Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पश्चिमबंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान, बांगलादेशमध्ये नरेंद्र मोदींनी घेतलं कालीमातेचं दर्शन

Webdunia
शनिवार, 27 मार्च 2021 (16:08 IST)
पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमध्ये आज (27 मार्च) विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होतंय. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांनी त्यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ईश्वरपुरीमधल्या जोगेश्वरी काली देवीची पूजा केली. हे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.
जग कोरोनामुक्त होण्यासाठी आपण प्रार्थना केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
ज्या कालीमातेचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं, तिला मानणारे बहुसंख्य मतदार असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान होतंय.
पश्चिम बंगालमध्ये मतदानाला किरकोळ हिंसाचाराचं गालबोट
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात बंगालमधील 30 जागांसाठी मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजेपर्यंत सुमारे 15 टक्के मतदान झालं.
दरम्यान काही ठिकाणी किरकोळ हिंसाचाराचे गालबोट मतदानाला लागलं. मतदानाच्या पार्श्वभूमीवर भगवानपूर येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना काल रात्री उशिरा घडली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सालबनी मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार सुशांत घोष, यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी घोष यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात मतदान सुरक्षितपणे व्हावं यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 10 हजार मतदान केंद्रांमध्ये राज्य पोलिसांशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 732 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कांथी दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजना परिसरातील मतदारांनी ईव्हीएममध्ये त्रुटी असल्याचं सांगत निषेध नोंदवला. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. येथील मतदानयंत्रात कुणालाही मत दिल्यास एका विशिष्ट पक्षाला ते मत जात असल्याची तृणमूल काँग्रेसची तक्रार आहे.
दुसरीकडे, केशियारी भागात शनिवारी सकाळी भाजप कार्यकर्ते मंगल सोरेन यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. यानंतर केशियारी परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. सोरेन यांची हत्या झाली असून तृणमूल काँग्रेसनेच ती घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. पण तृणमूल काँग्रेसने हे फेटाळून लावताना भाजपच्या अंतर्गत कलहामुळे सोरेन यांचा खून करण्यात आल्याचा आरोप केला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला या प्रकरणाचा अहवाल पाठवून दिला आहे. तसंच झाडग्राम मतदारसंघातील एका मतदान केंद्रात मतदानयंत्रातील त्रुटीमुळे मतदान उशीरा सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
आसाममध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान
आसाम विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांतील 47 मतदारसंघांमध्ये मतदान करण्यात येत आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू करण्यात आलं.
आसाममध्ये सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सुमारे 10.2 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 47 विधानसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी आसाममध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सुरक्षा दलांच्या 300 कंपन्यांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता मतदारांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी केली जातेय. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर देण्यात येत आहेत.
जोरहाट जिल्ह्यातील मरियानी विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील 47 जागांसाठी होत असलेल्या या मतदानात 81 लाख 9 हजार 815 नोंदणीकृत मतदार आहेत. ते विविध पक्षांच्या 264 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज करतील.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपचे 24 विद्यमान आमदार निवडणुकीत उभे आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचाही यामध्ये समावेश आहे.
याशिवाय, काँग्रेसचे सहा विद्यमान आमदार, आसाम गण परिषदेचे सहा विद्यमान आमदार आणि बदरुद्दीन अजमल यांच्या AIUDF पक्षाचा एक आमदार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीस सामोरे जात आहेत.
 
पश्चिम बंगाल निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 30 जागांसाठी मतदान सुरू आहे. या 30 जागांपैकी, भाजप आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी 29 तर काँग्रेस-डावे-आयएसएफ आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
तरुणांनी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं.
आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विधानसभा अध्यक्ष हिरेंद्रनाथ गोस्वामी आणि आसामचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रिपून बोरा यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
एकीकडे ममता बॅनर्जी या भाजपला 30 पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवण्याचं आव्हान देत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला आहे.
दुसरीकडे शुभेंदु अधिकारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी पुन्हा सत्ता राखणं आव्हान असेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
बंगालमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेसव्यतिरिक्त काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
ज्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्ष आपली राजकीय गणितं जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत, ती निवडणूक नेमकी आहे तरी कधी? पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचं नेमकं चित्र काय आहे? गेल्यावेळी निवडणुकीतील परिस्थिती काय होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
 
निवडणुका कधी? एकूण जागा किती?
पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमध्ये आज (27 मार्च) विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होतंय.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या एकूण 294 जागा आहेत. बहुमतासाठी 148 जागा जिंकण्याची आवश्यकता असते.
ममता बॅनर्जींचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष, भाजप तसंच काँग्रेस-डाव्या पक्षांची आघाडी हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ममता बॅनर्जी गेली दहा वर्षे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्या तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी होणार की भाजप बंगालमध्ये पहिल्यांदा स्वबळावर सत्ता हस्तगत करणार हा प्रश्न आहे.
 
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतलं चित्र
गेल्या पाच वर्षांत पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणं वेगाने बदलली आहेत.
2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं 211 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 44 जागा जिंकण्यात यश आलं होतं. डाव्या पक्षांना 32 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या.
मतांच्या टक्केवारीचा विचार करता तृणमूल काँग्रेसला 45 टक्के मतं मिळाली होती. डाव्या पक्षांना 25 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेसला 12 टक्के. भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी होती 10 टक्के.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्रं नाट्यमयरित्या बदललं. लोकसभेच्या 42 जागांपैकी तृणमूल काँग्रेसनं 22 जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं 18 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. काँग्रेसला अवघ्या 2 जागा जिंकता आल्या होत्या.
तृणमूल काँग्रेसची मतदानाची टक्केवारी 43 टक्के होती, तर भाजपला 40 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची मतदानाची टक्केवारी 10 टक्क्यांहून कमी झाली होती.
निवडणुकीच्या आकडेवारीचं विश्लेषण करणारे सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीमधील प्रोफेसर संजय कुमार यांनी सांगितलं, "मतांची टक्केवारी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कधीच सारखी राहत नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर असेल तरच मतांची टक्केवारी साधारण सारखी राहते."
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments