Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साजरा करा वसुबारस सण

साजरा करा वसुबारस सण
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. 
 
काय आहे यामागील कथा
अशी कथा आहे की समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपुरतीसाठी ही पूजा केली जाते.
 
तसेच असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.
 
आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. पाहू कसा साजरा केला जातो हा दिवस
 
असा साजरा करावा हा सण
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. 
ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.
गायीच्या पायावर पाणी टाकावे.
गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
वासराची अश्यारिती पूजा करावी.
निरांजनाने ओवाळून घ्यावे.
गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.

या दिवसाचे काही नियम
स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 
या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.
 
आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्‍या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनी ग्रहाच्या शांतीचे उपाय