Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs ENG : मुंबईकर सरफराज खानचं अखेर कसोटीत पदार्पण, वडीलांचं स्वप्न असं पूर्ण झालं

Webdunia
गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (11:58 IST)
"लक्षात ठेवा. काही वर्षांनी तुम्ही माझं अभिनंदन कराल की, मी आज जे काही म्हटलं ते खरं होतं आणि अगदी तंतोतंत खरी भविष्यवाणी होती."
नौशाद खान यांनी 2011 मध्ये वन-डे वर्ल्ड कपदरम्यान वानखेडे स्टेडियमबाहेर माझ्याशी बोलताना हे म्हटलं होतं. 13 वर्षांच्या सरफराजचं कौशल्य आणि क्षमता याबाबत त्याचे वडील आणि कोच नौशाद यांना किंचितही शंका नव्हती. उलट मुलगा एकदिवस देशासाठी नक्की खेळेल असा विश्वास त्यांना होता. तीच नौशाद यांची तपश्चर्या आणि इच्छाही होती. कारण नौशाद यांना स्वतःला देशासाठी खेळता आलं नव्हतं. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल्यास यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हे नौशाद यांच्या बाबतीत अगदी खरं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून सर्फराझनं पदार्पण केलं आणि नौशाद खान यांनी दशकभरापूर्वी केलेलं हे भाकित खरं ठरलं आहे. अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर नौशाद यांचा मुलगा सरफराज याला कसोटी संघामध्ये स्थान मिळालं आहे. हा आनंद द्विगुणीत करणारी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांचा दुसरा मुलगा मुशीर खाननंही अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आपली छाप पाडली.
 
सरफराजचा दावा मजबूत
सरफराझची भारतीय संघात निवड झाली, तेव्हा टीम इंडियाचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा म्हणाले होते की, "सरफराज गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं निवड समितीसमोर स्वतःची दावेदारी सिद्ध करत होता. "त्यानं प्रत्येक वेळी धावा केल्या आहेत. पण भारताच्या मधल्या फळीमध्ये एवढ्या सहज जागा रिक्त होत नाही आणि वेळेवर संधीही मिळत नाही. मला वाटतं की, टीम मॅनेजमेंट आधी सरफराजला ड्रेसिंग रुममध्ये कम्फर्टेबल होऊ देईल आण नंतर त्याला प्लेईंग इलेव्हनमध्येही नक्कीच संधी मिळेल." सरफराज गेल्यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील कसोटी मालिकेतही संघात समाविष्ट होण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण निवडकर्त्यांनी टी-20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवला प्राधान्य दिलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ऋतुराज गायकवाड नुकताच जखमी होऊन परतला आहे. त्यामुळं सरफराजच्या नावावर पुन्हा चर्चा झाली. पण तेव्हा अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळाली. पण अनेकदा निराशा हाती येऊनही सरफराजनं कसोटी क्रिकेट खेळण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. आज नाही तर उद्या निवडकर्त्यांचा विचार बदलण्यात यश मिळेल, असा त्याला विश्वास होता. तसंच झालंही. 
 
कसोटी खेळण्याची संधी मिळेल का?
टीम इंडियाचा आणखी एक माजी सदस्य इरफान पठाणनंही नुकतंच सोशल मीडियावर सरफराजचं नाव न घेता, मुंबईच्या या खेळाडूला टीममध्ये स्थान का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचवेळी सध्या संघ व्यवस्थापनानं शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुभवालाच प्राधान्य देणं योग्य ठरेल, असंही पठाणनं मान्य केलं होतं. सध्या विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा अशा अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत आणखी एका तरुण क्रिकेटपटूला एवढ्या कठोर आव्हानासाठी मैदानात उतरवणं योग्य ठरणार नाही, असंही पठाणनं मान्य केलं. अखेर 26 वर्षांच्या सरफराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी अखेर मिळाली आहे. अवघ्या 16 वर्षांचा असताना श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांच्याबरोबर अंडर-19 वर्ल्ड कप खेळणाऱ्या सरफराजनं या दोघांपेक्षाही चांगली कामगिरी केली होती. एवढंच नाही तर 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये तर तो ऋषभ पंत आणि ईशान किशन अशा खेळाडूंबरोबर मैदानात होता. तरी त्यानं उत्तम कामगिरी केली होती.
 
करिअरमध्ये चढ-उतार
चांगलं तंत्र आणि प्रचंड कौशल्य असूनही सरफराजच्या करिअरमध्ये कायम चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. शिस्त नसल्यामुळं तो काही वेळा चर्चेत आला तर फिटनेसमुळंही त्याच्याबाबत चर्चा झाली. पण, यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं त्याच्याबरोबर 50 लाखांचा करार केला. एवढंच नाही तर एका सामन्यात थेट विराट कोहली त्याच्यासमोर नतमस्तक झाला होता. सुमारे चार वर्षांपूर्वी मुंबईसाठी रणजी चषकात तिहेरी शतक झळकावत सुनील गावस्कर आणि रोहित शर्मासारख्या एलिट खेळाडूंच्या एक्सक्लुसिव्ह क्लबमध्ये त्याचा समावेश झाला होता.
 
या क्लबमध्ये फक्त 7 फलंदाजांचा समावेश आहे.
नौशाद खान यांनी दहा वर्षांपूर्वी जेव्हा मुलाच्या भवितव्याबाबत विश्वास व्यक्त केला होता, तेव्हा मी याबाबत मुंबईच्या एका स्थानिक पत्रकाराशी बोललो होतो. त्या ज्येष्ठ पत्रकारांनी आम्हाला सांगितलं होतं की, 2009 मध्ये हॅरिस शिल्ड सारख्या प्रसिद्ध शालेय स्पर्धेमध्ये सरफराजनं सचिन तेंडुलकरच्या 346 धावांचा विक्रम मोडत 439 धावा केल्या होत्या. मुंबईत तेव्हाच अनेक लोकांनी सरफराजला पुढचा तेंडुलकर अशा उपमा द्यायला सुरुवात केली होती. पण मुंबईचे हे पत्रकार म्हणाले होते की, "पुढचा तेंडुलकर तर शक्यतो दुसरा कोणी बनूच शकत नाही. पण या मुलामध्ये दम आहे हे मात्र तेवढंच खरं आहे. जे याच्या वडिलांना जमलं नाही ते कदाचित हा करू शकतो. म्हणजे भारतासाठी खेळू शकतो." त्यामुळं सरफराज आणि त्याचे वडील अनेक दशकांपासून ज्याची वाट पाहत आहेत तो क्षण शुक्रवारी पाहायला मिळेल, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.
 
Published By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

पुढील लेख
Show comments