Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील करवीर छत्रपती शाहू महाराज

महाराष्ट्रातील करवीर छत्रपती शाहू महाराज
, बुधवार, 26 मे 2021 (22:55 IST)
महाराष्ट्रातील करवीर कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात 26 जून 1874रोजी झाला.यांचे वडील जयसिंगराव आणि आई राधाबाई असे.चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यांना राजाराम,शिवाजी,राधाबाई आणि आऊबाई अशी अपत्ये झाली.त्यांना 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार मिळाले.त्यांनी आपल्या प्रशासन यंत्रणेत बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. त्यांच्या राज्यात प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले.त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली.शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला.वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले.शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला.त्यांनी प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला.असं करणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले.शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला.त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले.अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला.त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह घडविले. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली.अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली.शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले.त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर बांधले.शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले.एकाएकी त्यांच्या मुलाचे शिवाजीचे निधन झाल्यामुळे ते खचले आणि अशातच त्यांना मधुमेहाने ग्रासले.मुबंईत वयाच्या अट्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.तत्पश्चात त्यांचे पुत्र राजाराम हे कोल्हापूरच्या गादीवर स्थानापन्न झाले. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तोट्यात असणार्‍या अर्बन बँकेच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर