प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. म्हणून, या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात. भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात.
अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पूजा विधि
सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे.
यानंतर श्रीगणेशाचे ध्यान करा आणि त्यांच्यासमोर व्रत करण्याचा संकल्प करा.
ढगांमुळे चंद्र दिसत नसेल तर पंचगानुसार चंद्रोदयावेळी पूजा करावी.
संध्याकाळच्या पूजेसाठी गणेशाची मूर्ती स्थापित करावी.
गणपतीची धूप, दिवा, उदबत्ती, फुलांनी पूजा करावी.
प्रसादात केळी, नारळ ठेवावं.
तसेच गणेशाला आवडत्या मोदकाचा नैवेदय दाखवावा.
या दिवशी गूळ व तिळाचे मोदक बनवले जातात.
गणेश मंत्र जप करताना काही मिनिटे ध्यान करावं आणि कथा ऐकावी.
गणपतीची आरती करावी व प्रार्थना करावी.
यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करावी.
चंद्राला फुले व चंदन अर्पित करावं.
चंद्राच्या दिशेने अक्षता अर्पित कराव्या.
पूजा संपल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद वाटप करुन अन्न ग्रहण करावं.
अंगारकी संकष्टी चतुर्थी कथा
मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ अर्थातच अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.