Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ए.आर. रहमानच्या कार्यक्रमाची क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं विकली? गर्दी, वाहतूक कोंडी, वाईट अनुभव

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (14:03 IST)
मुरलीधरन काशी विश्वनाथन
 
सिनेसृष्टीतले प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांचा एक कार्यक्रम चेन्नईत रविवारी (10 सप्टेंबर) आयोजित केलं होतं.
 
मात्र, त्यामध्ये घडलेल्या प्रकारांमुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे मोठी टीका होत आहे.
 
अनेक चाहत्यांनी याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे.
 
कार्यक्रमाच्या ठिकाणी जितके लोक सामावले असते त्यापेक्षा जास्त तिकिटं विकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच कोणतंच नियोजन तिथं नव्हतं असं म्हटलं जात आहे.
 
अनेक लोक सोशल मीडियावर याबद्दल त्यांचे आक्षेप नोंदवत आहेत. नक्की काय झालं होतं ते येथे पाहू.
 
रहमान यांच्या सिनेकारकिर्दीला 30 वर्षं पूर्ण
ए. आर. रहमान यांच्या कारकिर्दीला 30 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल 12 ऑगस्ट रोजी ‘मारक्कुमा नेंजाम’ (हृदय, हे विसरू शकेल का?) अशा नावाचा सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र तो पावसामुळे रद्द झाला होता.
 
त्यानंतर ती 10 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या इस्ट कोस्ट रोडवरील पानायूर येथे आयोजित करण्यात आली होती.
 
जेव्हा तिकिटं खरेदी केलेले लोक तिथं आले तेव्हा त्यांना आत जाणं शक्य होत नव्हतं तसेच त्या परिसरात भरपूर वाहतूक कोंडी आणि गर्दी होती. हे सगळं या लोकांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. अनेकांनी व्हीडिओही टाकले.
 
चारुलता नावाच्या चाहतीनं तिथं आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ट्वीट केले आहे आणि आपण अजूनही त्यातून सावरत आहोत असं लिहिलं आहे.
 
हा कार्यक्रम संध्याकाळी 7 ते रात्री 11 या काळात होणार होता. अनेक लोक वेळेत पोहोचण्यासाठी 7 वाजता पोहोचले मात्र वाहतूक कोंडीमुळे ते कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
 
काही लोकांनी रहमान यांच्या संगीतावरील प्रेमामुळे आपण गेली 30 वर्षं त्यांचे चाहते आहोत, असं ट्वीट केलं आहे.
 
वाहतूक कोंडी
एका जोडपं आपलं मूल शोधत असल्याचा व्हीडिओही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.
 
सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपण हजारो रुपये देऊन तिकीट घेतलं पण आत जाता आलं नसल्याचं सांगितलं आहे.
 
कार्यक्रमाचं हे स्थळ चेन्नई शहरापासून 20 ते 25 किमी अंतरावर आहे. इस्ट कोस्ट रोड तेथे अरुंद होत जातो. या परिसरात संध्याकाळी कार्यक्रमाच्यावेळेस कोंडी होऊ शकते अशी माहिती वाहतूक पोलिसांनी सकाळीच दिली होती.
 
संध्याकाळी 4 वाजताच तिथं वाहतूक कोंडी झाल्यामुळे जे लोक 4 नंतर बाहेर पडले त्यांना कार्यक्रमात जातच आलं नाही. ज्या लोकांना आत जाता आलं ते म्हणाले आधी कार्यक्रम रद्द झाला होता त्यापेक्षा त्यांना आत जाता आलं हा अनुभव बरा आहे.
 
ढिसाळ नियोजन
या कार्यक्रमाला आलेल्या दिव्या मारुंधैय्या सांगतात, "गेल्यावेळेस आम्ही 4 वाजता निघालो होतो. तेव्हा वाहतुकीची गर्दी नुकतीच सुरू झाली होती. आणि 4.55 वाजता रहमान यांनी कार्यक्रम रद्द झाल्याचं ट्वीट केलं. आम्हाला तिथून बाहेर पडायला रात्रीचे 8 वाजले होते. म्हणूनच आम्ही यावेळेस दुपारी 2 वाजताच निघालो होतो. तेव्हा तिथं फक्त 50 लोक होते.
 
त्यांनी आम्हाला 4.30 ला आत सोडायला सुरुवात केली. 7 वाजता कार्यक्रम सुरू झाला. मात्र 8.30 झाले तरी ते लोकांना आत सोडतच होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती झाली. ते लोक कार्यक्रम संपेपर्यंत बसायला जागा शोधत होते. तिथं असणाऱ्या बाऊन्सर्सनी याकडे लक्षच दिलं नाही. ते पण कार्यक्रम बघत बसले होते. आम्ही सांगितल्यावर त्यांनी प्रवेशद्वार बदललं त्यामुळे स्थिती थोडीशी नियंत्रणात आली."
 
