Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जहाज तब्बल चारशे वर्षांनी सापडले

जहाज तब्बल चारशे वर्षांनी सापडले
, शनिवार, 29 सप्टेंबर 2018 (00:53 IST)
पोर्तुगालच्या सागरी किनारपट्टीवर एका विवक्षित जहाजाच्या शोधामध्ये असलेल्या पुरातत्त्व वेत्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या तज्ञांना लिस्बनच्या किनारपट्टीच्या नजीक चारशे वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. या जहाजावरून भारतातून पोर्तुगाल येथे निर्यात करण्यात आलेले मसाले होते. या पुरातत्त्व वेत्त्यांच्या टीमच्या प्रमुखांच्या नुसार, हा शोध या शतकातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक म्हणता येऊ शकेल. पोर्तुगालच्या दृष्टीनेदेखील हा अत्यधिक महत्त्वाचा शोध असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या जहाजाच्या अवशेषांच्या आसपासच्या परिसरामध्ये मसाल्यांचे अवशेषही पुरातत्त्व वेत्त्यांना सापडले आहेत. या अवशेषांच्या जोडीने नऊ तोफाही सापडल्या असून त्यांवर पोर्तुगीजांचे राजचिन्ह अंकित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच चिनी मातीची भांडी आणि तत्कालीन चलनात असलेली नाणीही सापडली आहेत. ही नाणी खास गुलामांच्या खरेदी विक्रीकरिता वापरली जात असल्याचे तज्ञ म्हणतात. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या जहाजाचे आणि त्यावरून नेण्यात येत असलेल्या वस्तूंचे अवशेष लिस्बनच्या किनारपट्टीजवळ सापडले होते. पण या जहाजाला जलसमाधी मिळून इतकी वर्षे लोटल्यानंतरही अवशेष पुष्कळ चांगल्या स्थितीमध्ये असल्याबद्दल तज्ञांनी समाधान व्यक्त केले. हे जहाज 1575 ते 1625 या काळादरम्यान बुडाले असावे असा अंदाज असून, त्या काळादरम्यान भारतातून पोर्तुगालमध्ये मसाल्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जात असे. याच परिसरामध्ये 1994 साली आणखी एका पोर्तुगीज जहाजाचे अवशेष आढळले होते. या ठिकाणी अनेक जहाजांना जलसमाधी मिळाली असल्याचे तज्ञ सांगतात. मसाले वाहून नेणारे हे जहाज शोधण्यासाठी या तज्ञांना काही वर्षे अथक प्रयत्न करावे लागले, त्यांच्या या प्रयत्नांना पोर्तुगीज सरकारचे साहाय्यही लाभले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी : राहुल