही ट्विटरवरून घेण्यात आली होती. त्यात जवळपास 80 हून अधिक महिलांचे फोटो, त्यांची नावं आणि ट्विटर हँडल याची माहिती होती.
 
या अॅपमध्ये सर्वांत वर लिहिलं होतं - 'फाइंड युवर सुल्ली डील.'
 
याला क्लिक केल्यानंतर एका मुस्लीम महिलेचा फोटो, नाव आणि ट्विटर हँडल याची माहिती युझरला मिळत होती.
 
एडिटर गिल्डस ऑफ इंडियानंही मुस्लीम महिला, महिला पत्रकार यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा अशाप्रकारे वापर करून महिला पत्रकारांना घाबरवण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचं एडिटर गिल्ड्सनं म्हटलं.
 
मात्र, सोमवारी सायंकाळीच गिटहबनं ते हटवलं.
 
बीबीसीनं या प्रकरणी गिटहबशी ईमेल द्वारे संपर्क साधत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर गिटहबनं उत्तरं दिली. "आम्ही या प्रकरणी यूजरचं अकाऊंट डिलिट केलं आहे. रिपोर्ट्सच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गिटहबचं धोरण हे एखाद्याचा अपमान, भेदभाव आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या कंटेंटच्या विरोधात आहे. त्यामुळं हा कंटेंट आमच्या धोरणांचं उल्लंघन आहे," असं गिटहबनं म्हटलं आहे.
 
गिटहबच्या सीओओ एरिका ब्रेसिया यांनी याबाबत ट्विट अकाऊंट निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र हे सर्व घडलं कसं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
 
भीती आणि राग
नसरीन (नाव बदललेलं) या ऑनलाईन छळाच्या प्रकारानंतर एवढ्या घाबरल्या आहेत की, त्यांनी "माझं नाव लिहू नका, पुढे अजून काय होईल मला माहिती नाही," असं म्हटलं आहे.
 
ज्या मुस्लीम महिलांचे फोटो आणि खासगी माहिती या अॅपवर लिलावासाठी उपलब्ध करून दिली होते, त्यापैकी नसरीन एक आहेत.
 
बीबीसीबरोबर बोलताना नसरीन म्हणाल्या की, ''मला एका ट्विटद्वारे ही माहिती मिळाली. एका मुलीच्या स्क्रीनशॉटसह एका यूजरनं लिहिलं होते, मला चांगल्या डीलची अपेक्षा होती आणि मिळालं हे. यात माझी काहीही चूक नाही. ट्वीटमध्ये या यूझरनं या अॅपबाबत लिहिलं होतं.
 
'मी या अॅपवर गेले तेव्हा त्यावर लिहिलं होतं, 'फाइंड अ सुल्ली'.
 
मी त्यावर क्लिक केलं तर - 'युवर डील फॉर टुडे' बरोबर माझे फोटो आणि ट्विटर अकाऊंटची माहिती समोर आली.
 
हे पाहून मला भीतीपेक्षाही राग जास्त वाटला. कारण हे काही पहिल्यांदा घडलं नव्हतं.
 
यापूर्वी माझ्या ओळखीतील काही मुस्लीम महिलांचे फोटो शेअर करून एका ट्विटर युझरनं - 'फॉर सेल' असं लिहिलं होतं. पण काही क्षणातच मला भीती वाटली. यावेळी छळाची सीमा ओलांडली. आणखी पुढं काय होणार हेच कळत नव्हतं?"
 
"मुस्लीम महिला बोलल्या तर त्यांना बलात्काराच्या धमक्याही मिळतात. अशा प्रकारे त्यांना बाजारात विक्रीसाठी मांडलं जातं.
 
"तुम्ही मनानं कितीही ठाम असला तरी, अशाप्रकारचे हल्ले, तुमचे फोटो माहिती सार्वजनिक केली तर तुम्हाला त्याची भीती वाटते. त्याचा त्रास होतो. प्रथमच अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या अनेक मुलींनी तर कंटाळून अकाऊंट डिलिट करून टाकलं. त्यांना घाबरवण्यात आलं आहे," नसरीन सांगतात.
 
पण एवढा राग आणि भीतीनंतरही नसरीन पोलिसांत तक्रार करायला तयार नाहीत.
 
"या प्रकरणात अनेक महिला पीडित आहेत. यावर कायदेशीर पर्याय काय असू शकतो याचा विचार आम्ही करत आहोत. पण खरं म्हणजे मला पोलिसांकडून फार अपेक्षाच नाहीत. काही दिवसांपूर्वी ईदच्या वेळी माझ्या एका मैत्रिणीबरोबर असंच घडलं होतं. तिनं पोलिसांत तक्रारही केली होती. पण काहीही झालं नाही.
 
"मुस्लीम महिलांना काहीही बोलायचं आणि सहज त्यातून बाहेर पडायचं हे फार सोपं आहे," असं नसरीन पोलीस तक्रारीबाबत बोलताना म्हणतात.
 
ओपन सोर्स प्लॅटफॉर्म
बीबीसीनं अर्काइव्हच्या माध्यमातून हे अॅप शोधण्याचा प्रयत्न केला.
 
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 14 जूनला हे अॅप सुरू करण्यात आलं होतं. त्यावर सर्वाधिक हालचाली या 4-5 जुलैदरम्यान झाल्या.
 
हे एक ओपन सोर्स कम्युनिटी अॅप होतं. सॉफ्टवेअर कोडिंग प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म गिटहबवर ते तयार करण्यात आलं होतं.
 
बीबीसीनं एका कोडरच्या माध्यमातून नेमकं ओपन सोर्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय? आणि ते कसं काम करतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
 
ओपन सोर्समध्ये कोड सार्वजनिक केला जातो. त्यात वेग-वेगळ्या कम्युनिटीचे कोडर कोडद्वारे नवे फिचर जोडू शकतात किंवा एखादा बग असल्यास तो हटवू शकतात.
 
मात्र कोडच्या माध्यमातून केले जाणारे हे बदल अॅपमध्ये दिसणार की नाही, याचं नियंत्रण अॅप डिझाईन करणाऱ्यांकडं असतं.
 
जर अॅप डिझाईन करणाऱ्यांकडून ते डिलिट झालं तर डोमेन नेम सिस्टम प्रोव्हाइडरकडं त्याची माहिती उपलब्ध असते.
 
'सुल्ली फॉर सेल' अॅप आता गिटहबवर नाही. तसंच ते नेमकं कोणी डिझाईन केलं होतं, याचीही माहिती मिळू शकलेली नाही.
 
'हा प्रकार भयावह आहे, हिंदुंनीही आमच्यासाठी आवाज उठवायला हवा'
फराह खान (नाव बदललेलं) त्यांच्या कामाच्या निमित्ताने बाहेर होत्या, त्यावेळी त्यांच्या मित्रांकडून त्यांना या अॅपचा स्क्रीनशॉट मिळाला.
 
"पाच जुलैला सकाळी माझ्या मित्रांनी सांगितलं की, माझे फोटो एका वेबसाईटवर आहेत. आता फोटो हटवण्यात आले आहेत आणि प्लॅटफॉर्मही बंद करण्यात आला आहे. पण अशाप्रकारे फोटोबरोबर 'फॉर सेल' चा टॅग पाहून मी खूप तणावात आले होते. नेमकं काय होत आहे, हेच मला कळत नव्हतं,'' असं त्या सांगतात.
 
"माझ्या मनात आणखी भीतीदायक विचार येऊ लागले. त्यांच्याकडे माझ्याबद्दल आणखी काही माहिती असेल का? आणखी कुठं तरी ते माझ्याबाबत माहिती सार्वजनिक तर करणार नाही? अशी भीती मला वाटत होती.
 
हा विचार करून करून मी घाबरले होते. पण नंतर मला वाटलं की, त्यांनाही हेच हवं आहे. ज्या मुस्लीम महिला हक्कासाठी बोलतात त्यांनाही घाबरवायचं आहे. "
 
"या लढ्यात मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते. ती म्हणजे या प्रकरणी उदारमतवादी विचारसरणी असलेल्या हिंदुंनीही चुकीच्या गोष्टीसाठी बोलायला हवं.
 
धर्माचा विचार न करता समोर येऊन चुकी ला चूक म्हणायला हवं. मी आणि माझ्यासारख्या अनेक महिलांनी ट्वीट केले. महिला आयोग, दिल्ली पोलिसांना टॅग केलं पण कोणीही दखल घेतली नाही. असं करणाऱ्यांना पोलीस आणि कायद्याची भीती नाही. काहीही होणार नाही, याची त्यांना खात्री आहे. "
 
नसरीनप्रमाणेच फराहलादेखील पोलिसांत तक्रार दाखल करण्याबाबत शंका आहे.
 
"मी सध्या कामाच्या निमित्ताने बाहेर आहे. तसंच पोलिसांत तक्रार करायची की नाही, हेही मी अद्याप ठरवलेलं नाही," असं त्या म्हणतात.
 
पण काही महिलांनी या छळाच्या विरोधात दिल्ली महिला आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे.
 
मुंबई पोलिसांनी गिटहब आणि ट्विटरकडे मागितली माहिती
अॅपमध्ये ज्या महिलांची माहिती जाहीर करण्यात आली आहे, त्यापैकी काही दिल्ली आणि काही इतर शहरांतील आहेत.
 
आम्ही याबाबत दिल्ली पोलिसांशी संपर्क केला पण काहीही उत्तर मिळालं नाही. दिल्ली महिला आयोगानं पोलिसांना नोटिस बजावत या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
 
एक तक्रार मुंबई पोलिसांतही दाखल करण्यात आली आहे.
 
या अॅपद्वारे छळाच्या बळी ठरलेल्या मुंबईच्या राहाणाऱ्या फातिमा यांनी 5 जुलैला साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
त्यावर कारवाई करत साकीनाका पोलिसांनी ट्विटर इंडिया आणि गिटहबला पत्र लिहून अॅप तयार करणाऱ्या आणि त्याला ट्विटरवर शेअर करणाऱ्यांबाबत माफी मागितली आहे.
 
गिटहबकडे पोलिसांनी आयपी अॅड्रेस, लोकेशन आणि अॅप कधी तयार झाले याची माहिती मागितली आहे. तसंच अॅप तयार करण्यासाठी वापरला जाणारा ईमेल आयडी आणि फोन क्रमांकही मागितला आहे.
 
त्याशिवाय ट्विटरवरून काही आक्षेपार्ह ट्वीट डिलिट करणाऱ्यांचा आणि ते हँडल वापरणाऱ्यांचा डेटाही मागवला आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

पुढील लेख