भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी बीकेसी मैदानावर होत आहे. या महामेळाव्यात गर्दीचे विक्रम मोडण्याची जय्यत तयारी भाजपाने केली आहे. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी सायंकाळी मुंबईत आले असता त्यांचे मुंबई भाजपाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आता शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या महामेळाव्याला अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला ५ लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा पदाधिकाऱ्यानी केला आहे.
भाजपच्या महामेळाव्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांनी मुंबईकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर गर्दी केली आहे. याशिवाय, २८ विशेष रेल्वे गाड्यांनी कार्यकर्ते राज्यभरातून येणार आहेत. शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, मनसेचा त्याच ठिकाणचा पाडवा मेळावा तसेच यापुढे दरवर्षी भाजपाच्या स्थापना दिनी बीकेसी मैदानावर महामेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचे भाजपाने ठरविले आहे. सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनालाही हा महामेळावा हे उत्तर ठरणार आहे.