Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बांगलादेश : सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांचाही राजीनामा, आंदोलकांनी दिला होता निर्वाणीचा इशारा

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (19:06 IST)
बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशचे न्याय मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी हसन यांचा राजीनामा कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती दिली.
 
हसन यांचा राजीनामा राष्ट्राध्यक्ष कार्यालयात पाठवण्यात आल्याचं, आसिफ नजरुल यांनी सांगितलं.
 
सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांच्याबरोबरच अपील विभागाच्या न्यायाधीशांनी दुपारी एक वाजेपर्यंत राजीनामा द्यावा असा अल्टीमेटम आरक्षणाच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला होता.
 
बीबीसीच्या दक्षिण आशियाच्या प्रतिनिधी समीरा हुसैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे की, शनिवारी सकाळी निदर्शनं करणारे हजारो विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात आले होते.
 
सरन्यायाधीशांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती. या निदर्शनामध्ये शेकडो वकील देखील सहभागी झाले होते.
तर आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाचे समन्वयक आसिफ महमूद यांनी सरन्यायाधीश फॅसिस्ट असल्याचं सांगत न्यायालयाची बैठक थांबवण्याचा आणि सरन्यायाधीशांनी राजीनामा द्यावा यासाठी अल्टीमेटम दिला होता.
 
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काय म्हणाले?
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचे व्यवसाय तसेच त्यांच्यावर हल्ले याबाबत राज्यसभेत भाष्य केले.
एस. जयशंकर बांगलादेशातील सद्यपरिस्थितीवर संसदेत बोलत होते. आधी राज्यसभा आणि नंतर लोकसभेत त्यांनी बांगलादेशातील परिस्थिती आणि भारत सध्या घेत असलेली भूमिका यावर माहिती दिली.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, भारत आणि बांगलादेशचे दृढ संबंध राहिले आहेत. परंतु, सध्याची स्थिती चिंताजनक असून अल्पसंख्यांकांना त्यांच्या व्यवसायांना आणि मंदिरांना लक्ष्य केलं जात आहे.
 
“आमची बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारतीय सीमेवरही अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.”
परराष्ट्रमंत्री पुढे बोलताना म्हणाले, बांगलादेशातील विविध भागात जवळपास 19 लाख भारतीय राहतात. तर, 10 लाखांच्या आसपास भारतीय हे जुलै महिन्यातच भारतात परतले असून सध्या उर्वरित भारतीय विद्यार्थी राहिले आहेत.
“5 ऑगस्टला शेख हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. विमानाने भारतात येण्याची परवानगीही मागितली. त्या काल संध्याकाळी दिल्ली येथे पोहोचल्या आहेत.”
बांगलादेशात जानेवारी महिन्यात झालेल्या सार्वजनिक निवडणुका आटोपताच विरोधांची ही मालिका सुरू झाली, असेही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.
 
विद्यार्थी आंदोलन, हिंसाचार, शेकडो लोकांचा मृत्यू आणि सोमवारी (5 ऑगस्ट) आंदोलकांच्या मोर्च्याची घोषणा यादरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पद आणि देश सोडला.
 
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं देशव्यापी निदर्शनात रूपांतर झालं आणि ते शेख हसीना यांचं सरकार पडण्यास कारणीभूत ठरलं.
 
लष्करानं देशात अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली असली तरी आंदोलन आणि बांगलादेशात पुढे काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
5 ऑगस्टचा दिवस बांगलादेशसाठी ऐतिहासिक दिवस ठरला.
 
शेख हसीना यांची सलग 15 वर्षांची सत्ता आणि त्यांचा पाचवा कार्यकाळ अचानक संपुष्टात आला. हसीना यांना घाईघाईत देश सोडावा लागला.
 
5 ऑगस्टला काय झालं?
4 ऑगस्ट रोजी झालेल्या व्यापक हिंसाचारानंतर 5 ऑगस्टची सुरुवात अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत झाली. तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सोमवार ते बुधवार सुट्टी जाहीर केली होती.
‘ढाका मार्च’मध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी 10 वाजता ढाका येथील सेंट्रल शहीद मिनारजवळ विविध महाविद्यालयं आणि संस्थांमधील लोकांची गर्दी जमली होती.
‘स्टुडंट अगेंस्ट डिस्क्रिमिनेशन मूव्हमेंट’ने या मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी अश्रूधुराचा आणि ध्वनी ग्रेनेडचा वापर करून विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
बांगलादेश सरकारनं 25 जुलैलाच इंटरनेट बंद केलं होतं. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली. मात्र, सोमवारी देशातील इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. ब्रॉडबँड इंटरनेटही बंद करण्यात आले. वृत्तसंस्थाही ऑफलाईन पद्धतीनं काम करत आहेत.
 
