Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लघुभागवत - अध्याय १० वा

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:41 IST)
नंद आणि समस्त मंडळी । येऊनि पावतांचि गोकुळीं ।
सीमान्तस्थळीं एक्या मेळीं । सर्व जन राहिले १
पुढें अक्रूर जाऊनि वेगें । कंसासी समाचार सांगे ।
इकडे बलराम कृष्ण दोघे । नगरशोभा देखती २
रामकृष्णांची थोर कीर्ती । मथुरेमाजीं प्रकटली होती ।
म्हणूनि ऐशा दिव्य विभूती । देखावयाकारणें ३
लोटला जनसंभार । गजबजलें सारें नगर ।
सुवेष सालंकार । नारीनर मिरविती ४
तंव कृष्ण पाहे राजरजक । त्यासी म्हणे क्षण एक ।
उभा राहें दाखवीं अनेक । राजवसनें मोलाचीं ५
यावरी तो उन्मत्त रजक । वदला तिरस्कारपूर्वक ।
मज दिससी तूं मानव मूर्ख । राजवेष इच्छिसी ६
तेव्हां कृष्ण होऊनि क्रोधाविष्ट । मुखीं दिधली एक चपेट ।
तत्क्षणीं तो रजक धीट । गतप्राण जाहला ७
पुढें मार्गीं अनेक जन । करिती कृष्णाचें पूजन ।
तेविं चंदन उटीचें विलेपन । करी कुजा सद्भावें ८
त्या सद्भक्तीचें फळ । तीतें देई घनघीळ ।
वक्र अंग केलें सरळ ।सकृप होऊनि तियेचें ९
ऐसे अनेक चमत्कार । दाखवीत वसुदेवकुमर ।
यज्ञशालेसमोर । दोघे बंधु पातले ॥१०॥
तेथें इंद्रधनुष्य देखिलें । तीं सहज कृष्णें उचलिलें ।
हें पाहतां निरोधिलें । व्दारपाळें तयासी ॥११॥
ऐसा व्दारपाळ उन्मत्त । देखूनि केला त्याचा अंत ।
तत्काळ जाणविती दूत । घडलें वृत्त कंसातें ॥१२॥
मग  कृष्णाचें पारिपत्य । करावया बहुत दैत्य ।
कंसें धाडिले तेही समस्त । मृत्यु पावले क्षणार्धे ॥१३॥
तेव्हां मथुरावासी समस्त । जन झाले विस्मित ।
कंसही झाला भयभीत । न ये निद्रा तयासी ॥१४॥
दुसरे दिनीं मल्लयुध्द । होणार ऐसें झालें प्रसिध्द ।
सपरिवार गोप नंद । पाचारिले त्या समयीं ॥१५॥
त्यापरी नेमिल्या वेळीं । मंडपीं मिळाली मंडळी ।
नंदें कंसासी प्रथम अर्पिलीं । वस्त्रें भूषणें सन्मानें ॥१६॥
तंव रामकृष्ण उभय भ्राते । पातले देखूनि महातें ।
कुवलयापीड गजातें । कृष्णावरी लोटिलें ॥१७॥
करुनि गजाचा तिरस्कार । पुच्छ ओढुनि केला जर्जर ।
शेवटीं करुनि तीक्ष्ण प्रहार । महात आणि गज वधिला ॥१८॥
स्कंधीं घेऊनि हस्तिदंत । रामकृष्ण आले मंडपाआत ।
त्यांसी देखोनि भ्याले बहुत । कोणी सप्रेम देखती ॥१९॥
तंव मुष्टिक आणि चाणूर ।  मल्लयुध्दीं दैत्य चतुर ।
आवेशें रामकृष्णांसमोर । दंड पिटूनि राहिले ॥२०॥
तेव्हां बलराम आणि चाणूर । कृष्ण आणि मुष्टिक वीर ।
युध्द जुंपले परस्पर । प्रेक्षक तटस्थ देखती ॥२१॥
त्या युध्दीं अकस्मात । उभय दैत्य झाले मृत ।
तें देखूनि मल्ल समस्त । कृष्णावरी धांवले ॥२२॥
तेही पावले मृत्युपंथी । तेव्हां कंस दचके चित्तीं ।
नंदासी म्हणे शत्रुप्रती । आश्रय कैसा त्वां दिधला ॥२३॥
