Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई , बुधवार, 13 मे 2020 (06:52 IST)
कोणत्याही परिस्थितीत केंटेनमेंट झोनच्या बाहेर साथीचा प्रसार नको, पावसाळ्यातील रोगांच्या दृष्टीनेही आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे
१७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते. लवकरच पावसाला येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात,कोरोना संकटाशी लढतांना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील हे पाहावे असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले

मुख्यमंत्री म्हणाले की, पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करतांना कोणत्याही परिस्थिती जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही.

कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्या साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्स मध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सुचना त्यांनी केली.

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे मात्र आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत मग एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांत सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याच्या रिक्त जागाही भराव्या लागतील.

गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करून काही लक्षणे आहेत का ते तपासले. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पहा व स्थानिकांमधून उपलब्ध करून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वंदे भारत मोहीमेचा १६ मे पासून दुसरा टप्पा