लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार असल्याचे चीन म्हणत जरी असला तरी दुसरीकडे भारताला धमकीही देण्यात येत आहे. चीन सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून पुन्हा एकदा भारताला धमकी देण्यात आली आहे. भारताचे पाकिस्तान आणि नेपाळसोबतही वाद सुरू असल्याकडे “ग्लोबल टाइम्स“ने लक्ष वेधले आहे. आमच्या सोबतीला पाकिस्तान, नेपाळचे सैन्य येऊ शकते आणि त्यामुळे तणाव वाढल्यास भारताला तीन आघाडय़ांवर लढावे लागणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी रात्री, गलवान खोर्यात झालेल्या हिंसाचारामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. तर, दुसरीकडे चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असून अप्रत्यक्षपणे धमकीही दिली जात आहे. ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारताशी संघर्ष करण्यास चीन पुर्णपणे सज्ज असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. भारताने आपल्या सैन्याला आवर घालावा. अन्यथा कोरोनाच्या संकटात मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे चिनी विश्लेषकांनी म्हटले आहे.
“शांघाई अकादमी ऑफ सोशल सायन्स“चे के हू झियोंग यांनी सांगितले की, भारताचे चीन, पाकिस्तान आणि नेपाळसोबत वाद सुरू आहे. पाकिस्तान हा चीनचा विश्वासू सहकारी आहे. तर , नेपाळचे आणि चीनचे जवळचे संबंध आहेत. दोन्ही देश चीनच्या बेल्ट ऍण्ड रोड प्रकल्पातील सहकारी आहेत. आणखी तणाव वाढल्यास भारताला तीन आघाडय़ांवर लढावे लागणार असल्याचा इशारा झियांग यांनी दिला. भारताने आपल्या अमेरिका समर्थक लॉबीला आवर घातला पाहिजे. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चीनच्या लष्कराने तिबेटमध्ये युद्ध सराव सुरु केला असल्याचे “ग्लोबल टाइम्स“ने म्हटले आहे.
दरम्यान, गलवान खोर्यातील हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी फोनवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी गलवान खोर्यातील वाद संवादातून सोडवण्याची मागणी केली. शक्य तेवढय़ा लवकर ही परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली आहे. तर दुसरीकडे चीन परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय सैन्यालाच जबाबदार धरत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. एस जयशंकर यांनीही कणखर शब्दात भारताची बाजू मांडली.