हा राजद्रोहाचा भयंकर। अपराध केला त्वां साचार ।
तरी बंदिवास निरंतर । आम्ही तूतें नेमिला ॥२४॥
तैसेंचि वसुदेव देवकीसी । आतांचि वधावें, आज्ञा ऐसी ।
दूतांसी केली, कीं आम्हांसी । कपट केलें तयांनीं ॥२५॥
आणि रामकृष्णासि दूर । घालवा येथूनि सत्वर ।
ऐसे कंसाचे कठोर उद्रार । ऐकूनि कृष्ण कोपला ॥२६॥
कंस प्रत्यक्ष मातुल । परी अत्यंत क्रूर दु:शील ।
म्हणूनि देहान्त शिक्षाच केवळ । योग्य ऐशा नरातें ॥२७॥
ऐसें कृष्णें धरिलें मनीं । आणि उडी घेऊनि सिंहासनीं ।
कंसाचा चेपितां कंठमणी । प्राण तेणें सांडिला ॥२८॥
कंस झुंजला बहुकाळ । परी मृत्यु येतां जवळ ।
प्रयत्न होती सकळ निष्फळ । न चले बळ कोणाचें ॥२९॥
ऐसा घडला कंसवध । येथें इतुकाचि घेणें बोध ।
कीं जो वागे होऊनि मदांध । नाश त्याचा शेवटीं ॥३०॥
आणि नम्रता ज्याचे अंगीं । तोचि मान पावे जगीं ।
आढयता मिरविणें वाउगी । तें मूर्खत्व जाणावें ॥३१॥
कंसवध ऐकूनि सर्वत्र । मथुरेंत झाला हाहा:कार ।
अष्ट बंधु त्याचे धुरंधर । कृष्णावरी धांवले ॥३२॥
वैर्‍याचा उगवावया सूड । धांवले ते आठही मूढ ।
परी कृष्णाचें बळ उदंड । नाहीं त्यांनीं जाणिलें ॥३३॥
ज्यापरी पाहूनि दीप । पतंग घाली झडप ।
मृत्युमुखीं आपोआप । पडे स्वशक्ति नेणुनी ॥३४॥
तैसे कंसभ्राते सकळ ।मृत्यु पावले तत्काळ ।
दैत्यांसी मनीं तळमळ । अहोरात्र लागली ॥३५॥
ऐसा पराक्रम करुनि अद्भुत । केलीं जननी आणि तात ।
तत्क्षणींच बंधमुक्त । जयजयकार जाहला ॥३६॥
सामर्थ्यवंत निजतनय । पाहूनि देवकीचें हृदय ।
उचंबळलें अतिशय । वसुदेवही तोषला ॥३७॥
मग उग्रसेन कंसतात । त्यातेंही करुनि बंधमुक्त ।
राज्य त्याचें त्यासी देत । श्रीकृष्ण सुत कन्येचा ॥३८॥
तैसेचि अनेक यादव । केवळ कंसभयास्तव ।
गेले जे जे दूर सर्व । ते मथुरेसी परतले ॥३९॥
मग कांहीं काळपर्यंत । बलराम कृष्ण राहिले तेथ ।
नंद आणि गोपाळ समस्त । गेले परत गोकुळीं ॥४०॥
योग्य काळीं मौंजीबंधन । झालियावरी, सांदीपन ।
गुरुच्या गृहीं रामकृष्ण । विद्याभ्यासासी राहिले ॥४१॥
कष्ट करुनि रात्रंदिवस । सोत्कंठ दोघे करिती अभ्यास ।
तेव्हां गुरुसी होऊनि संतोष । गुरुदक्षिणा याचिली ॥४२॥
जेधवां होय शिक्षणासमाप्ती । तेव्हांचि गुरुचे हातीं ।
दक्षिणा द्यावी ऐशी पध्दती ।  होती पूर्वी सर्वत्र ॥४३॥
असो सांदीपन म्हणे कृष्णा । द्यावी आम्हां गुरुदक्षिणा ।
सागरीं बुडाल्या माझ्या नंदना । सजीव करुनि देइजे ॥४४॥
कृष्ण म्हणे आपण गुरु । सांगाल तें अवश्य करुं ।
मागाल तरी कल्पतरु । आणूनि देऊं या समयीं ॥४५॥
मग जाऊनि सागरापाशीं । म्हणती गुरुपुत्र दे आम्हांसी ।
येरु म्हणे नसे मजपाशीं । सत्य ऐसें सांगतों ॥४६॥
परी माझे उदरीं निरंतर । वसतसे शंखासुर ।
तेणें भक्षिला गुरुकुमर । ऐसी वार्ता ऐकिली ॥४७॥
तेव्हां शंखासुराचें उदर । कृष्णें चिरितां न दिसे कुमर ।
मग यमापासूनि गुरुपुत्र । परत घेतला शेवटी ॥४८॥
पुत्र आणूनि गुरुसी देतां । संतोष होय त्याचे चित्ता ।
आशीर्वादें बंधु उभयतां । गौरवीले बहुमानें ॥४९॥
असो वंदन करुनि गुरुसी । रामकृष्ण आले मथुरेसी ।
पुढील कथा वर्तली कैसी । ते सावध परिसावें ॥५०॥
कंसाचा श्वशुर जरासंध । त्यासी कळलें कीं कंसवध ।
कृष्णें केला, म्हणूनि युध्द । करुनि यादव संहारुं ॥५१॥
ऐसा करुनि विचार ।वेष्टिलें तेणें मथुरानगर ।
परी झुंझले यादव वीर । जरासंघ पळविला ॥५२॥
ऐसें अनेकदां झाले युध्द। तितुक्या वेळ जरासंध ।
पराभवितां वैरसंबंध । दिवसेंदिवस वाढला ॥५३॥
पुढें कालयवन वीर प्रसिध्द । कृष्णासंगें करी युध्द ।
ही संधि साधूनि जरासंध। त्याच वेळीं धावला ॥५४॥
युध्द जुंपलें घनघोर । यादव झाल सकळ जर्जर ।
आतां नाश होणार समग्र । ऐसें कृष्णें देखुनी ॥५५॥
मथुरेपासूनि दुरी । निर्मिली एक सागरीं ।
व्दारका नामें रम्य पुरी । यादवांसाठीं केवळ ॥५६॥
तेथें धाडिले सर्व । मथुरा नगरीचे यादव ।
आणि युक्ति केली अभिनव । कालयवन वधावया ॥५७॥
आपण धांवे पुढें वेगें । कालयवन लागे मागें ।
ऐसें होतां देखिली मार्गे । गुहा एक भयंकर ॥५८॥
त्या गुहेमाजीं अवचित । कृष्ण झाला गुप्त ।
तेथेंचि होता एक गुप्त । साधु महंत तपस्वी ॥५९॥
काळयवनें त्यासी देखुनि । समजला ऐसें मनीं ।
कीं कृष्णचि साधुवेष घेउनी । निद्रित झाला भयानें ॥६०॥
म्हणूनि आवेशें लाथ । मारितांचि अकस्मात ।
साधु होऊनि जागृत । काळयवन जाळिला ॥६१॥
हा पवित्र साधु प्रतिसविता । इक्ष्वाकुवंशीं नृप माघाता ।
तनय त्याचा शूर ज्ञाता । मुचकुंद नामें प्रसिध्द ॥६२॥
एकदां झुंझले दैत्यांसी देव । तेव्हां देवांतें साहाय्य सर्वस्व ।
करुनि, शीणतां विश्रांतीस्तव । गुहेमाजी झोंपला ॥६३॥
ब्रह्मदेवें त्यासी चांग ।  वर दिधला, तव निद्राभग ।
करील, त्यातें मृत्युयोग । दृष्टिपातें होईल ॥६४॥
त्यापरी कालयवन । दृष्टिपातें झाला दहन ।
मग कृष्णें दिधलें दर्शन । मुचकुंदते त्या समय़ीं ॥६५॥
तेव्हांपासूनि कृष्णभक्त । झाला मुचकुंद विख्यात ।
मग वसुदेवदेवकीसुत । कृष्ण गेला व्दारके ॥६६॥
भागवत ग्रंथ प्रसिध्द । तेथील सार सुबोध ।
गातसे भक्त गोविंद । बालहिताकारणें ॥६७॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।
प्राप्त होईल विद्या धन । ऐसें वरदान व्यासाचें ॥६८॥
इति श्रीलघुभागवत दशमोऽध्याय: ॥१०॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

मंगळवारचे उपास कधी पासून सुरु करावे जाणून घ्या

गोविन्ददामोदरस्तोत्रम्

विष्णुपादादिकेशान्तस्तोत्रम्

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments