Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस : दोन देशांची खरंच तुलना होऊ शकते का?

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (14:32 IST)
क्रिस मॉरिस आणि अँथनी रुबेन
कोरोना व्हायरसच्या भारतातल्या रुग्णसंख्येने चीनची आकडेवारी ओलांडलेली आहे. चीनमध्ये हा आकडा सुमारे 85 हजारांवर मंदावला आहे, तर भारतात 19 मे रोजी एकूण रुग्णसंख्या ही लाखावर पोहोचली आहे.
 
सध्या अमेरिकेत सुमारे 15 लाख रुग्ण आहेत. त्याखालोखाल रशिया, युनायटेड किंगडम, ब्राझील, स्पेन आणि इटलीमध्ये दोन लाखांहून जास्त रुग्ण आहेत.
 
पण वेगवेगळं वातावरण, भौगोलिक परिस्थिती, आरोग्य व्यवस्था असलेल्या या विविध देशांमध्ये एकाच रोगाबाबतची अशी तुलना करावी का?
 
आपला देश कोरोना व्हायरसची परिस्थिती कशाप्रकारे हाताळतोय हे दुसऱ्या देशाच्या परिस्थितीकडे पाहून ठरवण्याचा प्रयत्न सगळ्यांनाच करायचा आहे. पण अशावेळी खरंच समान गोष्टींची तुलना केली जाते का?
 
उदाहरणार्थ, 18 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये कोव्हिड 19मुळे आतापर्यंत इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत. अमेरिकेतल्या मृत्यूंची संख्या 90,000 पेक्षा जास्त झालेली आहे. पण अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटींपेक्षा जास्त आहे.
 
पश्चिम युरोपातले पाच देश - युके, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या सगळ्यांची लोकसंख्या मिळून जवळपास 32 कोटी आहे. आणि 18 मेपर्यंत या पाच देशांतल्या कोरोना व्हायरसच्या मृत्यूंची संख्या 1,30,000 पेक्षा जास्त होती, म्हणजे अमेरिकेच्या आकडेवारीपेक्षा 50% जास्त.
 
अमेरिकेत मृत्यूंचा आकडा झपाट्याने वाढतोय, पण फक्त आकडेवारीवरून निष्कर्ष काढता येणार नाही.
 
तुलना करताना दोन मुद्दे ढोबळमानाने लक्षात घेणं गरजेचं असल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गचे डेटा सायन्सचे प्राध्यापक रोलंड काओ सांगतात.
 
"या आकडेवारीवरून सारखेच अर्थ निघतात का? साथ ज्या भागात पसरली तिथली परिस्थिती वेगवेगळी असताना दोन आकड्यांची तुलना करणं योग्य आहे का?"
 
फक्त आकडेवारीवरून युरोपातल्या कोणत्या देशात सगळ्यात भीषण परिस्थिती आहे हे ठरवणं हे 'पूर्णपणे चुकीचं' असल्याचं केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक सर डेव्हिड स्पिगलहॉल्टर यांनी 10 मे रोजी बीबीसीच्या अँड्रयू मार शोमध्ये म्हटलं होतं.
 
मृत्यूंची आकडेवारी
दोन देशांची तुलना करणं कठीण का आहे? सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोव्हिड-19मुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद करण्याची प्रत्येक देशाची पद्धत वेगवेगळी आहे.
 
उदाहरणार्थ, फ्रान्स आणि जर्मनी त्यांच्या रोजच्या आकडेवारीमध्ये 'केअर होम्स'मध्ये होणाऱ्या मृत्यूंचाही समावेश करतात. पण 29 एप्रिलपर्यंत इंग्लंडमध्ये फक्त हॉस्पिटलमध्ये झालेले मृत्यू दाखवण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी या आकडेवारीमध्ये 'केअर होम्स' मध्ये होणाऱ्या मृत्यूंचा समावेश करायला सुरुवात केली.
 
शिवाय मृत्यूंची मोजदाद करण्याबाबत आणखी एक अडचण म्हणजे मृत्यूंची मोजदाद कशी करावी वा मृत्यूंची कारणं कोणती असावीत, यासाठी कोणतंही आंतरराष्ट्रीय प्रमाण ठरवण्यात आलेलं नाही.
 
म्हणजे ज्यांची कोरोनाची चाचणी झाली होती, त्यांचाच या आकडेवारीत समावेश करायचा, की ज्यांना संसर्ग झाल्याचा डॉक्टरांना संशय आहे, त्यांचाही आकडेवारीत समावेश करायचा?
 
