Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे? पारायणाची पद्धत आणि नियम, संपूर्ण माहिती

dattatreya ashtakam
Webdunia
गुरूवार, 12 डिसेंबर 2024 (16:12 IST)
श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे.
 
ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. 
 
श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे. 

गुरुचरित्र पारायण करताना प्रत्येक दिवशी कोणते अध्याय वाचावे?
सप्ताह पद्धती
१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय 
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय 
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय 
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय 
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय 
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय 
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय
 
ALSO READ: संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय १ ते ५३ Guru Charitra in Marathi
 
श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी २४ पूर्ण, दुसर्‍या दिवशी ३७ पूर्ण व तिसर्‍या दिवशी ५३ पूर्ण असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्री गुरु चरित्र वाचणारे ही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये.
 
काही जागी तीन दिवसांचे पारायण करण्याचा असा क्रम देखील सांगितला गेला आहे- पहिला दिवस: अध्याय १ ते १८, दुसरा दिवस: अध्याय १९ ते ३६, तिसरा दिवस: अध्याय ३७ ते ५३.
 
गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कोणत्या दिवशी करावी?
पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. सर्वसाधरणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करुन शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तीभावाने केव्हाही वाचाले तरी हरकत नसते. मुहूर्त, वार बघण्याची गरज नसते. मात्र पोथी वाचताना सोवळे जरुर पाळावेत.
 
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
 
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.
ALSO READ: श्री सप्‍तशती गुरुचरित्र - दत्तजन्म
गुरुचरित्र पारायण करत असणार्‍यांसाठी योग्य पद्धत आणि नियम
सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे.
वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.
दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे.
सोबत आपल्या उजव्या बाजुला एक रिक्त आसनही आंथरुन ठेवावे.
सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा.
सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. 
वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. 
वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.
वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.
सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रात:काळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी.
दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी.
रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.
सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
 
विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते.
ALSO READ: श्री दत्त विजय संपूर्ण
गुरुचरित्र पारायणाची मांडणी या प्रकारे करावी
सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ करा. पूजा साहित्य जसे स्वच्छ कापड, चौरंग, महाराजांचा फोटो, गुरुचरित्र ग्रंथ, शुद्ध तुपाचा दिवा, हळद, कुंकू, अक्षता, फुले-हार, तांदूळ- सुपारी, कलश, तांबे, शंख, घंटा, बसण्यासाठी आसन, नैवेद्य, दीप, उदबत्ती, दानधर्म साहित्य.
ALSO READ: Datta Jayanti Aarti त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
पूजा विधी
आसन ग्रहण करुन संकल्प करा. दत्तगुरूंचे स्मरण कत उजव्या हातात पाणी, हळद, कुंकू, अक्षता आणि फुल घेऊन प्रार्थना करा-
श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या कुटुंबाच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची सेवा करत आहे. याला यशस्वी करा आणि सर्व मनोकामना पूर्ण करा.
मग शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा.
आपल्या पहिल्या तीन बोटांनी आपल्या कपाळाला, छातीला आणि दोन्ही भुवयांना भस्म लावा.
कलशावर कुंकूवाच्या रेषा काढून त्याची पूजा करा.
मग शुद्ध जलाने भरलेला तांबा घ्या. त्यात हळद, कुंकू, अक्षता, फुल, एक सुपारी टाका आणि त्यावर विड्याची पाच पाने ठेवा.
चौरंगावर गणपतीची स्थापना करुन शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करा.
उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करुन पूजा करा.
कलशासमोर विड्याच्या पानावर एक सुपारी, हळकुंड आणि एक बदाम ठेवा.
देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा.
दत्त गुरूंना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घाला.
नंतर पुरुषसूक्ताचा अभिषेक करा.
अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. गुरुंना हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि भस्म अर्पण करा.
चौरंगाच्या पुढे गुरुचरित्राच्या पोथीसाठी अजून एक पाट किंवा चौरंग ठेवा. त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर थोडी अक्षता आणि त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवा.
पोथीची पंचोपचार पूजा करा. आसनावरच ठेवून पोथीचे वाचन करा.
पोथी वाचताना अखंड दिवा प्रज्वलित करा आणि सतस उदबत्तीचा सुवास दरवळू द्या. पारायणाच्या काळात दिवा विझू देऊ नका.
रोज वाचन झाल्यानंतर सकाळ-संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या आहाराचा नैवेद्य दाखवा.       
सकाळी- संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करा.
ALSO READ: श्री दत्त उपनिषद संपूर्ण
गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी
शेवटच्या दिवशी संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यावर व्रताचा दिवस असल्याने उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अधिक चांगले. 
उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ कपडे घाला.
सुगंधी धूप लावा.
दररोज प्रमाणे पूजा करा.
दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा.
पूजा पूर्ण झाल्यावर गाईला नैवेद्य दाखवा.
आरती करा आणि संकल्पाप्रमाणे मेहुण, ब्राह्मणाला भोजन आणि दानधर्म करा.
दुसऱ्या दिवशी सकाळी, संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधअक्षता आणि फुले वाहून पूजा हलवा.
कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा.
नारळ फोडून प्रसाद बनवा.
इतर साहित्य पाण्यात विसर्जित करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Gudi Padwa Essay In Marathi गुढीपाडवा मराठी निबंध

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

संत एकनाथ महाराजांची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

पुढील लेख
Show comments