Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूरचा 'तांबडा-पांढरा' रस्सा मॅंचेस्टरला पोहोचतो तेव्हा...

कोल्हापूरचा 'तांबडा-पांढरा' रस्सा मॅंचेस्टरला पोहोचतो तेव्हा...
- ओंकार करंबेळकर
'चक्कीत जाळ' काढणारा 'तांबडा पांढरा' रस्सा, कांदा-लिंबाची फोड आणि जोडीला भाकरीबरोबर 'सुक्कं' मटण. हे भन्नाट कोल्हापूरी कॉम्बिनेशन कोल्हापूर-महाराष्ट्रापाठोपाठ सगळ्या भारतभर पोहोचलंय. पण कोल्हापूरच्या एका माणसानं 'तांबडा-पांढरा' थेट इंग्लंडमध्ये मॅंचेस्टरला नेऊन ठेवलाय.
 
हे आहेत कोल्हापूरचे प्रदीप नाळे. प्रदीप आणि त्यांचे मित्र देवांग गोहिल मॅंचेस्टरमध्ये गेली अनेक वर्षे 'झिया' नावाचं रेस्टॉरंट चालवतात.
 
स्वातंत्र्यानंतर भारतातून अनेक लोक इंग्लंडमध्ये गेले. काही वर्षांनी अफ्रिकेतूनही गुजराती लोक इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाले.
 
इतकी भारतीय माणसं आल्यावर साहजिकच तिथं भारतीय हॉटेलंही सुरू झाली. पण भारतीय हॉटेल म्हणजे तिथं फक्त पंजाबी जेवण मिळतं. नाही म्हणायला काही साऊथ इंडियन हॉटेलांनी आपलं सांबार-रसम, इडली-वडे तिकडे नेले आहेत. पण प्रदीप नाळे यांनी मात्र आपल्या कोल्हापूरी जेवणाचं हॉटेल सुरू केलं.
 
कोल्हापूरमध्ये शिकत असताना प्रदीप नाळे यांनी तिथल्या अयोध्या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नाईट ड्यूटी करायला सुरूवात केली.
 
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं सकाळी कॉलेज आणि रात्री नोकरी असा त्यांचा क्रम सुरू झाला. पण या इथेच त्यांची आणि हॉटेल व्यवसायाची पहिली ओळख झाली. त्यानंतर हॉटेल इंडस्ट्री त्यांच्या आयुष्याचा कायमचा भाग बनली.
 
पुण्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण झाल्यावर प्रदीप केनियामधल्या नैरोबीमध्ये नोकरी करू लागले.
 
तिथं तीन वर्षांचा अनुभव आल्यावर त्यांनी कोल्हापुरात हॉटेल चालवायला घेतलं. कोल्हापुरात राहताना त्यांनी अस्सल कोल्हापुरी जेवण शिकून घेतलं.
 
त्यानंतर त्यांना दुबईमध्ये एका हॉटेल कंपनीत 5 वर्षांसाठी काम करायची संधी मिळाली आणि शेवटी त्यांनी इंग्लंडमध्ये पाऊल ठेवलं. वर्क परमिट मिळाल्यावर त्यांनी देवांग गोहिल यांच्याबरोबर रेस्टॉरंट सुरू केलं.
 
प्रदीप म्हणतात, "इंग्लंडमधील सुरुवातीची सगळी 'इंडियन' हॉटेलं ही इंडियन लोकांची नसून ती बांगलादेशी, पाकिस्तानी किंवा अफगाणी लोकांची होती. ते भारतीय लोकांच्या नावावर व्यवसाय करत होते. आमचं हॉटेल मॅंचेस्टरच्या ज्या रस्त्यावर आहे तिथं शंभरेक इंडियन रेस्टॉरंट्स असतील पण भारतीय मालक, भारतीय शेफ असलेलं आमचं एकमेव इंडियन हॉटेल आहे."
 
पण तुम्हीसुद्धा फक्त पंजाबी जेवणावरच का थांबला नाहीत असं विचारल्यावर प्रदीप म्हणतात, "वेगळं काहीतरी करायचं ठरवल्यावर मग कोल्हापुरी पदार्थच का ठेवू नयेत असा विचार आम्ही केला. त्यात कोल्हापुरातल्या जेवणाची चव माझ्या तोंडावर होतीच. मग आम्ही तांबडा-पांढरा रस्सा, साबुदाणा वडा, मटण, मिसळ, कोथिंबिर वडी असे पदार्थ द्यायला सुरुवात केली."
 
हे सांगताना प्रदीप "आमचा बटाटेवडा पुण्या-मुंबईसारखा लहानसा नसतो, कोल्हापुरात मिळतो तसा चांगला मोठ्ठा असतो", असं सांगायला विसरत नाहीत.
 
"इंग्लंडमधल्या लोकांना आम्ही जे घरात खातो तेच हॉटेलमध्ये विकणार आहोत हे सांगितलं. तशी त्यांची खात्रीही पटवून दिली.
 
हे अस्सल भारतीय, त्यातही मराठी आणि कोल्हापूरचं जेवण मिळतंय याची खात्री झाल्यावर लोक यायला लागले आणि आमचं हॉटेल प्रसिद्ध झालं," असं प्रदीप सांगतात.
 
तांबडा-पांढरा आणि इतर प्रकारचे पदार्थ तयार करताना प्रदीप यांना त्यांची बहीण आणि वहिनीची मोठी मदत झाली असं ते सांगतात.
 
लोकांना कोल्हापूरात मिळतात तसेच पदार्थ मिळावेत म्हणून ते स्वतः मसाल्याची निवड करतात. स्वतः मसाल्याचे पदार्थ आणून त्यांचं मिश्रण तयार करतात.
 
"घरामध्ये कोणताही पदार्थ केला की यात काय घातलंय, कोणता मसाला घातलाय असं प्रदीप विचारतात आणि ते शिकून घेतात आणि कोणतीही नवी गोष्ट शिकले की आम्हालाही शिकवतात", असं त्यांच्या वहिनी अश्विनी नाळे सांगतात.
 
इंग्लंडमध्ये फक्त भारतीय लोक तांबडा-पांढरा खायला येतात असं नाही तर इतर पर्यटकही आपल्याकडंचं जेवण आवडीनं खातात असं ते सांगतात.
 
ते म्हणतात, "मध्यंतरी पुण्याची काही मुलं मॅंचेस्टरमध्ये राहात होती. ती वेळ काढून दर आठवड्याला मिसळ खायला यायची."
 
प्रदीप यांनी 'भोजनालय डॉट कॉम' नावानं एक कंपनी सुरू केली आहे. इंग्लंडसह युरोपात आता 'विगन' म्हणजे पूर्ण शाकाहारी अन्न खाण्याचा ट्रेंड आला आहे. या आहारात कोणताही प्राणीजन्य पदार्थ अगदी दूधही त्याज्य मानलं जातं. विगन आहाराचं एक नवं हॉटेल सुरू करण्याचा विचार प्रदीप नाळे यांनी केला आहे, लवकरच ते सुरू होईल असं ते सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे ? खरे की खोटे