Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय बाविसावा

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (11:32 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
कोणे एके दिनी ॥ आनंदयुक्त कैलसभुवनी ॥ आदिमाया जगत्रजननी ॥ आनंदयुक्त बैसली ॥१॥
तो फिरत फिरत नारदमुनी ॥ आले शिवाचे दर्शनालागुनी ॥ आदिमायेनें सन्मान करुनी ॥ पूजा करुनी पुसत ॥२॥
कोठोनी येणें झालें नारदा ॥ नवल गोष्टी कांही सांगा ॥ कोठें आहेत पतिव्रता ॥ आम्हासारख्या त्रिभुवनांत ॥३॥
येरू ऐकोनी हांसत ॥ उणें काय त्रिभुवनांत ॥ जिच्यापायीं ब्रिदरुळत ॥ अनुसुया सतीच्या ॥४॥
सावित्री लक्ष्मी पार्वती ॥ तिन्ही प्रतिमा करुन निश्चितीं ॥ पायीं बांधल्या असती ॥ तें काय न्यून असेल ॥५॥
ऐसें बोले नारदमुनी ॥ परम क्षोमला आदिजननी ॥ तिचें सत्व घ्यावयाला गुनी ॥ शिवासी आतां धाडी ते ॥६॥
नारद उठला तेथोन ॥ गेला पाहूं विष्णुसदन ॥ तों विष्णु अर्धांगी कमळा जाण ॥ बैसली होती आनंदे ॥७॥
तेथें गेला नारदऋषी ॥ वर्तमान झालें जें कैलासीं ॥ तेंचि निवेदितां तिसीं ॥ क्षोभली तेव्हां लक्ष्मी ॥८॥
विष्णुस म्हणे सत्वर जावें ॥ अनुसुयेचे सत्य पहावें ॥ तिचे सत्व घेऊनी यावें ॥ तरीच अंतरीं सौख्य ॥९॥
ऐसी काय ते सत्वधीर ॥ पायीं प्रतिमा बांधल्या साचार ॥ तिचें सत्व हरुनियां सत्वर ॥ यावें तुह्मी कृपानिधी ॥१०॥
ब्रह्मदेवाचे भुवनी ॥ नारद गेला तेक्षणीं ॥ ब्रह्मा सावित्री देखोनी ॥ परम मनी आनंदला ॥११॥
ब्रह्मा सावित्री दोघांस ॥ वर्तमान निवेदी नि:शेष ॥ ऐकोन सावित्रीचें मानस ॥ परम तेव्हां संतप्त ॥१२॥
सावित्री ब्रह्मदेवा विनवीत ॥ तुह्मी सत्वर जावें तेथ ॥ अनुसुयेचें सत्व अद्भुत ॥ कैसें आहे ते हरावें ॥१३॥
ऐसी कळी करुनियां ॥ नारद गेला तेथोनियां ॥ ते पार्वती शिवाच्या पाया ॥ वरी लोट घालीतसे ॥१४॥
म्हणे शिवा जावें सत्वर ॥ वारंवार करी नमस्कार ॥ मग उठले कर्पूरगौर ॥ सत्य घ्यावया अनुसुयेचें ॥१५॥
शिव जातां देखें नयनीं ॥ विष्णूस कमळा विनवी तेक्षणीं ॥ म्हणे गेले शूळपाणी ॥ सत्वर तुम्ही जावें तेथें ॥१६॥
विष्णु उठले तेथून ॥ एक झाले हरिहर दोघेजन ॥ तो सावित्री बोलो वचन ॥ ब्रह्मदेवासी तुझी जावें ॥१७॥
मग तेथून ब्रह्मदेव उठिला ॥ दोघांमध्यें मिळाला ॥ तिघे जाती तयेवेळां ॥ विप्रवेश घेऊनी ॥१८॥
गेले अनुसुयेचे सदनीं ॥ तिघे उभे तत्क्षणीं ॥ अनुसुया आली घरांतुनी ॥ ब्राह्मणांसी नमस्कारिलें ॥१९॥
उभी राहिली जोडोनी कर ॥ विप्रांस म्हणे काय इच्छा इसाचार ॥ ते पुरवीन मी निर्धार ॥ चिंता मनांत न धरावी ॥२०॥
विप्र बोलती ते क्षणीं ॥ तुवां नग्न वाढावें आम्हालागुनी ॥ तरीच जेऊं तुझे सदनीं ॥ ऐसी इच्छा आमुची ॥२१॥
येरी म्हणे अवकाश ॥ बैसावें आतां सावकाश ॥ मग हा वर्तमान विशेष ॥ निवेदिला स्वामीतें ॥२२॥
मग बोले अत्रीऋषी ॥ चिंता न करी वो मानसीं ॥ ते आले सत्व घ्यावयासी ॥ करणी आतां विपरीत करुं ॥२३॥
मग ते अनुसुया सती ॥ स्वयंपाकास बैसली निश्चितीं ॥ पाक करुनी शीघ्र गती ॥ झांकोनियां ठेवीत ॥२४॥
आपण येवोनी बाहेर ॥ विप्रांस म्हणे सत्वर ॥ स्नानासी पाट परिकर ॥ तिघांसी तीन दिधले ॥२५॥
त्यावरी बैसले तिघेजन ॥ आपण गृहामध्यें जाऊन ॥ ऋषीस करुनी साष्टांग नमन ॥ म्हणे आतां आज्ञा काय ॥२६॥
ऋषी म्हणे आणी तेल ॥ देत मंत्रोनी तात्काळ ॥ ते मर्दितांची तिघे बाळ ॥ होतील जाण ते समयीं ॥२७॥
येरी ऐकोनी वचन ॥ तात्काळ तेल आणून ॥ वाटीमध्यें घालून ॥ ऋषीपुढे ठेविलें ॥२८॥
ऋषीनें दिधलें मंत्रोन ॥ तें विप्रा जवळी आली घेऊन ॥ पाणी आणिले उष्ण करुन ॥ स्नानालागीं तात्काळ ॥२९॥
तेल घेऊनी हस्तकीं ॥ घाली विप्राचे मस्तकीं ॥ तात्काळ बाळें निश्चितीं ॥ झाली तेव्हां न लागतां क्षण ॥३०॥
येणेंप्रमाणें तिघांप्रती ॥ बाळें करुनी निश्चितीं ॥ अनुसुया म्हणे चित्तीं ॥ करणी स्वामीची अगाध ॥३१॥
घेऊन बाळा तिघांस ॥ ब्रह्मा विष्णु महेश ॥ तेल लाऊनी त्यास ॥ पायावरी न्हाणी तेव्हां ॥३२॥
तिघांसीही स्नापान ॥ करी तेव्हां नग्न होवोन ॥ मग तिघेही पाळणा निजवून ॥ जो जो शब्दें हालवीत ॥३३॥
ते निद्रिस्त झालीयावरी ॥ ऋषीस साष्टांग नमन करी ॥ उभी राहे जोडल्यावरी ॥ स्तुती अपार करीतसे ॥३४॥
तिघे बाळकें झालीं स्वामी ॥ न्हाणोनी निजविलें स्तन देऊनी ॥ आतांच पाळणा निजवूनी ॥ त्वरें आले तुम्हांपाशी ॥३५॥
आणिक घाली नमस्कार ॥ ऋषी म्हणे ऐक साचार ॥ हे ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ सत्व घ्यावयासी आले होते ॥३६॥
ही उत्तम झाली करणी ॥ तिघे देव आपुले सदनीं ॥ बाळी झालीं निशिदिनी ॥ खेळवी आतां आनंदें ॥३७॥
तिघेजण आनंदें खेळती ॥ दुग्ध पिऊनी निद्रा करिती ॥ इकडे काय झाली गती ॥ तिघीप्रती ते ऐका ॥३८॥
म्हणती कोण झाली गती ॥ कोठें गुंतले निश्चितीं ॥ अजून स्वामी न येती ॥ वार्ता कांही कोठें नसे ॥३९॥
त्याजिलें अन्नउदक साचार ॥ काढोनी टाकिले अलंकार ॥ रात्रंदिवस चिंता फार ॥ वाटे चित्तीं तिघीच्या ॥४०॥
कोणाचें आतां करावें स्मरण ॥ कोण पावेल आम्हालागुन ॥ कोणतें करावें अनुष्ठान ॥ जेणे स्वामीं भेटतील ॥४१॥
ऐसी चिंता करिती फार ॥ तों आले नारद ऋषेश्वर ॥ काय तिघी करिती साचार ॥ समाचार घ्यावया ॥४२॥
पाहून तिघीही खाली पाहती ॥ नारदास तेव्हां पुसती ॥ स्वामी गेले सत्वरगती ॥ अद्यापि कां न येती ॥४३॥
हांसोनी नारद बोले वचन ॥ ते तिघे बाळें होऊन ॥ खेळती आनंदेंकरुन ॥ अनुसुयेचे सदनासी ॥४४॥
अनुसुया परम सत्वधीर ॥ तिचें सत्व कोण घेणार ॥ गेले ब्रह्मदि हरिहर ॥ त्याची गती ही झाली ॥४५॥
तिघींही करुन नमस्कार ॥ म्हणती नारदा यास काय विचार ॥ येरु ह्मणे आतां तुमचे भ्रतार ॥ हातींचे गेले निश्चयें ॥४६॥
आतां तुम्हीं करावीं तीर्थे ॥ अथवा दुसरें वर तुम्हावें ॥ मीच पाहुन आपुले हातें ॥ देतों तुम्हांकारणीं ॥४७॥
तिघेजण ते कदां न येती ॥ बाळें होऊनियां रडती ॥ आतां काय विचार निश्चितीं ॥ विपरीत गती झालीये ॥४८॥
ऐसें ऐकतांची वचन ॥ स्फुंदस्फुंदोनी करिती रुदन ॥ धरणीवरी आंग टाकोन ॥ करुणा भाकिती नारदातें ॥४९॥
नानापरी शोक करिती ॥ अहा दैवा कैसी गती ॥ केव्हां भ्रतार भेटवीं ॥ नारदचरणीं लागती ॥५०॥
आम्ही अन्यायी अपार ॥ तुझ्यादासी निर्धार ॥ झालो नारदा भ्रतार भेटवीं ॥५१॥
नारदा आतां आम्हांस ॥ उपाय सांगा विशेष ॥ जेणें स्वामी चरणास ॥ भेट होय तें सांगा ॥५२॥
म्हणोन नारदाचे चरणीं ॥ मिठी घालिती दीण होऊनी ॥ नारदें सप्रेमें ह्र्दयीं धरोनी ॥ शांतवन करीतसे ॥५३॥
म्लान देखोनी नारदमुनी ॥ करुणा आली त्याचे मनीं ॥ तिघींसी समागमें घेवोनी ॥ नारद आले अनुसुयेगृहीं ॥५४॥
देखतांच अनुसुयासती ॥ तिघी चरणीं घालिती मिठी ॥ येरी म्हणे उठा उठी ॥ महासती हो काय झालें ॥५५॥
त्या न सोडिती चरण ॥ म्हणती आम्हा दे भ्रतारदान ॥ तूं उदार परिपूर्ण ॥ आम्ही भिक्षुक तुझे कीं ॥५६॥
मातें आम्हांस गर्व झाला फार ॥ त्या गर्वाचा झाला संहार ॥ तूं होऊनियां उदार ॥ आमुचें वैधव्य दूर करी ॥५७॥
तुझ्या दासीचिया दासी ॥ आम्ही झालों निश्चयेसीं ॥ तुझिया उपकारासी ॥ काय उत्तीर्ण आम्ही व्हावें ॥५८॥
आम्ही पर्म चांडाळिणी ॥ तुझी निंदा केली सदनीं ॥ सत्व घ्यावया लागुनी ॥ पाठविलें आम्ही देवा ॥५९॥
आतां कृपा करी सत्वर ॥ वैधव्य आमुचें करी दूर ॥ म्हणोनी नेत्रीं अश्रुधारा ॥ लोटल्या तेव्हां अपार ॥६०॥
नेत्रीं अश्रु वाहती ॥ कृपेनें द्रवली अनुसुयासती ॥ अभिमान यांचा समूळगती ॥ झडला आतां कळलें तें ॥६१॥
हास्य करी नारदमुनी ॥ म्हणे पहा ईश्वरकरणी ॥ अनुसुयेचे चरणीं ॥ नारद तेव्हां लागला ॥ ६२॥
नारदें विनविलें सतीस ॥ यांचे भ्रतार देई यास ॥ म्हणोनियां चरणास ॥ वारंवार लागत ॥६३॥
करावें त्यांचे मनोरथ पूर्ण ॥ तैल्य दुजें आणवून ॥ दिधलें अनुसुयें जवळी ॥६४॥
तिनें तें तेल लावोनी ॥ बाळास न्हाणी तेच क्षणीं ॥ न्हाणीतांचि ईश्वरकरणी ॥ पूर्ववत्‍ जाहले ॥६५॥
ऐसें तेव्हां देखून ॥ आनंदले अवघे जन ॥ तें कथन करावया पूर्ण ॥ सामर्थ्य कोणाचें नसेची ॥६६॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ दैदीप्यमान सुंदर ॥ लोटले अनुसुयेचे चरणावर ॥ म्हणती तूं धन्य त्रिजगतीं ॥६७॥
मग तिघ देव बोलती ॥ तुज माते पुत्र निश्चितीं ॥ त्रैलोक्यामाजी ज्याची ख्याती ॥ ऐसा पुत्र होईल तुज ॥६८॥
ऐसा अनुसुयेस वर ॥ देती ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ आज्ञा मागोनी नमस्कार ॥ साष्टांगेसीं घातला ॥६९॥
अनुसुयेनें निरोप देतां ॥ तेथूनी निघाले तत्वतां ॥ आनंदली जगन्माता ॥ लक्ष्मीसह सावित्री ॥७०॥
इकडे अनुसुयेस पुत्र झाला ॥ नाव दत्तात्रय ठेविलें तयाला ॥ तिन्ही देवाचा अंश झाला ॥ निर्माण तिचे उदरीं ॥७१॥
त्या दत्तात्रयाचें वर्णन ॥ ज्याची माया अनुसुया जाण ॥ ज्योतिदेवाचा अवतार पूर्ण ॥ त्रैलोकी कीर्ति जयाची ॥७२॥
ऐसें अनुसया आख्यान । जे करिती श्रवण पठण ॥ त्यांचे होय सदां कल्याण ॥ चिंतिलें पावे सर्वदां ॥७३॥
कोकिळामहात्म्य कथा ॥ श्रवणें सकळ हरे चिंता ॥ कोकिळा पूजनें तत्वतां ॥ आधीव्याधी न बाधिती ॥७४॥
वैधव्य नसे स्त्रियांसी ॥ सदा आनंद चित्तासी ॥ श्रवणमात्रें पापराशी ॥ भस्म होती क्षणार्धे ॥७५॥
आरंभापासुनियां नेम ॥ व्रत करावें संपूर्ण ॥ तेणें तुष्टें पार्वतीरमण ॥ अक्षयीं सुख देतसे ॥७६॥
नित्य नेमेसी पूजन ॥ यथाशक्त्या संतर्पण ॥ यथाशक्ति दक्षिणा देऊन ॥ द्विज संतुष्ट करावे ॥७७॥
आधीं करावें कोकिळा पूजन ॥ मग करावी कथा श्रवण ॥ पंक्तीस घेऊनी ब्राह्मण ॥ भोजन आपण करावें ॥७८॥
इतिश्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ बेविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२२॥
ओव्या ॥७८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ अध्याय २२ वा समाप्त: ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम

Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती कधी आहे? दत्ताचा जन्म कुठे झाला?

Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांतीला या चुका टाळा, नाहीतर प्रगती थांबेल !

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments