इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या कुड्स सैन्याचे कमांडर कासीम सुलेमानी यांची हत्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असेलल्या सुप्त संघर्षात झालेली नाटकीय वाढ अधोरेखित करते. या हत्येचे गंभीर पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
इराणकडून या हत्येचं जोरदार प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. कारवाई आणि प्रत्युत्तराची ही साखळी दोन्ही देशांना थेट संघर्षाच्या जवळ आणू शकते. अमेरिकेच्या इराकमधल्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ शकतं. तसंच हत्येच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रणनीतीची (अशी काही रणनीती असल्यास) कसोटी लागू शकते.
ओबामा प्रशासनात व्हाईट हाउसमधील पश्चिम आशिया आणि पर्शियन आखातविषयक व्यवहाराचे समन्वयक फिलिप गॉर्डन यांच्या मते ही हत्या म्हणजे अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारल्यासारखंच आहे.
परदेशात लष्करी कारवाई करण्यासाठी इराणच्या सुरक्षा दलाने कुड्स फोर्स ही शाखा तयार केली आहे. लेबेनॉन असो, इराक असो, सीरिया असो किंवा इतरही देश, इराणच्या प्रभावाचा विस्तार करण्यासाठी हल्ल्यांची योजना आखण्यात किंवा मित्र राष्ट्रांचं बळ वाढवण्यात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वॉशिंग्टनसाठी सुलेमानी हे दहशतवादी होते. त्यांचे हात अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने माखले होते, असं अमेरिकेचं म्हणणं होतं. मात्र, इराणमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट होती. इराणविरोधी दबावतंत्र आणि अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांविरोधात उभारलेल्या लढ्याचं त्यांनीच खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांना सुलेमानी खटकत होते, हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र, अमेरिकेने त्यांना ठार करण्यासाठी हीच वेळ का निवडली, याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय.
इराकमधल्या अमेरिकी सैनिकांवर सौम्य स्वरूपाचे रॉकेट हल्ले करण्यात येत होते, असे आरोप तेहरानवर करण्यात आले आहेत. यात अमेरिकेच्या एका कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू झाला होता. मात्र, तेहरानने यापूर्वी अनेक गंभीर हल्ले केले आहेत. आखातातल्या तेल टँकर्सवर केलेला हल्ला, अमेरिकेचं मानवरहित विमान पाडणं, सौदीच्या इंधन पुरवठ्यावर केलेला मोठा हल्ला, हे सर्व हल्ले गंभीर होते. मात्र, त्यावेळी अमेरिकेने कुठलीही थेट कारवाई केली नव्हती.
इराकमधल्या अमेरिकी तळांवर झालेल्या हल्ल्याविषयी बोलायचं तर अमेरिकेने पूर्वीच इराण समर्थक सैन्यावर कारवाई केली आहे. अमेरिकेने केलेल्या त्या कारवाईला उत्तर म्हणून इराकची राजधानी बगदादमधल्या अमेरिकी दूतावासाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता.
सुलेमानींना ठार करण्याच्या कारवाईवर स्पष्टीकरण देताना पेंटॅगॉनने सुलेमानीने पूर्वी केलेल्या कारवाईचा दाखला तर दिलाच. शिवाय, ही प्रतिबंधात्मक कारवाई होती, असंही म्हटलं आहे. पेंटागॉनने एक पत्रक प्रसिद्ध करत म्हटलं आहे, "सुलेमानी इराकमधील अमेरिकी सैन्य आणि अमेरिकी नागरिकांवर तसंच संपूर्ण प्रदेशात हल्ले करण्याची योजना आखत होता."
पुढे काय होईल?
आता यापुढे काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या एका कारवाईतून आपण दोन उद्देश साध्य केल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाटू शकतं. एक म्हणजे इराणला धडा शिकवला आणि दुसरं म्हणजे इस्राईल, सौदी अरेबिया यासारख्या आखातातील अस्वस्थ मित्रराष्ट्रांना दाखवून दिलं की अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा अजूनही सर्वात खमकी आहे.
मात्र, अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने तातडीने प्रत्युत्तर दिलं नसलं तरी नजिकच्या भविष्यात काहीतरी मोठी कारवाई नक्कीच करणार.
इराकमध्ये असलेले अमेरिकेचे पाच हजार सैनिक संभाव्य लक्ष्य ठरू शकतात. यापूर्वीही इराण किंवा इराणच्या मित्रराष्ट्रांकडून असे हल्ले झालेले आहेत. दुसरं म्हणजे आखातात तणाव वाढू शकतो. सर्वांत आधी परिणाम होईल तो तेलाच्या दरावर. तेलाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांची मदार आपल्या सैन्यावर असेल. अमेरिकेने आधीच एक छोटी सैन्य तुकडी बगदादमधल्या आपल्या दूतावासाकडे रवाना केली आहे. गरज पडल्यास ते इराकमधलं आपलं सैन्यबळ वाढवू शकतात.
मात्र, इराण वेगळ्या प्रकारे प्रत्युत्तर देण्याचीही शक्यता आहे. म्हणजे हल्ल्याचं उत्तर हल्ल्याने न देता आखातात इराणला असेलल्या पाठिंब्याचाही वापर केला जाऊ शकतो. सुलेमानीने आखातातील अनेक राष्ट्रांना निधी पुरवून आणि वेळोवेळी मदत करून चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.
इराण बगदादमधल्या अमेरिकी दूतावासाला घेराव घालून इराक सरकारची कोंडी करू शकतं आणि तिथल्या अमेरिकी सैन्याच्या तैनातीवर प्रश्न उपस्थित करू शकतं. तसंच हल्ल्याला कव्हर करण्यासाठी इतर ठिकाणी निदर्शनं घडवून आणली जाऊ शकतात.
कुड्स कमांडर सुलेमानींवर केलेला हल्ला अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि त्यांच्या सैन्य क्षमतेचं प्रदर्शन आहे, हे स्पष्टच आहे. सुलेमानींच्या जाण्याचं आखातातल्या अनेकांना दुःख होणार नाही. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलेली ही कृती योग्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
सुलेमानींना ठार केल्याचे जे परिणाम होतील, त्याचा सामना करसाठी पेंटॅगॉन सज्ज आहे का? शिवाय, या हल्ल्यातून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आखाती देशांच्या धोरणाविषयी काय संदेश मिळतो? यातून काही बदल झाला आहे का? अमेरिकेने केलेला हल्ला हा इराणकडून करण्यात येणाऱ्या कारवायांबाबत अमेरिकेने स्वीकारलेलं नवीन झिरो-टॉलरन्स धोरण आहे का?
की ही केवळ 'अत्यंत वाईट' अशी ओळख असलेल्या एका इराणी कमांडरला दूर सारणारी कारवाई ठरेल.