Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जमिनीच्या वादातून महिला तहसीलदाराला जिवंत जाळलं: तेलंगणातील धक्कादायक घटना

Webdunia
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (11:05 IST)
जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यानं तहसीलदाराला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली.
 
तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूरमेट विभागाच्या तहसीलदार विजया रेड्डी या सोमवारी (4 नोव्हेंबर) दुपारी त्यांच्या चेंबरमध्ये होत्या. तेव्हा ही भयंकर घटना घडली. त्यात तहसीलदार विजया रेड्डी यांचा मृत्यू झाला.
 
अब्दुल्लापूरमेट विभागाच्या गोरेल्ली गावातील सुरेश नावाच्या शेतकऱ्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सुरेश तहसील कार्यालयात आला. तहसीलदार चेंबरमध्ये येताच दार पेटवून दिलं आणि विजया यांनाही पेटवलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेत सुरेशसह तहसीलदार विजया यांचा चालक आणि अन्य एक व्यक्ती भाजली आहे.
 
जखमींना हयातनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
घटनेची माहिती मिळताच रंगरेड्डीचे जिल्हाधिकारी, राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत आणि पोलीस उपायुक्त सनप्रीत सिंग यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत तहसीलदाराचं पूर्ण नाव पुट्टा विजया रेड्डी असं होतं. त्यांचे पती सुभाष रेड्डी हे पदवी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत.
 
विजया रेड्डी मूळच्या नालगोंडा जिल्ह्यातील मुनीक्कोडू मंडलम कलवालपल्ली गावच्या होत्या. त्यांनी 2009 मध्ये गट-2 मधून सरकारी नोकरीला सुरुवात केली होती.
 
'जमिनीच्या वादातून हल्ला'
सुरेशनं हा हल्ला जमिनीच्या वादातून केला असून तपास सुरू आहे आणि लवकरच यासंबंधीचे अधिक तपशील जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
 
सुरेशच्या जमिनीसंदर्भात खटला सुरू असून जमीन तपशिलाबाबत महसूल नोंदीत दुरुस्ती केल्यामुळे वाद निर्माण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
विजया रेड्डी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर राज्यमंत्री सविता इंद्र रेड्डी यांनी खंत व्यक्त केली. महसूल विभागाच्या अडचणींचा राग एखाद्या अधिकाऱ्याच्या जीवावर काढणे अतिशय वाईट असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
उपजिल्हाधिकारी तसंच तहसीलदार असोसिएशनतर्फेही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
 
तेलंगणा राज्याच्या उपजिल्हाधिकारी असोसिएशनच्या प्रवक्त्या व्ही. लच्छी रेड्डी आणि तेलंगणा तहसीलदार असोसिएशनचे प्रवक्ते एस. रामू यांनी अब्दुल्लापूरमेटच्या तहसीलदार विजया रेड्डी यांच्यावरचा हल्ला अतिशय क्रूर असल्याचं म्हटलं आहे.
 
या संदर्भात त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. "कामाच्या ठिकाणी घुसून तहसीलदाराला जिवंत जाळणं ही अत्यंत दुःखद घटना आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यावर ही वेळ येणं अतिशय धक्कादायक आहे," असं या पत्रकात म्हटलं आहे.
 
तेलंगणा गॅझेट अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा व्ही. ममता आणि सरचिटणीस ए. सत्यनारायण यांनीही "तहसीलदाराचा असा मृत्यू ओढवणे अमानवी" असल्याचं म्हटलं आहे.
 
या घटनेमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण होईल. अशा घटना टाळण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवायला हवी, असंही त्यांनी म्हटलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments