Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

कोरोना लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' आदेश

Corona lockdown
, शनिवार, 27 मार्च 2021 (10:16 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी येत्या रविवारपासून (28 मार्च) रोज रात्री जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तर मुंबईतले मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचं मुंबई महापालिकेने जाहीर केलंय.
 
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत.
 
"जनतेने ही कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे," असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
 
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविडची स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे हेही या बैठकीला हजर होते.
 
तर या नाईट कर्फ्यूसोबतच मुंबईतले मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू राहू शकणार असल्याचं मुंबई महापालिकेने जाहीर केलंय. मुंबईतले मॉल्स आता रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंतच्या काळात बंद राहतील.
 
लॉकडाऊन लावण्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री म्हणाले की, "मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र, वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस आणि औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे."
 
कडक निर्बंधांचे संकेत
"जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे," असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
 
"आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू. मात्र, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश दिले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी," असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
तसंच, "मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत," असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
...तर अशा ठिकाणी लॉकडाऊन लावा - मुख्यमंत्री
"ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
तसंच, "ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे, तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा. पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा," अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
 
'लसीकरणाचा वेग वाढवा'
लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून, कोरोनाचा नवीन विषाणू आणि औषोद्धोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे, असंही ते म्हणाले.
 
'याचीही काळजी घ्या'
"कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा आणि पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, ICU आणि ऑक्सिजन बेडसची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टिंगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा," असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार फॅक्टर केरळच्या निवडणुकीत किती चालेल?