Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडोनेशिया : जगातल्या सर्वांत मोठ्या मस्लिम देशावर भारत, हिंदू आणि बौद्ध धर्माचा असा आहे प्रभाव

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (07:18 IST)
जगातल्या सगळ्यांत मोठ्या मुस्लिम देशात भारताने स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलंय.
इंडोनेशिया हा देश 17 हजारपेक्षा अधिक छोट्या छोट्या बेटांवर पसरला आहे. या देशात 700 हून अधिक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि 1340 अधिक जातींचे समूह या देशात एकत्र नांदतात.
 
जगभरातल्या वैविध्यपूर्ण देशांमध्ये इंडोनेशियाच्या या भूभागाची गणना होते. आशिया खंडातल्या दोन महान संस्कृतींच्या मधोमध इंडोनेशिया बेटांचा हा समूह वसलेला आहे.
 
इसवीसनपूर्व 290 पासून ते पंधराव्या शतकापर्यंत भारताच्या सांस्कृतिक प्रभावाखाली असणारा देश म्हणून इंडोनेशिया ओळखला जात होता. या काळात, इंडोनेशियाच्या स्थानिक राजकीय व्यवस्थेवर हिंदू आणि बौद्ध धर्मांचा खोलवर प्रभाव पडलेला दिसून येतो.
 
भारतीय उपखंडाच्या आग्नेय भागात असलेल्या राजवंशांनी, विशेषत: चोल साम्राज्याने (इसवीसनपूर्व 300 ते इसवीसन 1279 पर्यंत), जावावर राज्य करणाऱ्या राजांशी व्यापार, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध प्रस्थापित केले होते.
 
यामुळेच इंडोशिया भारताच्या सांस्कृतिक प्रभावाखाली आला होता. या संपूर्ण देशाचं भारतीयकरण होत चाललं होतं.
 
भारतीय भाषांचा इंडोनेशियावर पडलेला प्रभाव
भारताचा इंडोनेशियावर नेमका कसा प्रभाव पडला होता? हे जाणून घ्यायचं असेल तर इंडोनेशियात बोलल्या जाणाऱ्या भाषांवर भारतीय भाषांचा असणारा प्रभाव समजून घेतला पाहिजे.
 
इंडोनेशियाच्या बेटांवर ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलल्या जातात.
 
मात्र इंडोनेशियाच्या जावा बेटावर बोलली जाणारी जावानीज भाषा बोलणारे लोक 'वालुकु (नांगरणे)' या तामिळ शब्दाचा अगदी बेमालूमपणे वापर करतात.
 
भारतातील प्राचीन भाषांचा 'जुन्या जावा' भाषेच्या लिपी आणि अक्षरांवर स्पष्टपणे प्रभाव पडलेला दिसून येतो. जावा लिपी आणि या भाषेतली अक्षरं प्राचीन भारतीय भाषांवरून प्रेरित आहेत.
 
प्राचीन भारतीय भाषांमधूनच जुन्या जावा भाषेत लिहिलं गेलेलं साहित्य, त्या भाषेतील प्रार्थना आणि शिलालेख यांची प्रेरणा घेण्यात आलेली आहे.
 
संस्कृत भाषेतील कवितेत वापरल्या गेलेल्या श्लोकांप्रमाणे, जुन्या जावा भाषेत हुबेहूब लिहिला गेलेला साहित्यप्रकार म्हणजे 'ककाविन.'
 
एखादं कथन करण्यासाठी या भाषेत ककाविन रचलं गेलं.
 
महाभारत आणि रामायणातल्या गद्यरचनेप्रमाणे जुन्या जावा भाषेत 'पर्व' लिहिण्यात आले आहेत.
 
वेगवेगळ्या पूजापाठासाठी वापरण्यात येणाऱ्या संस्कृत मंत्रांप्रमाणेच जावा भाषेतही मंत्र लिहिले गेले.
 
आपल्या प्राचीन संस्कृतीत ज्या प्रमाणे कांस्य आणि दगडावर लिहिलेले राजकीय फर्मान सापडतात त्याचपद्धतीने जावा भाषेतही अनेक कांस्य आणि शिलालेख आढळून येतात.
 
आजच्या काळातलं इंडोनेशियाचं ब्रीदवाक्य आहे 'भिन्नेका तुंगल इका (विविधतेत एकता)'. इंडोनेशियाचं हे ब्रिदवाक्यच बौद्ध आणि हिंदू या दोन महान धर्मांची देणगी आहे.
 
इंडोनेशियावर वेगवेगळ्या काळात बौद्ध आणि हिंदू धर्मातील राजे आणि राण्यांनी राज्य केलं आहे.
 
उदाहरणार्थ महाराणी गायत्री राजपत्नी यांचं इसवीसन 1276 ते 1350 याकाळात इंडोनेशियावर राज्य होतं.
 
इसवीसन 1293 ते 1309 याकाळात मजापहित राज्याचे संस्थापक असणाऱ्या केर्तराजसा जयवर्धना यांच्या त्या पत्नी होत्या.
 
त्यांचे नातू हयाम वरुक (इसवीसन 1350-89) हे शैव पंथाला मानणारे होते. 'विविधतेतून एकता' ही संकल्पना 14व्या शतकात एम्पू तांतुलारने जुन्या जावामध्ये लिहिलेल्या सुत्सोम ककाविनमधून घेतली आहे.
 
जेंव्हा रवींद्रनाथ टागोर इंडोनेशियाला पोहोचले...
जावा बेटांवर असणारे ज्वालामुखी हे 'हिमालयाची सावली' असल्याचं म्हटलं जातं. हा विचारदेखील भारताकडून मिळालेल्या सांस्कृतिक वारशाचा एक ज्वलंत पुरावा आहे.
 
आजच्या घडीला इंडोनेशियात राहणाऱ्या लोकांचा डीएनए सुद्धा भारतीय आहे. या डीएनएपैकी सरासरी सहा टक्के भाग हा भारतीय वंशाचा आहे.
 
एवढंच काय तर 'असेह' आणि 'बाली'सारख्या बेटांवर राहणाऱ्या इंडोनेशियन लोकांच्या डीएनएमध्ये 10 टक्के भाग हा भारतीय वंशाचा आहे.
 
भारत हिंदी महासागरातल्या याच व्यापारी मार्गांवरून वस्तू, संस्कृती, रीतिरिवाज यांची इंडोनेशियासोबत देवाणघेवाण करत आलेला आहे.
 
दक्षिण बालीतल्या शाही दरबारांवर ब्राह्मणी प्रभावाचा वारसा स्पष्टपणे दिसून येतो.
 
एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाषा, संस्कृती आणि धर्माचा प्रभाव पडूनही जावा बेटांवर राहणाऱ्या लोकांनी कधीच नक्कल केल्याचं दिसत नाही.
 
इंडोनेशियाच्या शेजारी असणारं सियाम बेट मात्र याबाबत अगदी उलट होतं. 1932 नंतर सियाम बेटांना थायलंड म्हटलं जाऊ लागलं.
 
सियाममध्ये त्याच्या शेजारी असणाऱ्या ब्रह्मदेश आणि चीनचे सांस्कृतिक प्रभाव थेट स्वीकारले गेले आणि स्थानिक सौंदर्यशास्त्र जोडण्यासाठी कोणतेही बदल केले गेले नाहीत.
 
त्याच वेळी, जावाच्या लोकांना कला आणि अध्यात्माच्या क्षेत्रात भारतातून जी प्रेरणा मिळाली, त्यातून त्यांनी स्वतःच्या भूमीच्या सुगंधावर आधारित स्वतःची कला आणि संस्कृती यांची निर्मिती केल्याचं दिसतं.
 
इंडोनेशियातल्या स्थापत्यशास्त्र, साहित्य आणि धार्मिक अविष्कारांवर भारतीय प्रभाव दिसून येतो. रवींद्रनाथ टागोरांनी मात्र या प्रभावाचं अगदी सुंदर वर्णन केलंय.
 
जावाची पहिली सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था असणाऱ्या बोएडी ओएटोमो (1908-42) या संस्थेचे पाहुणे म्हणून रवींद्रनाथ टागोर 1929 मध्ये पहिल्यांदा तिथे गेले होते. याच दौऱ्यात त्यांनी त्या देशातली संस्कृती अगदी जवळून बघितली.
 
जावा बेटांवरील भव्य प्राचीन हिंदू आणि बौद्ध स्मारकं पाहिल्यानंतर टागोरांनी म्हटलं होतं की, 'मला येथे सर्वत्र भारत दिसतो आहे, तरीही तो त्याची ओळख नीट पटत नाहीये!'
 
याचा अर्थ असा की जरी दक्षिण मध्य जावामधील हिंदू आणि बौद्ध स्मारकं काळजीपूर्वक पाहिल्यानंतर टागोरांना जावाच्या प्रत्येक कोपऱ्यात भारतीय सभ्यतेच्या खुणा दिसत होत्या.
 
तरीदेखील त्या प्रभावाखाली राहूनही सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत मोठे क्रांतिकारी बदल केलेले त्यांना दिसले.
 
शेक्सपियरच्या 'द टेम्पेस्ट' नाटकातील एरियल या पात्राने म्हटल्याप्रमाणे, 'नवीन रुपातले विचित्र पण गौरवशाली आणि समृद्ध करणारे हे बदल केले गेले.'
 
वसाहतकाळात झालेले बदल: ब्रिटीश शासन (1811-16) आणि त्यानंतरची गोष्ट
इंडोनेशिया युरोपियन वसाहत होण्यापूर्वीच्या काळात, दक्षिण आशियाई आणि विशेषतः भारतीय संस्कृतीचा ठसा आणि प्रेरणा त्या देशात सगळीकडे दिसून येत होती.
 
मात्र आपण जसजसे इंडोशियातील वसाहतकाळाकडे सरकतो तसतसे इंडोनेशियामध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळतात.
 
गव्हर्नर जनरल म्हणून मार्शल हर्मन विलेम डॅनडेल्स (1762-1818) यांच्या काळात या बदलांची सुरुवात झाली.
 
मार्शल हर्मन यांना नेपोलियनने गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले आणि जानेवारी 1808 ते 1811 पर्यंत ते या पदावर काम करत होते.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षाचा हा काळ होता. फ्रेंच राज्यक्रांती (1792-1802) आणि त्यानंतरची नेपोलियन युद्ध (१८०३–१८१५) या घटना जगाला पहिल्या महायुद्धासारखा अनुभव देणाऱ्या होत्या.
 
याचकाळात नौदलाची युद्धं घडत होती. युरोपीय देशांनी त्यांच्या वसाहती बनवण्यासाठी जगभरातील नवनव्या देशांचा शोध सुरु केला होता.
 
यानंतर अर्जेंटिना ते दक्षिण पूर्व आशियापर्यंतच्या देशांवर युरोपियन देशांकडून हल्ले करण्यात आले
 
नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅमपासून सुमारे 12 हजार 600 नॉटिकल मैल अंतरावर असलेली जावा बेटं, त्याकाळी घडलेल्या युरोपियन युद्धाचं प्रमुख केंद्र बनली होती.
 
1811 च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ब्रिटनने 12 हजार सैनिकांसह जावावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या सैनिकांमध्ये अर्ध्याहून अधिक ब्रिटिश सैनिक हे बंगाली होते.
 
घोड्यावर स्वार झालेल्या बंदूकधरी सैनिकांच्या काही तुकड्या आणि अभियंते हे भारतातल्या चेन्नईमधूनही तिथे गेले होते.
 
केवळ जावा बेटांवर हल्ला करण्यासाठी भारतातील सैनिकांच्या या तुकड्या ‘वॉलंटरी' बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या होत्या.
 
विशेषतः त्यांपैकी बंगाल लाइट इन्फंट्री व्हॉलंटियर बटालियन (LIVB) ब्रिटनसाठी ओझं बनली होती.
 
भारतीय सैनिक या युद्धात उतरले होते तेंव्हा...
ब्रिटीश लेफ्टनंट गव्हर्नर थॉमस स्टॅमफोर्ड रॅफल्स (कार्यकाळ 1811-16) या बंगाली शिपायांबाबत बोलताना म्हणाले होते की, "जावा बेटांवर राहणाऱ्या लोकांसाठी बंगाली सैनिकांच्या सवयी आणि त्यांचं वागणं प्रचंड अपमानजनक होतं. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा."
 
'ग्रेट बॅरेक्स ऑफ द ईस्टर्न सी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातून हे सैनिक भरती करण्यात आले होते.
 
19 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ब्रिटनने भारतातून आणलेल्या सुमारे अडीच लाख भाडोत्री सैनिकांची फौज इंडोनेशियात उभी झाली होती.
 
भारतातून भरती झालेल्या या सैनिकांना संपूर्ण आशिया आणि जगाच्या मध्य पूर्व (इजिप्त आणि सीरिया) भागामध्ये लढण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.
 
जावा बेटांवर इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी गेलेल्या भारतीय सैनिकांनी तिथे तब्बल चार दशकं मर्दुमकी गाजवली.
 
आधुनिक युगात दोनवेळा भारतीय सैनिकांनी इंडोनेशियात घडलेल्या रक्तरंजित युद्धांमध्ये सहभाग घेतला होता.
 
पहिल्यांदा 26 ऑगस्ट 1811 रोजी आजच्या जकार्ताच्या जतिनेगारामध्ये (1942 पूर्वी बटाव्हियाचा मेस्टर कॉर्नेलिस) झालेल्या युद्धात भारतीय सैनिक सहभागी झाले होते.
 
यानंतर भारतीय सैनिकांनी, 10 ते 27 नोव्हेंबर 1945 दरम्यान, पूर्व जावाच्या सुराबायामध्ये इंग्रजांकडून रक्तरंजित युद्ध लढले.
 
यातल्या पहिल्या युद्धात इंग्रजांविरोधात लढणाऱ्या डच आणि फ्रेंच तुकड्यांचे अर्ध्याहून अधिक सैनिक मारले गेले होते.
 
तर जावा बेटांवर राहणाऱ्या मद्रासी आणि स्थानिक हॅल्प्ट्रोपेन (इंग्रजांच्या विरोधात लढणारे स्थानिक सैनिक) तुकड्यांचे 80 टक्के सैनिक मृत्युमुखी पडले होते. या वसाहतवादी युद्धासाठी फ्रेंच गव्हर्नर जनरल मार्शल हरमन यांनी 18,000 सैनिकांची फौज उभी केली होती.
 
या सहा आठवड्यांच्या काळात (4 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 1811) तब्बल बारा हजारांहून अधिक सैनिक या युद्धात कामी आले होते.
 
जतिनेगारा/मिस्टर कॉर्नेलिसमध्ये सैनिकांचे इतके मृतदेह जमा झाले होते की त्यांना सामूहिक कबरीत दफन करावे लागलं होतं. शेजारच्या काम्पुंग मेलायुच्या लोकांनी याला 'रवा बांगके' (मृतदेहांची दलदल) असं नाव दिलं होतं.
 
नंतर, जावाचे गव्हर्नर बनलेल्या अली सादिकिन (कार्यकाळ 1966-77) यांनी या कुप्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलून 'रवा मवार', म्हणजेच गुलाबाची दलदल असं ठेवलं होतं. नावात केलेला हा बदल भूतकाळातील कटू आठवणींच्या जखमांवर एक फुंकर घालण्याचा त्यांच्या हा प्रयत्न होता.
 
दुसरा संघर्ष म्हणजे 1945 मध्ये सुराबाया येथे झालेलं युद्ध. हे भारतीय सैनिकांचा सहभाग असलेलं शेवटचं युद्ध होतं. वसाहतकाळातील हा शेवटचा असा प्रसंग होता जेंव्हा भारतीय सैनिकांना इंग्रजांच्या बाजूने एखाद्या युद्धात लढावं लागलं होतं.
 
या युद्धात सहभागी झालेल्या प्रत्येक बाजूचं प्रचंड नुकसान झालं होतं. याबाबत बोलताना इंडोनेशियातील राष्ट्रवादी नेते डॉ. रुस्लान अब्दुलगानी म्हणतात की, "या युद्धामुळे केवळ सुराबायाचाच इतिहास बदलला नाही तर संपूर्ण इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या युद्धाला कलाटणी मिळाली."
 
बंगाली सैनिकांचे बंड
आधी आपण 19 व्या शतकातील युद्धाबद्दल बोललं पाहिजे. जावा बेटांवरील 1811 ते 16 या पाच वर्षांच्या इंग्रजी राजवटीमध्ये इंग्रजांना हे लक्षात आलं होतं, की या देशातला पाच हजार सैनिकांचा तळ राखण्यासाठी बंगाली सैनिकांवर विश्वास ठेवणं त्यांना महागात पडलं होतं.
 
19 ऑगस्ट 1816 ला इंडोनेशियाच्या बटावियामधून इंग्रजी राजवटीचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि डच सैनिकांनी पुन्हा एकदा जावा बेटांचा ताबा मिळवला. पण या पाच वर्षांचा काळात इंग्रजांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.
 
ऑक्टोबर-नोव्हेंबर 1815 मध्ये तेथे तैनात असलेल्या बंगालच्या शिपायांनी बंड केलं होतं. दक्षिण मध्य जावामधील योग्याकर्ता आणि सुराकर्ता याठिकाणी ब्रिटिश सैन्यातील बंगाली सैनिकांनी केलेल्या या बंडाला 'सैनिकी कट' (शिपाई षडयंत्र) म्हणून ओळखलं जातं.
 
बंगाली सैनिकांनी केलेल्या या बंडामुळे ब्रिटिश सरकार पुरतं हादरून गेलं होतं. या बंडामध्ये सुराकर्ताचा शासक, सुनन पाकू बुवोनो IV (राज्य 1788-1820) आणि बंगाल लाइट इन्फंट्री व्हॉलंटियर बटालियनमधील सुमारे 800 सैनिक सहभागी झाले होते.
 
1811 पासूनच योग्याकर्ता आणि सुराकर्ता येथील सैनिक तळांवर हे बंगाली सैनिक काम करत होते. या सैनिकी कटाचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे 'जावा बेटांवर काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी आणि इतर युरोपियन नागरिकांना मारून टाकणे.'
 
युरोपीय शासकांच्या तावडीतून 'सुनान'ला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या बदल्यात बंगाल लाइट इन्फंट्री व्हॉलंटियर बटालियनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्या भागाचा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं जाणार होतं.
 
याशिवाय, पश्चिम जावा आणि उत्तरेकडील किनारपट्टीवर असणाऱ्या जिल्ह्यांवर ब्रिटिश भारतीय सैनिकांचे नियंत्रण असणार होतं. सुराकर्ताचा शासक सुनन याने आपल्या एका मुलीचं लग्न या या तुकडीतील एका सुभेदारासोबत करण्याचं वचन दिलं होतं अशाही चर्चा होत्या.
 
यामुळेच जावा बेटांवर राज्य करणाऱ्या शासक वर्गामध्ये त्या देशाच्या हिंदू आणि बौद्ध इतिहासाबाबत आणि भारतीय वारशाबाबत आवड निर्माण झाली असावी.
 
उदाहरणार्थ, योग्याकार्ताचा राजकुमार प्रिन्स दिपोनेगोरो (1785-1855) याने जवळपासच्या मंदिरांतून अनेक मूर्ती त्याच्या महालात आणून ठेवल्या होत्या. तसंच त्याचा ध्यानधारणेसाठीचा वेळ तो या मुर्त्यांच्या सानिध्यात घालवत असे.
 
डच राजवटीविरोधात जावा बेटांनी लढलेल्या युद्धाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून प्रिन्स दिपोनेगोरो यांना ओळखलं जातं.
 
ज्याकाळात या बंगाली सैनिकांनी बंड केले त्याकाळात इंडोनेशियामध्ये काम करत असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. ब्रिटिश सैन्याच्या नियमाप्रमाणे 800 देशी सैनिकांच्या नियंत्रणासाठी कमीत कमी सात इंग्रज अधिकारी नियुक्त केलं जाणं बंधनकारक होतं.
 
मात्र त्याकाळी तिथे नियुक्त करण्यात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची संख्या याहीपेक्षा कमी होती. यामुळेच कदाचित या बंडाचा सुगावा लागण्यासाठी ब्रिटिशांना खूप उशीर झाला. मात्र इंग्रजांनी अतिशय वेगाने उपाययोजना करून बंडात सहभागी झालेल्या सैनिकांवर कठोर कारवाई केली.
सतरा सैनिकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं. तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा ही मुघल काळात प्रचलित होती. याशिवाय इतर पन्नास सैनिकांना बेड्या ठोकून बंगालला परत पाठवण्यात आलं.
 
मात्र जावा बेटांवर तैनात असलेले ते काही शेवटचे भारतीय सैनिक नव्हते. इंग्रजांच्या तुकडीत भरती झालेले अनेक भारतीय सैनिक त्याकाळी नोकरी सोडून त्या देशाच्या इतर भागात पळून गेले होते.
 
पळून गेलेल्या या सैनिकांनी जावा बेटांवरील स्थानिक कुटुंबातील मुलींसोबत लग्नं केली. यापैकी बरेच सैनिक माहूत बनले, किंवा योग्यकर्ताच्या सुलतानासाठी काम करणाऱ्या अंगरक्षकांच्या तुकडीत ते सामील झाले.
 
राजकुमार दिपोनेगोरो यांनी त्यांच्या 'बाबड' नावाच्या आत्मचरित्रामध्ये यापैकी एका बंगाली सैनिकाचा उल्लेख केलेला आहे.
 
नूरनगली नावाच्या एका बंगाली हवालदाराचा उल्लेख या पुस्तकात 'बंगाली हकीम' म्हणून केलेला आढळतो. हाच हकीम पुढे जाऊन राजकुमार दिपोनेगोरो यांचा खाजगी डॉक्टर बनला होता.
 
त्याचकाळात, जावामध्ये स्थायिक झालेले इतर भारतीय शिपाई 1825 ते 30 याकाळात लढलेल्या जावा युद्धादरम्यान दोन्ही बाजूंनी म्हणजे डच आणि जावा सैन्याकडून सहभागी झाले होते.
 
ज्यावेळी इंग्रजांनी या बेटांवर ताबा मिळवला त्याचकाळात एका माजी भारतीय सैनिकाने बोयोलालीमध्ये दुधाचा व्यापारही सुरु केला होता. त्याच्या डेअरीमध्ये तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बनवले जात होते. ती प्रक्रिया आजतागायत सुरू आहे.
 
1824 मध्ये, जावामध्ये युद्ध सुरू होण्याच्या एक वर्ष आधी, बंगाल आणि तेथील सैनिक हे पुन्हा एकदा इंग्रजांची डोकेदुखी बनले होते.
 
याचं कारण म्हणजे आर्थिक अडचणींमुळे नेदरलँड-इंडिज सरकारने कलकत्ता येथील जॉन पाल्मर अँड कंपनी या खासगी बँकेकडून 60 लाख नाणी (2023 नुसार सुमारे 350 दशलक्ष डॉलर्स) उधार घेतली होते.
जावाचा सगळ्यांत जास्त सुपीक प्रांत असलेल्या केडूचा भूभाग बँकेकडे गहाण ठेवून हे कर्ज त्यांना दिलं गेलं होतं. राजकुमार दिपेनेगेरोच्या सैन्याने डच सैनिकांना जावा बेटांवरून हुसकावून लावण्यास एव्हाना सुरुवात केली होती आणि 1826-27 दरम्यान या बँकेनं दिलेलं कर्ज हा प्रमुख मुद्दा बनला होता.
 
डचांना दिलेलं कर्ज बुडीतखात्यात निघण्याच्या भीतीने जॉन पाल्मर अँड कंपनीने बंगालचे तत्कालीन गव्हर्नर जनरल (1834 नंतरचे भारताचे गव्हर्नर जनरल), अर्ल अॅमहर्स्ट (राज्य 1823-28) यांना डच सैन्याच्या मदतीसाठी जावामध्ये दोन हजार सैनिक पाठवण्याबाबत विचार करण्यास सांगितलं होतं. नंतर बँकेच्या या अर्जावर ब्रिटनच्या संसदेतही चर्चा झाली होती.
 
मात्र, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज कॅनिंग (1822-27) यांच्या सूचनेवरून बँकेचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. जावाच्या युद्धात बंगाल प्रेसिडेन्सीची लष्करी संसाधनं वापरणं चुकीचे ठरेल, हे ब्रिटिश संसदेने मान्य केलं होतं.
 
सुराबायाची लढाई (10 ते 27 नोव्हेंबर 1945) आणि भारतीय राष्ट्रवादी चळवळ; इंग्रज राजवटीचा अस्त
जावा युद्धाच्या सुमारे 125 वर्षांनंतर, ब्रिटनला पुन्हा एकदा लक्षात आलं की इंडोनेशियातील राष्ट्रवादी शक्तींच्या विरोधात भारतीय सैन्याचा वापर केल्याने त्यांचं किती नुकसान होऊ शकतं.
 
25 ऑक्टोबर 1945 रोजी, 4,000 भारतीय सैनिकांची एक तुकडी सिंगापूरहून सुराबाया येथे पोहोचली होती. या ब्रिगेडची कमान ब्रिगेडियर जनरल ऑबर्टिन वॉल्टर सॉदर्न माल्बी (1899-1945) यांच्या हाती होती. या अशांत शहरात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती.
 
17 ऑगस्ट 1945 रोजी राष्ट्रपती सुकर्णो आणि उपराष्ट्रपती हट्टा यांनी जकार्ता येथे स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केलेली होती. यानंतर, 22 ऑगस्ट 1945 पासून, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विविध संघटनांनी (स्ट्रिज्ड ऑर्गनायझेशन्स) पूर्व जावाच्या या शहरात त्यांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष सुरू केला.
 
या संघटनांचं नेतृत्व तरुणांच्या हातात होतं. या आंदोलनाला प्रचंड यश मिळत गेलं. ऑक्टोबरच्या सुरुवातीस, सुराबाया शहराच्या जुन्या भागावर स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण वर्चस्व मिळवलं होतं. त्यांच्यासमोर जपानी सैन्य हतबल दिसत होतं.
 
याव्यतिरिक्त, या तरुणांनी गुबेंगमधील जपानी नौदलाच्या शास्त्रागारामधून मोठ्या प्रमाणात दारूगोळा लुटला आणि तो स्थानिक लोकांमध्ये वितरित केला होता.
 
ब्रिगेडियर जनरल मालेबी यांना या गोष्टींची माहिती नव्हती. 23 व्या भारतीय विभागाच्या इतिहासकाराच्या शब्दात सांगायचं झालं तर, "ब्रिगेडियर मालेबी यांनी अनावधानाने मधमाशांच्या पोळ्यात हात घातला होता."
 
महत्त्वाच्या इमारती आणि तळांवर लक्ष ठेवता येईल असं त्यांना वाटत होतं म्हणून मालेबी यांनी त्यांच्या 4,000 सैनिकांना कंपनी (100) आणि प्लाटून (30) तुकड्यांमध्ये विभागलं होतं.
 
एका आठवड्याच्या आत, मालेबीच्या सैन्याला तानजुंग पेराक बंदर परिसरातून माघार घ्यावी लागली आणि स्वातंत्र्यसैनिकांसमोर हार पत्करावी लागली. हे युद्ध थांबवण्याच्या वाटाघाटी करण्यासाठी मालेबी त्यांच्या लिंकन कारमध्ये बसून आले तेंव्हा एका पेमुडा स्वातंत्र्यसैनिकाने त्यांच्यावर गोळी झाडली आणि ब्रिगेडियर मालेबी यांचा 30 ऑक्टोबर 1945 रोजी मृत्यू झाला.
 
इंग्रजांनीही बदला घेण्यास उशीर केला नाही. 10 नोव्हेंबर 1945 पर्यंत, मेजर जनरल सर रॉबर्ट मानसॉर्ग (1900-1970) यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश भारतीय सैन्याची 5वी तुकडी सुराबायाला पोहोचली होती. या तुकडीमध्ये रणगाडे आणि लढाऊ विमानं देखील होती.
 
पुढील दोनच आठवड्यांच्या(10 ते 27 नोव्हेंबर 1945) काळात या ब्रिटिश तुकडीने युद्ध लढून सुराबाया शहरावर पुन्हा ताबा मिळवला.
 
27 नोव्हेंबरला ही लढाई संपली तेंव्हा सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या शहरातील एक तृतीयांश लोक अक्षरशः बेघर झाले होते. आणि, या युद्धात सुमारे 16 हजार पेमुडा आणि इंडोनेशियन सैनिक मारले गेले.
 
याकाळात सुमारे वीस हजार सामान्य लोकांचाही मृत्यू तिथे झाला होता. या युद्धात 588 इंग्रज आणि भारतीय लोक मरण पावले होते. शाही ब्रिटिश सैन्याने लढलेले हे शेवटचे रक्तरंजित युद्ध होते. रुस्लान अब्दुलगानी यांनी सांगितल्याप्रमाणेच या युद्धाचा परिणाम अतिशय भयंकर होता.
 
हे सगळं नेमकं कसं घडलं होतं?
15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने बिनशर्त आत्मसमर्पण केल्यानंतर, नेदरलँड्स आणि ईस्ट इंडिजच्या पूर्वीच्या वसाहतींची जबाबदारी अमेरिकेचे जनरल डग्लस मॅकआर्थर यांच्या दक्षिण पश्चिम पॅसिफिक कमांडकडून ब्रिटिश अॅडमिरल लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांच्या दक्षिण पूर्व आशिया कमांडकडे हस्तांतरित करण्यात आली.
 
माउंटबॅटन यांना जावामधील परिस्थितीची अजिबात कल्पना नव्हती. जे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं:
 
"मी गुप्तचर विभागाच्या कोणत्याही अहवालाशिवाय दक्षिण-पश्चिम पॅसिफिक भागातल्या नेदरलँड्स आणि ईस्ट इंडीजला माझ्या नेतृत्वाखाली घेतलं होतं. मला (माउंटबॅटन) जावामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची कोणतीच माहिती देण्यात आलेली नव्हती."
 
"इंडोनेशियामध्ये युद्धाच्या आधीपासून एक चळवळ चालू होती याची माहिती मला होती. तसंच या चळवळीला त्या देशातील बुद्धिवंतांचं समर्थन मिळत असल्याचंही मला माहित होतं. यापैकी डॉक्टर टिजिप्टो मंगोएनकोएसोएमो, सुवार्दी सुरयानिनग्राट/ की हाजदार देवांतारा आणि ईएफई डोउवेस डेक्कर यांच्यासारख्या विचारवंतांना त्यांनी केलेल्या कामांमुळे देश सोडून जावं लागलं होतं.
 
मात्र जपानच्या ताब्यात असताना या चळवळीचं काय झालं याची मला काहीच कल्पना नव्हती. एनइआयचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ. एच.जे. व्हॅन मूक (1894-1965; कार्यकाळ 1942-48) हे 1 सप्टेंबर रोजी कॅंडी (सिलोन) येथे आले.
 
जावा पुन्हा ताब्यात घेताना जपानी सैनिकांना ओलीस ठेवण्याखेरीज इतर कोणतीही अडचण येईल याची कल्पना त्यांनी मला दिली नव्हती."
 
ही गोपनीय माहिती मिळवण्यात आलेल्या अपयशाची किंमत इंग्रज आणि इंडोनेशियात राहणाऱ्या नागरिकांना पुढे कशी चुकवावी लागले ही एव्हाना आपल्याला कळलंच आहे.
 
भारतीय सैनिकांचं पुढे काय झालं?
सुराबाया येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या हातून मारले गेलेले ब्रिगेडियर मालेबी हे स्वत: ब्रिटिश भारतीय लष्करात अधिकारी होते. ते ब्रिटिश इंडियन आर्मीच्या सेकंड पंजाब रेजिमेंटमध्ये काम करत होते.
 
त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा लाइट इन्फंट्री (4थी आणि 6वी बटालियन) आणि राजपुताना रायफल्स (5वी बटालियन) चे सैनिक होते. पण, जेव्हा जनरल मानसर्गाची 5वी भारतीय तुकडी सुराबायाला पोहोचली तेव्हा त्याच्यासोबत 11 पायदळ तुकड्या होत्या.
 
ज्यामध्ये मोठ्या संख्येने गुरखा सैनिक(1ली, 5वी, 8वी, 9वी आणि 10वी गुरखा रायफल्स), पंजाबी सैनिक(15वी पंजाब रेजिमेंट), शीख (11वी शीख रेजिमेंट), जाट (9वी जाट रेजिमेंट), बिहारी (1ली बटालियन बिहार रेजिमेंट) , बलुच (10 वी बलुच रेजिमेंट), मराठा (मराठा लाइट रेजिमेंट), हैदराबादी (19 वी हैदराबाद रेजिमेंट) आणि राजपूत (राजपुताना रायफल्स) या तुकड्यांचे सैनिक होते.
 
इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेली क्रांतीकारकांना नामशेष करण्याचे आदेश या भारतीय सैनिकांना मिळाले तेंव्हा या सैनिकांची नेमकी प्रतिक्रिया काय होती?
 
कारण इंडोनेशियाचे लोक ज्या वसाहतवादाच्या विरोधात लढत होते त्याच प्रकारची लढाई भारतात काँग्रेसच्या नेतृत्वात लढली जात होती. भारतात इंग्रजांच्या विरोधात स्वदेशी आणि स्वराजसाठी आंदोलन केलं जात होतं.
 
भारतीय सैनिकांना या दोन्ही लढ्यांचे साम्य कळण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत. कारण, इंडोनेशियात स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी झालेल्या क्रांतिकारकांनी सुराबायाच्या सगळ्या भिंतींवर स्पष्ट इंग्रजी भाषेत पोस्टर्स लावले होते. ज्यावर असं लिहिलं होतं की,
 
"भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आज (30 सप्टेंबर 1945 रोजी) आदेश दिले आहेत की इंडोनेशिया आणि इतर राष्ट्रीय पक्षांचे बंड दडपण्यासाठी भारतीय सैन्याचा वापर केला जाऊ नये. आशिया आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्याच्या चळवळींमध्ये आम्हाला रस आहे आणि त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांना मदत करू इच्छितो. इंडोनेशियाच्या लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आता आम्ही त्याचे संरक्षण करण्यासाठी लढत आहोत."
हे पोस्टर पाहून भारतीय जवानांची प्रतिक्रिया काय असेल? त्यासाठी 1944 मध्ये ब्रिटिश भारतीय सैन्यात कॅप्टन राहिलेले पी.आर.एस. मणी हे स्वतः एक उत्तम उदाहरण असू शकतात.
 
ते लष्कराच्या जनसंपर्क खात्यात तैनात होते. कॅप्टन मणी यांनी जपानच्या शरणागतीपर्यंत बर्मा आणि मलाया (1962 नंतर मलेशिया) येथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे अनुभव कथन केले आहे.
 
15 ऑगस्टनंतर, जेव्हा माउंटबॅटन यांच्या दक्षिण पूर्व आशिया कमांडने मणीसह इतर भारतीय सैनिकांना इंडोनेशिया आणि व्हिएतनामच्या राष्ट्रवादी चळवळींच्या विरोधात तैनात केले, तेव्हा कॅप्टन मणी निराश झाले होते. विशेषत: जेंव्हा त्यांना कळलं की त्यांना सुराबायामध्ये तैनात असलेल्या जनरल मानसर्ग यांच्या नेतृत्वाखालील 5 व्या भारतीय तुकडीसोबत लढावं लागणार आहे.
 
या अनुभवाने कॅप्टन मणी एवढे व्यथित झाले की त्यांनी जानेवारी 1946 मध्ये सैन्याचा राजीनामा दिला. त्यानंतर ते मुंबईतील फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्राचे परदेशी वार्ताहर म्हणून काम करू लागले.
 
1928 मध्ये स्थापन करण्यात आलेले फ्री प्रेस जर्नल नावाचे वृत्तपत्र भारत आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याचे जोरदार समर्थन करत होतं. मणी यांनी 1946-47 दरम्यान इंडोनेशियातील जर्नलसाठी वार्तांकन केलं होतं. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याचे जोरदार समर्थन करणारे लेख त्यांनी लिहिले होते.
 
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा मणी भारतीय परराष्ट्र सेवेत सामील झाले आणि जकार्ता येथे भारताचे पहिले महावाणिज्यदूत म्हणून नियुक्त झाले.
 
1980 मध्ये भारताच्या राजनैतिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर, मणी यांनी 1945 ते 1947 या काळात इंडोनेशियातील त्यांच्या दिवसांच्या आठवणी शब्दबद्ध करून भारताच्या दृष्टीकोनातून इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य संग्रामाची कथा लिहिली.
 
ज्याच नाव होतं 'दि इंडोनेज़ियन रिवोल्यूशन 1945-50 (इंडोनेशियन क्रांतीची कथा 1945-50).'
 
हे पुस्तक मद्रास विद्यापीठाच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई अभ्यास केंद्राने 1986 मध्ये प्रकाशित केलं होतं. नंतर हे पुस्तक इंडोनेशियामध्ये 'जेजक रिव्होल्युसी 1945: सेबुआ केसाक्सियन सेजाराह' म्हणून 1989 मध्ये अनुवादित केलं गेलं.
कॅप्टन मणी सारखे अनेक भारतीय सैनिक होते, ज्यांना इंडोनेशियाच्या राष्ट्रवादी चळवळीबद्दल सहानुभूती होती आणि त्यांनी इंडोनेशियाच्या सशस्त्र लढ्यात मदत करण्यासाठी आपले लष्करी कौशल्य वापरले होते.
 
भारतीय सैनिकांना इंडोनेशियातील लोकांबद्दल असलेल्या सहानुभूतीचे संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला कॅप्टन मणी सारख्या अनेक लोकांची कथा जाणून घेणं गरजेचं आहे.
 
जेणेकरून दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया आठ महिने ब्रिटीशांच्या ताब्यात असताना तिथे नेमकी कशी परिस्थिती होती हे कळू शकेल.
 
पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा जनरल मुहम्मद झिया उल हक (1924-1988) यांनी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या वतीने आशिया पॅसिफिकमध्ये अनेक आघाड्यांवर लढा दिला. ते 'ऑपरेशन कॅपिटल' दरम्यान बर्मामध्ये आणि 'ऑपरेशन जिपर' दरम्यान मलायामध्ये तैनात होते.
 
जनरल झिया यांची सप्टेंबर 1945 मध्ये 23 व्या ब्रिटिश इंडियन डिव्हिजनसोबत जावा येथे नियुक्ती झाली होती. जनरल झिया यांना 1943 मध्ये इंडियन मिल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

लेबनॉनमध्ये सहा इस्रायली सैनिक ठार,IDF लष्करी मुख्यालयावर हल्ला

Chandrashekhar Bawankule Profileचंद्रशेखर बावनकुळे प्रोफाईल

Milind Deora Profile मिलिंद देवरा प्रोफाइल

Aaditya Thackeray Profileआदित्य ठाकरे प्रोफाइल

Chhagan Bhujbal Profile छगन भुजबळ प्रोफाइल

पुढील लेख
Show comments