केअर होममध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तरच जर्मनीमध्ये या मृत्यूचा समावेश कोरोनाच्या आकडेवारीत केला जातो. पण या उलट बेल्जियममध्ये डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याचा संशय असेल तर त्याचाही समावेश केला जातो.
 
युकेमध्ये एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तरच त्या मृत्यूचा समोवश रोजच्या आकडेवारीत केला जातो. पण दर आठवड्याला जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत मात्र संशयित केसेसचाही समावेश करण्यात येतो.
 
यासंबंधीची आणखी एक शंका म्हणजे रुग्णाच्या मृत्यूचं मुख्य कारण कोरोना व्हायरस असायला हवा का, की मृत्यच्या दाखल्यावरचा उल्लेखही यासाठी पुरेसा आहे?
 
या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर खरंच समान गोष्टींची तुलना आपण करतोय का?
 
मृत्यूदर
मृत्यूदरावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. पण हा दर काढण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत.
 
पहिली पद्धत - संसर्गाची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या आणि झालेले मृत्यू याचं प्रमाण. म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी किती जणांचा मृत्यू होतो?
 
पण प्रत्येक देशामध्ये सध्या विविध प्रकारे लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. युकेमध्ये या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याइतपत रुग्ण नव्हते. अशावेळी मृत्यूंचा आकडा वा दर हा जास्त प्रमाणात चाचण्या करणाऱ्या देशापेक्षा जास्त वाटू शकतो.
 
एखाद्या देशात जितक्या जास्त प्रमाणात लोकांच्या चाचण्या करण्यात येतात, तितके जास्त सौम्य लक्षणं आढळणारे वा अजिबात लक्षणं न आढळणारे रुग्ण आढळतात. म्हणूनच लागण झाल्याची खात्री झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यू दर आणि एकूण मृत्यूदर समान नसतो.
 
मृत्यूंचा दर ठरवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे - देशाच्या लोकसंख्येशी मृत्यूच्या आकडेवारीची तुलना. म्हणजे उदाहरणार्थ दर दहा लाखांमागे किती जणांचा मृत्यू झाला हे तपासणं.
 
पण एखादा देश विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या कोणत्या टप्प्यावर आहे याचा यावर मोठा परिणाम होईल. समजा जगामध्ये या साथीची सुरुवात झाली तेव्हा या देशात पहिला मृत्यू झाला असेल तर मग या देशातला मृत्यूंचा आकडा वाढण्यासाठी दरम्यान मोठा काळ गेलेला असेल.
 
इतर देशांमध्ये 50व्या मृत्यूंनंतर काय परिस्थिती आहे यावरून युके सरकार देशांची तुलना करतं. पण या पद्धतीतही काही अडचणी आहेत.
 
50 मृत्यूंचा आकडा उशिरा गाठणाऱ्या देशाला व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आणि एकूणच मृत्यूंची संख्या कमी असावी यासाठी प्रयत्न करायला वेळ मिळालेला असतो.
 
शिवाय अशा प्रकारची तुलना करताना हे देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग होणाऱ्यांपैकी बहुतेकजण बरे होतात.
 
राजकीय बाबी
ज्या देशांमध्ये अधिक सक्त राजकीय यंत्रणा आहे, अशांच्या आकडेवारीवर पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे.
 
चीन किंवा इराणमध्ये कोरोना व्हायरसची नोंदवण्यात आलेली आतापर्यंतची आकडेवारी अचूक आहे का? याचं उत्तर आपल्याकडे नाही.
 
चीनमध्ये दर 10 लाखांमागे किती जणांचा मृत्यू झाला, यावरून मृत्यू दर ठरवण्यात आला. पण वुहानमधल्या मृत्यूंचा आकडा 50 टक्क्यांनी वाढवल्यानंतरही चीनची एकूण आकडेवारी अतिशय कमी आहे.
 
मग अशावेळी या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा का?
 
लोकसंख्या
प्रत्येक देशाची लोकसंख्या अतिशय वेगवेगळी आहे. शिवाय या लोकसंख्येची वैशिष्ट्यं - डेमोग्राफी (Demography) वेगळी आहे. म्हणजे सरासरी वयोमान काय, लोकं कुठे राहतात इत्यादी.
 
युके आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये तुलना करण्यात आली. पण यात अडचण आहे. आयर्लंडमधल्या लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. आणि तिथली मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागांमध्ये राहते.
 
त्यामुळेच दोन संपूर्ण देशांची तुलना करण्यापेक्षा डब्लिन शहर आणि त्याच आकाराची युकेमधील एखादी शहरी काऊंटी यांची तुलना करणं जास्त योग्य ठरेल.
 
अशाच प्रकारे लंडनची तुलना अमेरिकेचं सगळ्यांत मोठं 'ग्लोबल हब' असणाऱ्या न्यूयॉर्कशी करणं पूर्णपणे योग्य नसलं, तरी त्यातल्या त्यात जवळचं ठरेल.
 
तुलना करता तिथला वयोगटही समान आहे ना, हे तपासणंही गरजेचं आहे.
 
युरोपातल्या देशांमधला मृत्यू दर आणि आफ्रिकेतल्या देशांतल्या मृत्यूंचा दर याची तुलना करून चालणार नाही. कारण आफ्रिकेतल्या देशांमधल्या तरूण लोकसंख्येचं प्रमाण तुलनेने जास्त आहे.
 
आणि कोव्हिड 19 मुळे वयाने जेष्ठ असणाऱ्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
 
आरोग्य यंत्रणा
युरोप आणि आफ्रिकेतल्या तुलनेबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपातल्या आरोग यंत्रणा या आफ्रिकेतल्या बहुतेक देशांपेक्षा जास्त आर्थिक पाठबळावर उभ्या आहेत.
 
कोरोना व्हायरसचा देशात किती प्रादुर्भाव आहे, आरोग्य यंत्रणा कशी आहे याचाही परिणाम आकडेवारीवर होतो. शिवाय या देशामध्ये सोशल डिस्टंन्सिंग कितपत पाळलं जातंय, विविध संस्कृती याच्याशी कसं जुळवून घेतात, हे देखील महत्त्वाचं आहे.
 
साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा महत्त्वाची असली, तर प्रत्येक देशात ती वेगवेगळी आहे.
 
"लोक स्वतःहून उपचार घ्यायला पुढे येतात का, हॉस्पिटलमध्ये पोहोचणं किती सोपं आहे, चांगले उपचार घेण्यासाठी खर्च करावा लागणार का? या गोष्टी जागेनुसार बदलतात," युनिव्हर्सिटी ऑफ साऊदम्पटनचे प्राध्यापक अँडी टाटेम सांगतात.
 
'Comorbidity' म्हणजे रुग्णाला असणाऱ्या डायबिटीज, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या व्याधींचा परिणाम शरीरावर होणं. एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्यापूर्वी हे आजार असू शकतात. त्यामुळे परिस्थिती अवघड होऊ शकते.
 
टेस्टिंग
साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ज्या देशांनी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं, म्हणजेच रोगाच्या चाचण्या केल्या आणि नंतर 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'च्या मदतीने संसर्ग झालेल्यांचा शोध घेतला, अशा देशांना रोगाचा प्रसार रोखण्यात आजवर सर्वात जास्त यश मिळालेलं आहे.
 
कोव्हिडची सर्वांत जास्त लागण झालेल्या देशांच्या तुलनेत जर्मनी आणि दक्षिण कोरियामध्ये कमी मृत्यू झालेले आहेत.
 
एकूण लोकसंख्येपैकी किती जणांची चाचणी करण्यात आली याची आकडेवारी कमी मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी उपयोगी पडू शकते.
पण इथेही, सगळ्याच ठिकाणचा चाचण्यांची आकडेवारी सारखी नाही. काही देशांमध्ये किती लोकांची चाचणी करण्यात आली याची नोंद करण्यात येते. तर इतर देशांमध्ये एकूण किती चाचण्या करण्यात आली याची नोंद करण्यात येते. (योग्य निकाल मिळावा यासाठी अनेक लोकांची एकापेक्षा जास्त वेळा चाचणी करावी लागते.)
 
शिवाय ही चाचणी कुठे करण्यात आली, कधी करण्यात आली, हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर करण्यात आली याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे.
 
जर्मनी आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी साथीच्या अगदी सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या. यातून त्यांना हा व्हायरस कसा पसरतोय याविषयीची माहिती मिळाली. पण इटलीमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येऊनही मृत्यूंचं प्रमाण तुलनेने जास्त होतं. कारण साथीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरच इटलीमध्ये चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं होतं. युकेतही हेच करण्यात येतंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख