Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केकेचा मृत्यू: हम रहे ना रहे...गाणे म्हटल्याच्या काही तासातच घेतला केकेनी जगाचा निरोप

केकेचा मृत्यू: हम रहे ना रहे...गाणे म्हटल्याच्या काही तासातच घेतला केकेनी जगाचा निरोप
, बुधवार, 1 जून 2022 (11:48 IST)
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते असं म्हणतात, याचा प्रत्यय काल ज्या लोकांनी केकेंच्या कॉन्सर्टला हजेरी लावली त्यांना आला असेल. कारण काही वेळापूर्वीच हम रहे या ना रहे असं म्हणणारा केके आता राहिला नाही हे ऐकल्यावर त्याच्या चाहत्यांची काय अवस्था झाली असावी.
 
बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचं कोलकात्यात निधन झालं. केके त्यावेळी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होते. मात्र तिथेच त्यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये आणताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
 
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आनंदाने गाण्यांना सुरुवात मग स्टेजवरच अस्वस्थ वाटू लागणं आणि त्यातच कार्यक्रम पूर्ण करणं, पुढे जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने जवळ आलेल्या फॅन्सना ऑटोग्राफ नाईलाजाने नाकारणं आणि अखेरीस मृत्यू, या घडामोडी केकेंच्या शेवटच्या 5-6 तासांमध्ये घडल्या.
 
कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 53 वर्षांच्या केकेंनी अत्यंत आनंदात त्यांचे 2 फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हीच त्यांची सोशल मीडियावरची अखेरची पोस्ट ठरली. कारण या पोस्टनंतर कार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.
 
याबद्दल अधिक माहिती देताना बीबीसी हिंदीचे कोलकात्यातले सहकारी पत्रकार प्रभाकर मणी तिवारी म्हणाले की, "कार्यक्रमाच्या काही वेळानंतर केके स्टेजवरचे फोकस लाईट्स चुकवू लागले. ते स्टेजवरच वारंवार घाम पुसू लागले आणि मध्येच थांबतही होते. मात्र कार्यक्रम संपेपर्यंत ते स्टेजवरून हलले नाहीत.
 
हा गाण्यांचा कार्यक्रम संपवून ते थेट त्यांच्या हॉटेलवर गेले मात्र तिथेही त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागलं. तिथे काही फॅन्स त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागत होते. पण बरं वाटत नसल्याचं सांगत त्यांनी फॅन्सना ऑटोग्राफ द्यायला नकार दिला. पुढे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं."
 
केकेंच्या अकाली जाण्याने संपूर्ण बॉलिवूडसह त्यांचे चाहते शोकाकुल झालेत.
 
याच कॉलेजच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केके 'कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…' गाणं गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. 'यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…' हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं.
 
केकेच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार असून हे तिघेही आज सकाळी कोलकात्यामध्ये दाखल होत असल्याची माहिती समोर आलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केके यांच्या निधन, पंतप्रधान मोदी म्हणाले- कायम लक्षात राहतील; गृहमंत्री, उपराष्ट्रपतींनीही शोक व्यक्त केला