Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीव्ही मालिका का चालतात? टीआरपी कसा मिळतो?

Webdunia
सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (17:08 IST)
2010 नंतर सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झाला आहे. नरेंद्र मोदींनी सुद्धा या मीडियाची ताकद ओळखली होती... अब की बार मोदी सरकार हे 2014 च्या निवडणुकीच (केवळ भाजपाचं नव्हे) ब्रीदवाक्य झालं होतं. सोशल मीडियावर वावरणारे आता ट्रेंड सेटर झाले आहेत. हा एक उत्तम व्यवसाय आहे. मला एवढंच सांगायचं आहे की सोशल मिडियावाल्यांची कॉलर टाईट असते. इथे वावरणारा माणूस पंतप्रधानालाही बोल लावू शकतो, इतकंच काय तर भारतात बसून ट्रम्प यांच्यावर विनोद सोडू शकतो. ही सोशल मीडियाची क्षमता आहे. 
 
कुणावरही टीका, कुणावरही विनोद/मिम्स इथे तयार होतात. तसेच भारतीय टीव्ही मालिकांवर सुद्धा मिम्स तयार होतात. लेख मराठीत असल्यामुळे आपण मराठी मालिकांबद्दल विचार करूया. इथे मराठी मालिकांवर मिम्स तयार होतात आणि खेचाखेचीही होते. तरी मिम्स तयार करणार्यांना एक गोष्ट सतावत असते की ज्या मालिकांवर आपण इतके विनोद करतो, आपल्या दृष्टिकोनातून त्या मालिका चांगल्या नसतात मग यांचा TRP वाढतो कसा? वर्षानुवर्षे या मालिका सुरू कशा राहतात. याचं सरळ साधं सोपं उत्तर मी तुम्हाला सांगतो, ज्या मालिका गाजतात, त्या मालिका चालतात...
 
सोनी मराठीवर हृदयात वाजे समेथिंग या मालिकेच्या 50 एपिसोडसाठी मी गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी या लेखांकांसोबत स्क्रीनप्ले लिहिले होते, त्यांचा असोसिएट म्हणून मी काम करत होतो. मी या क्षेत्रात वावरतो, नवखा आहे, मोठं होण्याची इच्छा आणि जिद्द आहे. ज्या ताटात खायचं, त्या ताटात थुंकायच ही माझी सवय नाही. 
 
आपल्याच क्षेत्रावर टीका करणारे अनेक लोक मी पाहिले आहेत. पण मी कृतघ्न नाही. मी कोणत्याच मालिकांवर टीका करत नाही. कारण माझ्यासारख्या अनेक लेखकांचं यावर पोट आहे. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कोणतंही विश्लेषण किंवा माझं मत नसून केवळ सत्य परिस्थिती आहे. जेणेकरून तुमच्या मनातला गोंधळ दूर 
होईल. तरी तुम्हाला स्तुती आणि टीका करण्याचा अधिकार आहे... तुम्ही आमचे मायबाप रसिक प्रेक्षक आहात. तुमच्या शिवाय आम्ही कलाकार शून्य आहोत. मी नाटकवाला आहे. आम्ही नाटकांची, एकांकिकेची सुरुवात करताना म्हणतो, "रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून..." आम्हा कलाकारांची दोन दैवते, एक रंगदेवता आणि दुसरे रसिकदेवता... म्हणूनच मी तुम्हा रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून हा लेख लिहितोय.
 
मी पु.भा. भावे स्मृती समितीचा कार्यकर्ता आहे... एका वर्षी आम्ही समितीतर्फे मालिका आणि टीआरपी या विषयावर चर्चा सत्र ठेवलं होतं. त्यात श्रीरंग गोडबोले, वीरेंद्र प्रधान असे दिग्गज लोक आले होते. वीरेंद्र प्रधान उंच माझा झोका ही मालिका करत होते. तेव्हा त्यांनी जे सांगितलं, ती गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायला हवी असं मी ठामपणे तुम्हाला सांगेन. ते म्हणाले ज्यावेळी मालिकेत किचनचा सिन असायचा आणि घरातल्या बायका बोलायच्या तेव्हा (त्या पॉईंटला) टीआरपी हाय असायची आणि जेव्हा न्यायमूर्ती रानडे चार चांगल्या गोष्टी सांगायचे, प्रबोधन करायचे तेव्हा टीआरपी कमी असायची. टीआरपी म्हणजे काय? टीआरपी म्हणजे टार्गेट रेटिंग पॉईंट्स... पीपल मीटर्स डिव्हाईस आणि पिक्चर मॅचिंग या दोन पद्धतीने टीआरपी मोजली जाते... टीआरपीविषयी बरीच माहिती इंटरनेटवर मिळेल. म्हणून यात वेळ घालवत नाही... यावरून ठरतं की कोणती मालिका चांगली चाललेय... 
 
सोशल मीडियाचं युग आल्यानंतर  टीआरपीमध्ये एक वेगळी जादू झाली... ती म्हणजे तुम्ही ज्या मालिकेवर जास्त टीका करता, तिचे जास्त मिम्स बनवता, ती मालिका जास्त चालते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सत्य आहे... कारण त्या मालिकेची सतत चर्चा होत राहते... न्यूज चॅनलची बाब सुद्धा अशीच आहे... ज्या चॅनलची जास्त चर्चा, जो अँकर जास्त फेमस (पॉजिटीव्हली किंवा नेगेटिव्हली) ते चॅनल जास्त पुढे... हा एकच मुद्दा मी सांगितला. यात अनेक मुद्दे, स्ट्रेटजी असते. पण त्यावर मी आज चर्चा करणार नाही.
 
तुम्हाला असं वाटत की तुम्ही हुशार आहात... तुमच्या हुशारीवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. मी फॅक्ट समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट ऑडियन्स ही एक स्ट्रेटजी असते. एक मालिका होती, नाव आणि चॅनल सांगत नाही. कारण लेखाचा उद्देश केवळ सोशल मिडियावरच्या मंडळींना सत्य सांगण्याचा आहे. त्या मालिकेत सूनेवर सासरची मंडळी खूप अत्याचार करायची... त्या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसला आणि चॅनलला बायकांची पत्रे येत असत की नायिकेचे दुःख पाहून आम्हाला आमची दुःखे लहान वाटतात. लक्षात घ्या हे प्रेक्षक आहेत मालिकांचे... तुम्ही विचारता ना, की कोण बघतो मालिका? तर हे लोक बघतात. तुम्ही जरी हुशार असला, बुद्धिमान असला तरी अनेक लोक खूप भावुक असतात. जगातला मॅक्झिमम प्रेक्षक भावुक आहेत. त्यात भारत हा भावनाप्रधान देश आहे. तुम्हाला विश्वास नाही होणार पण लोक मालिकेतील पात्रांशी स्वतःला रिलेट करतात. त्या पात्रांवर लोक प्रेम करतात. तुम्ही ज्यांच्यावर मिम्स बनवता, ते पात्र एखाद्यासाठी इन्स्पिरेशन बनतं. खोटं वाटत असेल तर प्रोडक्शन हाऊस किंवा चॅनलला कधी भेट देऊन त्यांना येणारी पत्रे वाचा, आता ईमेल्स येत असतील. तुम्हाला आश्चर्याचा भयंकर मोठा धक्का बसेल. "अरे आम्ही तर टर उडवतो. पण हे सामान्य लोक प्रेम करतात? स्वतःला रिलेट करतात? अशा मालिकेवर आणि पात्रावर प्रेम का करतात लोक?" असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल.
 
आता एकीकडे तुम्ही ज्या मालिकांवर टीका करता, दुसरीकडे त्याच मालिकांचे फॅन्स काही ग्रुप्स चालवत असतात. "आज मालिकेमध्ये काय घडलं? काय आवडलं, काय नाही आवडलं, हे पात्र असं का वागलं, किती छळते ना सासू तिला? शी बाई, त्यापेक्षा माझी सासू बरी"... त्या ग्रुप्समध्ये जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता. फॅन्स रोज व्यक्त होत असतात. रोज लिहीत असतात... 
 
माझे एक मित्र आहेत. ते एक मालिका करत होते, त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी लहानशी विनोदी भूमिका केली होती. पण character डेव्हलप होत गेलं. तो निर्मात्याला म्हणाला, आता संपव रे माझा रोल. निर्मात्याने चॅनलला जाऊन विचारायला सांगितल. तर चॅनलने लोकांची पत्रे त्याला दाखवली आणि त्या पत्रांमध्ये लहान भूमिका करणाऱ्या कलाकाराबद्दल खूप भावुक गोष्टी लिहिल्या होत्या. "किती गोड आहे तो, हाच खरा माणूस, अरे त्या बिचार्याच लग्न झालं पाहिजे रे, चांगली मुलगी मिळेल त्याला" वगैरे वगैरे... एका पात्राला मालिकेमध्ये एक मुलगी मिळावी म्हणून प्रेक्षक हळहळ व्यक्त करतात. लोकांच्या पसंतीमुळे त्याचा रोल वाढला होता... हे सगळं टीआरपीमुळे... तुम्हाला हे प्रेक्षक मूर्ख वाटू शकतात पण मला वाटतं ते भावुक जास्त आहेत... 
 
 एक राजकीय उदाहरण देतो, बुद्धिमान माणूस आणि सामान्य माणसातल... आपल्याकडचे पत्रकार सांगत होते की डोनाल्ड ट्रम्प हरणार. पण ट्रम्प जिंकले... का जिंकले? 
 
आपल्याकडच्या ज्येष्ठ पत्रकार का चुकले? कारण त्यांनी सामान्य माणसाची बाजू विचारलीच नाही. त्या सामान्य माणसाला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं असतं. राजकारण असो किंवा चित्रपट, मालिका... जनता जनार्दन असते भौ...
 
तर माय बाप रसिक प्रेक्षकानो, असे अनेक किस्से आहेत... जागा अपुरी आहे. भविष्यात #मेस्त्री_मिस्ट्री या माझ्या युट्युब चॅनलवर या संदर्भात काही दिग्गज्यांच्या मुलाखती घेईन तेव्हा विषय अजून स्पष्ट होत जाईल. तुम्ही टीका करू नका किंवा मिम्स बनवू नका यासाठी हा लेख लिहिला नसून काही मित्रांनी काही मालिकांवर टीका केली होती आणि त्यांना प्रश्न पडला होता की इतकी टीका होऊन मालिका चालतात कशा? तर हेच तुम्हाला समजावून सांगितलं की "तुम्हीच आहात आमच्या मालिका यशस्वी करण्यामागचे शिल्पकार"... उद्या तुम्ही माझ्या कलाकृतीवर टीका केली तरी मला मुळीच राग येणार नाही... कारण तुम्ही मायबाप रसिक आहात... तुमच्या शिवाय आम्ही कलाकार शून्य आहोत... पण तुम्हाला सत्य सांगणं मला माझं कर्तव्य वाटलं. तर दोस्तांनो चित्रपट, नाटक, मालिका, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स पाहत राहा... स्तुती करा, टीका करा... आपकी हर बाते सरआंखो पर... 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments