Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा भाग 2

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (10:13 IST)
यासी उपाय सांगेन । अंगिकार करावा जाण । पुढें जाऊं आम्ही त्वरेनें । स्थिर यावें तुम्हीं मागें ॥११॥
पापविनाशी तीर्थासी । भेटी होईल तुम्हांसी । ऐसें म्हणोनि रायासी । अदृश्य झाले गुरुमूर्ति ॥१२॥
समस्त शिष्यांसहित । श्रीगुरु गुप्त झाले त्वरित । मनोवेगें मार्ग क्रमित । गेले वैदूरपुरासी ॥१३॥
पापविनाशी तीर्थासी । श्रीगुरु पातले त्वरितेंसी । राहिले तेथें अनुष्‍ठानासी । समस्त येती भेटावया ॥१४॥
साखरे सायंदेवाचा सुत । भेटीस आला नागनाथ । नानापरी पूजा करीत । समाराधना आरंभिली ॥१५॥
श्रीगुरु नेऊनि आपुले घरा । पूजा केली षोडशोपचारा । आरती करोनि एक सहस्त्रा । समाराधना करी बहुत ॥१६॥
इतुकें होतां झाली निशी । श्रीगुरु म्हणती नागनाथासी । सांगोनि आलों म्लेंच्छासी । पापविनाशीं भेटूं म्हणोनि ॥१७॥
जाऊं आतां तया स्थानासी । राहतां यवन येईल परियेसीं । उपद्रव होईल ब्राह्मणांसी । विप्रघरा म्लेंच्छ येती ॥१८॥
ऐसें सांगोनि आपण । गेले पापविनाशीं जाण । शुभासनीं बैसोन । अनुष्‍ठान करीत होते ॥१९॥
इतुकिया अवसरीं । राजा इकडे काय करी । गुरुनाथ न दिसती दळभारीं । मनीं चिंता बहु वर्तली ॥२२०॥
म्हणे कटकटा काय झालें । गुरुनाथें मज उपेक्षिलें । काय सेवे अंतर पडलें । तेणें गेले निघोनिया ॥२१॥
मागुती मनीं विचारी । पुढें जातों म्हणोनि येरी । पापविनाशी तीर्थातीरीं । भेटी देतों म्हणितलें ॥२२॥
न कळे महिमान श्रीगुरुचें । कोण जाणें मनोगत त्यांचें । दैव बरवें होतें आमुचें । म्हणोनि चरणांचें दर्शन झालें ॥२३॥
राजस्फोटक होता मज । आलों होतों याचि काज । कृपानिधि श्रीगुरुराज । भेटी झाली पुण्य माझें ॥२४॥
पुढें गेले निश्चित । म्हणोनि मनीं विचार करित । दिव्य अश्वावरी आरुढोनि त्वरित । निघाला राजा परियेसा ॥२५॥
चतुश्चत्वारिंशत्‌ क्रोश देखा । राजा पातला दिवसें एका । पापविनाशी तीर्थीं देखा । अवलोकितसे श्रीगुरुसी ॥२६॥
विस्मय करी अति मानसीं । येऊनि लागला चरणांसीं । विनवीतसे भक्तींसी । गृहाप्रति यावें म्हणतसे ॥२७॥
नगर सर्व श्रृगांरिलें । प्रवाळ-मोतियां तोरण केलें । गुडिया मखर उभारविलें । समारंभ थोर नगरांत ॥२८॥
बैसवोनिया पालखींत । आपण चरणचालीं येत । नवरत्‍न असे ओवाळित । नगर लोक आरत्या आणिती ॥२९॥
ऐशा समारंभें राजा देखा । घेऊनि गेला गुरुनायका । विस्मय झाला सकळ लोकां । महदाश्चर्य म्हणताती ॥२३०॥
लोक म्हणती म्लेंच्छजाती । पहा हो विप्रपूजा करिती । राजा अनाचारी म्हणती । जातिधर्म सांडिला आजी ॥३१॥
ज्याचें पाहूं नये मुख । त्याची सेवा करी देख । राजा नष्‍ट म्हणोनि सकळिक । म्लेंच्छजाती बोलती ॥३२॥
विप्रकुळ समस्त देख । संतोष करिती अतिकौतुक । राजा झाला विप्रसेवक । आतां बरवें राज्यासी ॥३३॥
ऐसा राव असतां । महाराष्‍ट्रधर्मीं वर्ततां । आपुला द्वेष तत्त्वतां । न करील जाण पां ॥३४॥
ऐसा राजा असतां बरवें । ज्ञानवंत असे स्वभावें । ब्रह्मद्वेषी नव्हे पहावें । पुण्यश्लोक म्हणती ऐसा ॥३५॥
नगरलोक पहावया येती । नमस्कारिती अतिप्रीतीं । राजे चरणचालीं येती । लोक म्हणती आश्चर्य ॥३६॥
एक म्हणती हा होय देव । म्हणोनि भजतो म्लेंच्छराव । या कलियुगीं अभिनव । देखिलें म्हणताती सकळिक ॥३७॥
सवें वाजंत्र्यांचे गजर । बंदीजन वाखाणिती अपार । राजा हर्षें निर्भर । घेऊनि जातो गुरुसी ॥३८॥
नानापरीचीं दिव्य वस्त्रें । वांटीतसे राजा पवित्रें । द्रव्य ओवाळुनि टाकी पात्रें । भिक्षुक तुष्‍टले बहुत देखा ॥३९॥
ऐशा समारंभें देखा । घेऊनि गेला राजा ऐका । महाद्वारीं पातलें सुखा । पायघडया अंथरती ॥२४०॥
नानापरीचीं दिव्यांबरें । मार्गीं अंथरती अपारें । वाजती भेरी वाजंत्रें । राजगृहा पातले ॥४१॥
मरासिंहासनस्थानीं । श्रृंगार केला अतिगहनीं । जगद्‌गुरुतें नेऊनि । सिंहासनीं बैसविलें ॥४२॥
राजमंदिरींच्या नारी । आरत्या घेऊनिया करीं । ओवाळिती हर्षनिर्भरीं । अनन्यभावें करोनियां ॥४३॥
समस्त लोक बाहेर ठेवोन । श्रीगुरु होते एकले आपण । सवें शिष्य चवघेजण । जवळी होते परियेसा ॥४४॥
अंतःपुरींचे कुलस्त्रियांसी । पुत्रपौत्रीं सहोदरासी । भेटविलें राजें परियेसीं । साष्‍टांगीं नमन करिती ते ॥४५॥
राजा विनवी स्वामियासी । पुण्यें देखिलें चरणांसी । न्याहाळावें कृपादृष्‍टीसी । म्हणोनि चरणीं लागला ॥४६॥
संतोषले श्रीगुरुमूर्ति । तयांसी आशीर्वाद देती । राजयातें बोलाविती । पुसताती गृहवार्ता ॥४७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । संतुष्‍ट झालास कीं मानसीं । अजूनि व्हावें कांहीं भावेंसी । विस्तारोनि सांग म्हणती ॥४८॥
राजा विनवी स्वामियांसी । अंतर पडतें चरणासी । राज्य केलें बहुवसीं । आतां द्यावी चरणसेवा ॥४९॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । आमुची भेटी श्रीपार्वतीं । तुझे पुत्र राज्य करिती । तुवां यावें भेटीसी ॥२५०॥
ऐसा निरोप देऊनि । श्रीगुरु निघाले तेथोनि । राजा विनवी चरण धरोनि । ज्ञान मजला असावें ॥५१॥
कृपासिंधु गुरुनाथ । ज्ञान होईल ऐसें म्हणत । आपण निघाले त्वरित । गेले गौतमी- तीरासी ॥५२॥
स्नान करोनि गौतमीसी । आले गाणगापुरासी । आनंद झाला समस्तांसी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥५३॥
संतुष्‍ट झाले समस्त लोक । पहावया येती कौतुक । वंदिताती सकळिक । आरती करिती मनोभावें ॥५४॥
समस्त शिष्यांतें बोलाविती । श्रीगुरु त्यांसी निरोपिती । प्रगट झाली बहु ख्याति । आतां रहावें गुप्तरुपें ॥५५॥
यात्रारुपें श्रीपर्वतासी । निघावें आतां परियेसीं । प्रगट बोले हेचि स्वभावेंसी । गुप्तरुपें राहूं तेथें ॥५६॥
स्थान आपुलें गाणगापुरीं । येथूनि न वचे निर्धारीं । लौकिकमतें अवधारीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥५७॥
प्रगट करोनिया यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयासी । राहूं येथें निर्धार ॥५८॥
कठिण दिवस युगधर्म । म्लेंच्छराजा क्रूरकर्म । प्रगटरुपें असतां धर्म । समस्त म्लेंच्छ येती ॥५९॥
राजा आला म्हणोनि । समस्त यवन ऐकोनि । सकळ येती मनकामनी । म्हणोनि गुप्त असावें ॥२६०॥
ऐसें म्हणोनि शिष्यांतें । सांगितलें श्रीगुरुनाथें । सिद्ध सांगे नामधारकातें । चरित्र ऐसें श्रीगुरुचें ॥६१॥
पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन । समस्त येती करावया भजन । म्हणोनि गुप्त राहिले ॥६२॥
लौकिकार्थ दाखवावयासी । निघाले आपण श्रीशैल्यासी । कथा असे विशेषी । सिद्ध म्हणे नामधारका ॥६३॥
गंगाधराचा सुत । सरस्वती असे विनवीत । प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । देखिलें असे गाणगापुरीं ॥६४॥
सद्भावें भजती भक्तजन । त्यांची कामना होईल पूर्ण । संदेह न धरीं अनुमान । त्वरित सिद्धि असे जाणा ॥६५॥
न लागतां कष्‍ट सायास । कामना पुरती गाणगापुरास । भक्तिभावें विशेष । कल्पवृक्ष तेथें असे ॥६६॥
जें जें कल्पिलें फळ । त्वरित पावती सकळ । धनधान्यादि विपुळ । पुत्रपौत्रादि शीघ्र होती ॥६७॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । हें गुरुचरित्र दिनीं निशीं । मनोभावें वाचनेंसी । सकळ कामना पुरतील ॥६८॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारका सांगत । यवनाचा उद्धार येथ । तुम्हांकारणें सांगितला ॥२६९॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सार्वभौमस्फोटकशमने ऐश्वर्यावलोकने वैदुरीप्रवेशो नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥२६९॥

गुरूचरित्रअध्यायएकावन्नावा

संबंधित माहिती

श्री नृसिंह नवरात्र 2024 पूजा विधी

Narsimha Jaynati 2024 Marathi Wishes नृसिंह जयंतीच्या शुभेच्छा

Narsimha Chalisa नृसिंह चालीसा

श्रीनृसिंहाची आरती

Gautam Buddha Stories भगवान बुद्ध यांच्या 5 प्रेरणादायी कथा

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

पुढील लेख
Show comments