Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'कोरोना विषाणूची निर्मिती प्रयोगशाळेतली आहे की नाही यावर अधिक संशोधन आवश्यक' - WHO

'कोरोना विषाणूची निर्मिती प्रयोगशाळेतली आहे की नाही यावर अधिक संशोधन आवश्यक' - WHO
, बुधवार, 31 मार्च 2021 (17:21 IST)
कोरोना विषाणू चीनमधल्या प्रयोगशाळेत अस्तित्वात आला, हे गृहीतक पूर्णपणे फेटाळून लावण्यासाठी अधिक तपास करण्याची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचं म्हणणं आहे.
हा विषाणू चीनमधल्या प्रयोगशाळेतून लीक झाला असावा, ही शक्यता अत्यंत धूसर असली तरी त्यावर व्यापक संशोधनाची गरज असल्याचं संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अॅडॅनॉम घेब्रुएसेस यांनी मंगळवारी म्हटलं आहे.
गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घालणारा कोरोना विषाणू सर्वप्रथम 2019 सालच्या शेवटी-शेवटी चीनमधल्या हुबेई प्रांतातल्या वुहानमध्ये आढळून आला होता.
त्यानंतर चीन सरकारनेच हा विषाणू पसरवला असल्याचे आरोप झाले. चीन सरकारने मात्र, हे आरोप कायमच फेटाळून लावले.
कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत 27 लाखांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 कोटी 70 लाखांहून अधिक जणांना या विषाणूची लागण झाली आहे.
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या एका पथकाने जानेवारी महिन्यात वुहानला भेट दिली. त्यावेळी चिनी अधिकाऱ्यांनी त्यांना काही नमुने आणि पुरावे सादर केले. याच पुराव्यांच्या आधारे या पथकाने आपला अहवाल तयार केला आहे.
या पथकाला कच्चा डेटा मिळवण्यात अडचणी आल्या आणि भविष्यात "वेळेत आणि सर्वसमावेशक डेटा शेअरिंगची" गरज असल्याचं डॉ. टेड्रोस म्हणाले.
तज्ज्ञांच्या या पथकाने वुहानमध्ये सर्व शक्यतांचा तपास केला. वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमधून विषाणू पसरला का, याचाही अभ्यास करण्यात आला. ही संस्था वटवाघुळांमधल्या कोरोना विषाणूचा संग्रह, साठा आणि संशोधन करणारी जगातली अग्रणी संस्था आहे.
याच संस्थेतून कोरोना विषाणू लीक झाला असावा, अशी एक थेअरी मांडली जातेय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंपदेखील ही थेअरी मानणाऱ्यांपैकी एक होते.
मात्र, वुहानमधल्या प्रयोगशाळेतून हा विषाणू लीक झाला असण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि चीनच्या तज्ज्ञांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलेलं आहे. वटवाघुळातून एखाद्या इतर प्राण्यामार्फत मानवाला कोरोना विषाणूची लागण झाली असावी, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.
असं असलं तरी "अतिरिक्त तज्ज्ञांची वेगळी मोहीम आखून या बाबतीत अधिक तपास करायला हवा," असं डॉ. टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की WHO च्या बाबतीत सांगायचं तर सर्व गृहितकांचा अभ्यास करण्यात येईल."
दरम्यान, कोरोना विषाणूची साथ पसरण्यामागे वुहानमधल्या संस्थेचा सहभाग असल्याचे कुठलेही पुरावे सापडले नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या पथकाचे प्रमुख पिटर बेन एम्बारेक यांनीही सांगितलं.
आमच्या पथकाला चीनबाहेरसुद्धा राजकीय दबाव जाणवला, मात्र, अंतिम अहवालातून काहीही वगळण्यासाठी कुणीही सांगितलं नाही, असंही एम्बारेक यांनी म्हटलं.
 
चीनमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर तब्बल महिनाभराने म्हणजेच 3 जानेवारी 2020 रोजी चीन सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला याविषयीची माहिती दिली होती. मात्र, वुहानमध्ये त्याआधीच म्हणजेच 2019 च्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच कोरोना विषाणू पसरला असू शकतो, असंही डॉ. एम्बारेक यांचं म्हणणं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अमेरिकेसह दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि यूकेसह एकूण 13 मित्रराष्ट्रांच्या गटाने या अहवालावर चिंता व्यक्त करत चीनने तज्ज्ञांना 'संपूर्ण सहकार्य' करावं, असं आवाहन केलं. मिशन वुहान "खूप उशिराने सुरू झालं. शिवाय, या मोहिमेतल्या तज्ज्ञांना संपूर्ण मूळ डेटाही पुरवण्यात आला नाही," असंही या देशांचं म्हणणं आहे.
आपण जागतिक आरोग्य संघटनेला संपूर्ण सहकार्य करू, असंही या गटाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
चीनमधल्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू लीक झाल्याच्या आरोपांचा चीनने इनकार केला आहे. सर्वप्रथम वुहानमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आले असले तरी इथेच या विषाणूची उत्पत्ती झाली असावी, असं गरजेचं नाही, असं चीनचं म्हणणं आहे. आयात केलेल्या गोठवलेल्या अन्नातून म्हणजेच फ्रोझन फूडमधून हा विषाणू वुहानमध्ये दाखल झाला असावा, असा दावा चीनी प्रसार माध्यमातून करण्यात आला आहे.
वुहानमधून कोरोनाची साथ पसरली असली तरी जगाच्या इतर देशांच्या तुलनेत चीननेच सर्वांत आधी ही साथ आटोक्यात आणली. तात्काळ केलेलं मास टेस्टिंग, प्रवासबंदी आणि कठोर लॉकडाऊन यामुळे विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यात चीनला यश आलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परमबीर सिंह यांना मुंबई हायकोर्टानं सुनावलं, 'तुम्हाला गुन्हा दाखल करण्यापासून कुणी थांबवलं होतं?'