पण, कडक बंदोबस्त, दडपशाहीचे प्रयत्न आणि इतर निर्बंध लोकांना घरातून बाहेर येण्यापासून रोखू शकले नाही. शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक रस्त्यावर येऊ लागले.
 
11 वाजेपर्यंत ढाक्यातील जतराबाडी परिसरात हजारो लोकांची गर्दी जमली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात केलेले पोलिस अपुरे पडत होते.
 
इथं चिलखती वाहनांमध्ये स्वार झालेले सैनिकही रस्त्यांवर तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, साउंड ग्रेनेड आणि गोळीबार करुन जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला.
 
त्याचवेळी दुपारी बाराच्या सुमारास ढाका येथील हबीबगंज भागात बोरो बाजाराकडे जाणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत अल्पवयीन मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला. सोमवारचा ‘ढाका मार्च’ रोखण्यासाठी हजारो विद्यार्थी, आंदोलक आणि विरोधी नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मात्र, या सगळ्याला न जुमानता विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि शहीद मिनार येथून शाहबाग परिसरात आले. शाहबागमध्ये रविवारी (4 ऑगस्ट) पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला होता.
 
देशातील झपाट्यानं बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकेर उज्जमान यांनी दुपारी 2 वाजता देशाला संबोधित करण्याची घोषणा केली. लष्करानं एक निवेदन जारी करून लष्करप्रमुखांच्या भाषणापर्यंत लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.
 
दरम्यान, रस्त्यांवरील गर्दी वाढली आणि लाखो लोक ढाक्याच्या रस्त्यावर उतरले.
 
शेख हसीना यांचं देश सोडून पलायन
दुपारी 1.15 च्या सुमारास बांगलादेशमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट पूर्ववत करण्यात आले. ऑफलाइन असलेल्या वेबसाईट्सही लाईव्ह बातम्या देऊ लागल्या. सोशल मीडिया वेबसाईट्सवरील निर्बंधही उठवले जाऊ लागले. असं असलं तरी इंटरनेट पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतेही अधिकृत आदेश आले नाही.
 
दरम्यान, देशाच्या लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मुख्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. नागरी गटांशी संबंधित लोक आणि विचारवंतही या बैठकीत सहभागी झाले होते. ढाका विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्राध्यापक आसिफ नजरुल यांनाही बैठकीला आमंत्रित करण्यात आलं होतं.
 
दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान शेख हसीना त्यांची बहीण शेख रेहाना यांच्यासोबत लष्करी हेलिकॉप्टरमधून गणभवनातून बाहेर पडल्याची बातमी आली. गणभवन येथून हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत शेख हसीना भारताकडे रवाना झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
वृत्तसंस्था एएफपीच्या बातमीनुसार, शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण रेकॉर्ड करायचं होतं, पण त्यांना तसं करण्याची संधी मिळाली नाही.
दुपारी 3.15 वाजता लष्करप्रमुख वाकेर उज्जमान यांनी पंतप्रधानांनी राजीनामा देऊन देश सोडल्याची माहिती दिली. चर्चेनंतर अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. आंदोलकांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असं लष्करप्रमुखांनी सांगितलं.
 
शांततेचं आवाहन करत लष्करप्रमुख म्हणाले की, “देश योग्य पद्धतीने चालवण्यात आपण यशस्वी होऊ.”
 
मात्र, आंदोलक शांत झाले नाहीत. आंदोलकांनी अवामी लीग पक्षाच्या कार्यालयांना आग लावली.
 
बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांच्या पंतप्रधान निवासस्थानी बसवण्यात आलेल्या विशाल पुतळ्यावर आंदोलक चढले. त्यांनी हातोड्यानं हा पुतळा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
दुपारपर्यंत ढाका शहर अक्षरशः आंदोलकांनी ताब्यात घेतलं. सरन्यायाधीशांच्या घराची तोडफोड करण्यात आली. पंतप्रधानांचे निवासस्थान, संसद भवन आणि स्मारकांमध्येही आंदोलक घुसले.
 
धनमंडी परिसरातील सुधा सदन या प्रमुख निवासस्थानाला आग लावून ते लुटण्यात आलं. शेख हसीना सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले झाले, पक्षाची कार्यालयं उद्ध्वस्त करण्यात आली.
 
संध्याकाळी 6 वाजता लष्करानं शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणं 6 तासांसाठी स्थगित केल्याची माहिती दिली.
अंतरिम सरकारची रूपरेषा ठरवण्यासाठी 24 तासांची मुदत
दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना संध्याकाळी 6.15 च्या सुमारास गाझियाबादच्या डासना येथील भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर C-130 विमानातून विमान उतरल्या.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी संध्याकाळी साडेसात वाजता शेख हसीना यांची भेट घेतली. बांगलादेशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सोमवारी (5 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा उच्चस्तरीय बैठक घेतली.
हसीना यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतरही बांगलादेशातील परिस्थिती तणावपूर्ण होती.
माजी पंतप्रधान आणि शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी खालिदा झिया यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, शेख हसीना यांचा मुलगा आणि सल्लागार साजिब वाजेद यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांची आई सुरक्षेसाठी देश सोडून गेली आणि ती कधीही राजकारणात परतणार नाही.
 
वादग्रस्त सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर शेख हसीना यांनी 11 जानेवारी रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. महिनाभरापूर्वीपर्यंत शेख हसीना यांची सत्तेवरील मजबूत पकड अशी ढिली होईल, असं सांगणं कठीण होतं.
 
सोमवारी बांगलादेशच्या राजकारणानं आणि परिस्थितीनं नवं वळण घेतलं. पुढे काय होणार हे अजूनही स्पष्ट नाही.
 
अंतरिम सरकारची रूपरेषा ठरवण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी 24 तासांची मुदत दिली आहे.
 
अंतरिम सरकारमध्ये कोण असेल आणि विद्यार्थी संघटना या सरकारला स्वीकारतील की नाही, यावर बांगलादेशात पुढे काय होईल हे मुख्यत्वे अवलंबून असेल.
 
4 ऑगस्टच्या हिंसाचारात 94 जणांचा मृत्यू
1 जुलैपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर 21 जुलै रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण जवळपास रद्द केलं होतं.
मात्र या निर्णयानंतरही बांगलादेशातील विद्यार्थी आणि लोकांचा संताप कमी झाला नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली.
विद्यापीठे आणि महाविद्यालयांपासून सुरू झालेले आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि विरोधी पक्षही रस्त्यावर उतरले.
विद्यार्थी संघटनांनी 4 ऑगस्टपासून संपूर्ण असहकार आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती.
सरकारनं ही निदर्शनं कठोरपणे दडपण्याचा प्रयत्न केला. गोळ्या झाडल्या, सैन्य रस्त्यावर उतरले, पण लोक थांबले नाहीत.
 
4 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात 94 जणांचा मृत्यू झाला होता. विद्यार्थी आंदोलन सुरू झाल्यापासून मृतांची संख्या तीनशेच्या पुढे गेली आहे.
रविवार (4 ऑगस्ट) हा आंदोलनाचा सर्वात हिंसक दिवस ठरला. जिल्हा पोलिस मुख्यालयावर जमावाने केलेल्या हल्ल्यात 13 पोलिसांचाही मृत्यू झाला.
आंदोलक आणि पोलिसांमध्येच हिंसाचार झाला असं नाही तर सत्ताधारी अवामी लीगचे कार्यकर्तेही त्यात सामील झाले.
देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक समोरासमोर आली. अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती आणि व्यापक हिंसाचार असूनही सोमवारी ढाका शहराकडे मोर्चा काढण्याच्या घोषणेपासून आंदोलक किंवा विद्यार्थी संघटना मागे हटले नाही. सरकारने राजधानीच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात केले.
मात्र कडक कर्फ्यू आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होऊनही लोक थांबले नाहीत आणि सोमवारी शेख हसीना यांना पायउतार होऊन देश सोडावा लागला.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

नंदुरबारमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना मृत्यू

श्रीलंकेने बांगलादेशकडून 7 धावांनी पराभूत झालेला सामना जिंकला

कुमार नितेश पॅरा बॅडमिंटनमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी नामांकित

सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला थोडक्यात बचावले

पुढील लेख
Show comments