"कार्यक्रम सुरू झाल्यावर तू सुरक्षित आहेस का असे मेसेज यायला लागल्याचं दिव्या सांगतात. तेव्हा बाहेर काहीतरी गोंधळ झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं त्या सांगतात.आय़ोजकांनी याकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं," असं त्या म्हणाल्या.
 
रहमान यांचं उत्तर
या कार्यक्रमाची तिकिटं 2,000, 4,000, 5,000, 10,000 आणि 50,000 रुपयांना विकली होती. तसंच ज्या लोकांनी 5 आणि 10 हजार रुपयांची तिकीटं घेतली होती त्यांनाही कार्यक्रमाच्या स्थळी घुसमट्ल्यासारखं झाल्यामुळे कार्यक्रम सोडावा लागला.
 
रहमान यांनी यावर एक ट्वीट केले आहे.
 
त्यात ते म्हणतात, "चेन्नईच्या चाहत्यांनो ज्या लोकांना तिकीट घेऊनही कार्यक्रम पाहाता आला नाही त्यांनी आपल्या तक्रारीसह तिकीट arr4chennai@btos.in वर पाठवावे, आमची टीम तात्काळ उत्तर देईल."
 
एसीटीसी या कंपनीनं हे नियोजन केलं होतं त्यांनीही माफी मागत ट्वीट केले आहे.
 
त्यात ते म्हणतात, "असा भरपूर प्रतिसाद आणि मोठं यश मिळवून दिल्याबद्दल चेन्नईचे लोक आणि रहमान सर यांच्याप्रती कृतज्ञ आहोत. जे गर्दीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्याबद्दल क्षमस्व. त्याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो आणि त्यासाठी आम्ही उत्तरदायी आहोत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत."
 
आयोजक काय म्हणतात?
बीबीसी तमिळने या कार्यक्रमात सहभागी असलेल्या व्यक्तीशी चर्चा केली. या व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती दिली.
 
ते म्हणाले, "जे झालं ते अत्यंत दुर्देवी होतं. वाहतूक कोंडीसाठी आम्ही जबाबदार नाही. तसंच काही इतर कारणांमुळे त्या भागातली वाहतूक कार्यक्रमाच्या दिशेने वळवण्याच आली होती. ज्यांच्यावर या परिस्थितीचा फटका बसला असं म्हणणारे उशीरा आले असतील. पण जे आले ते कार्यक्रम पाहू शकले."
 
ते पुढं म्हणाले, "आमच्यावर अतिरिक्त तिकीटं विकल्याचा आरोप होतोय तो चुकीचा आहे. आम्ही एकूण जागांपेक्षा कमी तिकीटं विकली आहेत. अनेक जागा मोकळ्या होत्या. नीट सांगायचं झालं तर चाहते दोन भागांत बसले होते. उजव्या बाजूला कोणताच गोंधळ नव्हता. पण डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते. काही लोकांनी ते पाहिलं आणि त्यांना कार्यक्रम स्थळ माणसांनी भरून गेलं असं वाटलं आणि लोकांना आत सोडणं थांबवलं गेलं. पण दुसरी बाजू मोकळीच राहिली आणि यामुळे हा प्रश्न तयार झाला."
 
ते म्हणाले, "साधारणपणे 1000 लोकांवर याचा परिणाम झाला त्यांना आम्ही पैसे परत देणार आहोत. पण नक्की कोणाला कार्यक्रम पाहाता आला नाही हे ओळखणं अशक्य आहे. तरीही जे मागतील त्यांना पैसे परत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासंदर्भातील कंपनी कार्यक्रमाचे फोटो लवकरच प्रसिद्ध करेल."
 
या कार्यक्रमाला 45 हजार लोक येतील असा अंदाज होता आणि आयोजकांच्या मते 46,000 जागा त्यांच्यासाठी ठेवलेल्या होत्या.
 
पोलीस तपास
तामिळनाडू पोलीस विभागाच्या प्रमुखांनी तांबारम पोलीस अधीक्षकांना याचा तपास करण्यास सांगितले असून या परिसरात वाहतूक कोंडी आणि अतिरिक्त गर्दी का झाली हे शोधण्यास सांगितले आहे.
 
तसेच पार्किंगची व्यवस्था कशी होती, वैद्यकीय सुविधा होत्या का, पुरेशा प्रमाणात स्वयंसेवक होते का हे तपासण्यासही सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

शाहरुख खानने पुन्हा एकदा देशाला गौरव मिळवून दिला, हा मोठा सन्मान मिळणार

कोलाड हे राफ्टिंग आणि बर्ड वॉचिंग उत्तम ठिकाण, नक्की भेट द्या

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात निया शर्मा सह क्रिस्टल डिसूझा आणि करण वाहीला पाठवले समन्स

कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली झाली नाही, अजूनही निलंबित

सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता

पुढील लेख
Show comments