Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने आईचा मृतदेह कचऱ्यात टाकला

Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (12:16 IST)
विघ्नेश ए.
२९ वर्षांच्या एका तरुणाने आपल्या आईचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कचरापेटीमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमधल्या थूटुकुडीमध्ये घडली आहे.
 
गरिबीमुळे असं केल्याचं या तरुणाने बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं.
 
५८ वर्षांच्या वासंतींवर नंतर काही स्थानिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं या तरुणाने सांगितलं.
 
आपण आपल्या आईचा मृतदेह कचऱ्यात टाकला, यावर अजूनही विश्वास बसत नसून अशी वेळ कोणावरही येऊ नये, असं या तरुणाने बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं.
 
सिपकॉट पोलीस स्टेशनचे प्रमुख रेनियस जेसुबाथम यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातल्या धनसेकरन भागातल्या कचऱ्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याचं सोमवारी सकाळी या रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना कळवलं.
 
यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर तो महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
 
मृतदेह पोस्टमॉर्टेमला पाठवण्या आधी पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली. त्याने आपली परिस्थिती सांगत जे केलं त्याविषयी खेद वाटत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
 
या तरुणाचं कुटुंब मूळचं मदुराईचं असून सुमारे २५ वर्षांपूर्वी थूटुकुडीमध्ये स्थायिक झालं. या मुलाचे वडील नारायणस्वामी हे खासगी हिंदू कार्यक्रमांमध्ये पौरोहित्य करत असल्याचं या तरुणाने सांगितलं.
 
काही वर्षांपूर्वी नारायणस्वामी आजारी पडल्यानंतर त्यांची पत्नी वासंती आणि या तरुणाने त्यांना चेन्नईतल्या एका आश्रमात ठेवलं असून, सध्या ते तिथंच आहेत.
 
कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या तरुणानेही खासगी कार्यक्रमांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण यातून मिळणारे पैसे पुरेसे नसल्याचं त्यानं सांगितलं. आपल नाव जाहीर न करण्याची विनंती त्याने बीबीसीला केली आहे.
आईचा मृतदेह कचऱ्यामध्ये सोडल्यानंतर शहर सोडून पळून गेल्याच्या मीडियामध्ये आलेल्या बातम्यांचं त्यानं खंडन केलंय. "मी माझ्या घरी नव्हतो, पण मी शहरातच होतो आणि पोलीस मला शोधत आहेत हे समजल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो," असं त्याने सांगितलं.
लोक असं का करतात?
 
दुःख हे अमिबासारखं असतं आणि ते कोणतंही स्वरूप घेऊ शकतं असं मानसोपचारतज्ज्ञ अशोकन यांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं.
 
दुःखाच्या भरामध्ये आलेल्या नैराश्याने बिथरून या तरूणाने असं केलं असावं. आपण काय करतोय, हे त्याला पूर्णपणे कळलंही नसेल.
 
दुःखामध्ये रडल्यामुळे चिंता किंवा भीती कमी होण्यास मदत होते आणि परिणामी मनःस्थिती पूर्वीसारखी होत असल्याचं अशोकन म्हणतात.
 
काही लोक दुःखात असताना आपल्या भावनांना आवर घालतात आणि इतरांपासून स्वतःला दूर करतात. पण नंतर याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असल्याचं ते सांगतात.
 
आपल्या भावना दाबून ठेवल्याने अशी परिस्थिती उद्भवू शकते. असं केलं म्हणून याचा अर्थ हा तरूण आईच्या जवळ नव्हता किंवा त्याला आईच्या मृत्यूचं दुःख नव्हतं असा लावता येणार नाही, असं अशोकन म्हणतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments