Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पंचविसावा

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (11:37 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
कृष्ण म्हणे धर्माप्रती ॥ कोकिळाव्रत ज्या स्त्रिया करिती ॥ त्यांची पातकें भस्म होती ॥ क्षणमात्र न लागतां ॥१॥
हिमालयाच्या पूर्वभागीं ॥ विषमा नामें एक नगरी ॥ तेथें ब्राह्मण वास करी ॥ बहुतकाळ पर्यंत ॥२॥
तों विप्र भिक्षा मागूण ॥ संसार चालवी नित्य जाण ॥ शिवमंत्राचें पठण ॥ रात्रंदिवस करीतसे ॥३॥
त्याची स्त्री परम चतुर ॥ ललिता नामें परिकर ॥ पतीसेवेसी तत्पर ॥ सादर तेव्हां बहुत कीं ॥४॥
तिसीं झाले बहुत दिवस ॥ तो पुत्र न होय तीस ॥ तेणें तियेसी आला त्रास ॥ अंत:करणीं तियेच्या ॥५॥
विप्र ह्मणे तयेप्रती ॥ पुत्र नाहीं तुज निश्चिती ॥ यालागी खेद चित्तीं ॥ फार मनांत वाटतसे ॥६॥
मग तो ब्राह्मण दीनवदन ॥ गेला थोर कानन ॥ शिवाचें करी पूजन ॥ निशीदिनी सर्वदां ॥७॥
तंव त्या वना माझारी ॥ देखोन हिमालयाची दरी ॥ तेथें जाऊन तप करी ॥ बहुत दिवस पर्यंत ॥८॥
स्त्रियेसीं बरोबर घेऊन ॥ करितां झाला निर्वाण ॥ महादेवाचें आराधन ॥ करी तेव्हां साक्षेपें ॥९॥
ऐसें तप परम दुर्धर ॥ द्वादशवर्षे झाली सादर ॥ कोकिळा मास परिकर ॥ प्राप्त झाला दैवयोगें ॥१०॥
तंव विप्रपत्नी नामें ललिता स्नानालागीं गेली तत्वतां ॥ तेथें पाहिल्या देव वनिता ॥ कोकिळादेवी पूजिती ॥११॥
देव वनिता पाहून ॥ ललिता पुसे तयालागुन ॥ तुह्मी हें काय व्रत करितां पूर्ण ॥ तें मजलागीं सांगावें ॥१२॥
ललितेचें वाक्य ऐकोन ॥ देवललना म्हणती तये लागून ॥ कोकिळाव्रत हें पूर्ण ॥ आम्ही जाण करीतसे ॥१३॥
तूं हें व्रत करी निर्धारी ॥ पुत्र होईल तुज सुंदरी ॥ व्रत तिनें केलें मास भरी ॥ कोकिळा देवीचें तत्वता ॥१४॥
कोकिळेच्या प्रसादेंकरुन ॥ शिव होते झाले प्रसन्न ॥ ब्राह्मणासी दिधलें वरदान ॥ पुत्र होईल तुजलागी ॥१५॥
मग शिवाच्या वरदें करुन ॥ पुत्र झाला दैदीप्य्मान ॥ स्वरुपें जैसा चंद्र पूर्ण ॥ सुवर्ण कांती तयाची ॥१६॥
त्या पुत्रातें पाहून ॥ ब्राह्मणाचें समाधान ॥ ऐसा पुत्र गुणनिधान ॥ अम्हालागीं प्राप्त जाहला ॥१७॥
ऐसा तो पुत्र सुलक्षण ॥ दिवसेंदिवस वाढे जाण ॥ कोणे एके समयी पूर्ण ॥ जाता झाला यमुनातीरा ॥१८॥
त्या यमुनेच्या तटाप्रती ॥ कोणीएक मुनी तप करी निश्चितीं ॥ त्याचा कमंडलू निश्चिती ॥ घेऊनियां पळाला ॥१९॥
मुनीनें ध्यान केलें विसर्जन ॥ कमंड्दलू जवळी न दिसे जाण ॥ इकडे तिकडे करी भ्रमण ॥ कमंडलू लागीं करीतसे ॥२०॥
मग तो पुसे जनाप्रती ॥ कमंडलू कोणे नेला निश्चिती ॥ तो जन सांगती तयाप्रती ॥ बाळें नेला तत्वतां ॥२१॥
ऐसें जनाचें ऐकोनी वचन ॥ मुनीनें करुनियां श्रवण ॥ म्हणता झाला तयालागुन ॥ तो मरण पावेल निश्चितीं ॥२२॥
ब्राह्मणाचा पुत्र घरीं ॥ पावता झाला निर्धारीं ॥ कमंडलू त्या अवसरीं ॥ त्याच्या पित्यानें देखिला ॥२३॥
पिता म्हणी पुत्रालागोनी ॥ हें पात्र आणिलें कोठोनी ॥ तो वचन न बोले कांही ॥ उगाच स्वस्थ रहात ॥२४॥
त्याचे होते सवंगडि मुलें ॥ ब्राह्मणें तयासी पुसिलें ॥ कमंडलू आणिला सांगा वहिले ॥ न सांगतां शिक्षा करीन ॥२५॥
बाळें म्हणती विप्रालागुनी ॥ एक मुनी बैसला ध्यानीं ॥ त्याचा कमंडलू घेऊनी ॥ पळाला हा गृहाप्रती ॥२६॥
मुनीनें ध्यान विसर्जून ॥ चहुंकडे पाहें अवलोकून ॥ मग तुझ्या पुत्रालागून ॥ शापशस्त्रें ताडिले ॥२७॥
या कारणे तूं ब्राह्मणा ॥ शरण जाई तपोधना ॥ मग तो करील शापमोचना ॥ तुझ्या पुत्राचें ते क्षणीं ॥२८॥
पिता म्हणे पुत्रालागून ॥ तूं जाईं ऋषी शरण ॥ कमंडलू देई तयालागूनी ॥ परमभावें विनऊनियां ॥२९॥
ऐसें पित्याचें वचन ॥ पुत्रें करुनी श्रवण ॥ खालीं मान घालून ॥ स्फुंदस्फुंदो रडतसे ॥३०॥
विप्र म्हणे बाळकालागूनी ॥ तुम्ही आम्ही सकळ मिळोनी ॥ ब्राह्मणाजवळ जाऊनी ॥ करुं शांतवन तयाचें ॥३१॥
कृष्ण म्हणे धर्मा अवधारीं ॥ पुढले अध्यायीं निर्धारी ॥ पुण्यपावन श्रवण करी ॥ कथा संपूर्ण ब्राह्मणाची ॥३२॥
इति श्रीस्कंद ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ पंचविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय २५ वा समाप्त: ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीला या 3 वस्तू नक्की खरेदी करा, आर्थिक स्थिती मजबूत होईल

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments