Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा निवडणूक : देशात पहिली निवडणूक कधी झाली होती? ती कशी पार पडली होती?

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (17:10 IST)
देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. 4 जूनला मतमोजणी होईल. ही लोकसभेची अठरावी निवडणूक असेल.आज निवडणुकीची, मतदानाची प्रक्रिया आपल्या अंगवळणी पडली आहे. पण देशात लोकसभेची पहिली निवडणूक कशी पार पडली होती? देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, पण पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 मध्ये. या पहिल्या निवडणुकीकडे जगभराचं लक्ष लागलेलं होतं. नुकतंच स्वातंत्र्य मिळून लोकशाही अंगिकारलेला एवढा मोठा देश निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे हाताळू शकेल का याचीच शंका सगळ्यांच्या मनात होती.
 
सगळ्यांच्या मनातल्या शंका-कुशंका बाद करत भारताने पहिली निवडणूक यशस्वी करून दाखवलीच, पण त्याबरोबर काही ऐतिहासिक पावलंही उचलली. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांत भारतात निवडणूक आयोग नेमला गेला. मार्च 1950 मध्ये सुकुमान सेन यांची भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली.
 
दोनच वर्षांत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्यात आल्या. सेन यांनी त्याची सगळी जबाबदारी घेतली. भारताने Universal Adult Franchise म्हणजेच प्रत्येक सज्ञान व्यक्तीस मताधिकार या आधारावर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. वयाची 21 वर्षं पूर्ण करणाऱ्या सगळ्या नागरिकांना मताधिकार मिळाला. स्वयंघोषित विकसित देशांपैकी अनेक ठिकाणी त्या वेळी मत देण्याचा अधिकार केवळ मातब्बर लोकांना होता. महिला, कामगार मताधिकारापासून वंचित होते. पण भारतात सर्वांना मताधिकार मिळाला.
 
भारतातल्या निवडणुकीचा ताश्कंदमधून प्रचार
1952 च्या त्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार करण्याची संधी त्या वेळच्या सगळ्याच पक्षांना मिळाली. बहुतेक पक्षांनी घरा-घरात जाऊन प्रचार करायला प्राधान्य दिलं. पण कम्युनिस्ट पार्टी हा एकमेव पक्ष होता, ज्यांना रेडिओवरून प्रचार करण्याची संधी मिळाली आणि तीसुद्धा ऑल इंडिया रेडिओवरून नव्हे तर रेडिओ मॉस्कोवरून.हे रेडिओ स्टेशन ताश्कंदमधील आपल्या ट्रान्समीटरवरून कम्युनिस्ट पक्षाचा निवडणूक प्रचार करत असे.
 
चार महिने चालली निवडणूक
पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया जवळपास चार महिने सुरू होती. 25 ऑक्टोबर 1951 रोजी देशातलं पहिलं मत मतपेटीत टाकलं गेलं हिमाचल प्रदेशमध्ये.1952 च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशातली मतदान प्रक्रिया संपली.
त्या वेळी सगळ्या मिळून 4500 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील 499 जागा लोकसभेच्या होत्या. निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरू केलं होतं, त्या वेळी अनेक स्त्रियांनी आपलं नाव सांगण्यास नकार दिला.
 
त्यामुळे जवळपास 28 लाख महिलांचं नाव मतदार यादीतून वगळावं लागलं होतं.सार्वत्रित निवडणुकीत जवळपास 17 कोटी नागरिक सहभागी झाले होते. त्यातील 86 टक्के लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं.
अशिक्षित आणि निरक्षर लोकांना मतदान करण्यात अडचण येऊ नये म्हणून मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह छापण्याची प्रथा सुरू झाली. बोगस मतदारांपासून बचावासाठी भारतीय वैज्ञानिकांनी एक अशी शाई तयार केली जी बोटाला लावल्यावर किमान आठवडाभर तरी फिकी पडणार नाही.एवढ्या मोठ्या देशात अशिक्षित मतदारांचं प्रमाणही प्रचंड असताना देखील पहिल्याच निवडणुकीत 45.7 टक्के मतदान झालं.
 
पहिल्या निवडणुकीतले पक्ष आणि नेते
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या मुख्य पक्षांमध्ये काँग्रेस, सोशलिस्ट पार्टी, भारतीय जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्ष सामील होते. अशा 14 राष्ट्रीय पक्षांनी त्या वेळी निवडणुका लढवल्या होत्या आणि 40 स्थानिक पक्षही निवडणुकीत सहभागी झाले होते. काँग्रेसच्या प्रचारात जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री आघाडीवर होते. 1 ऑक्टोबर 1952 रोजी नेहरूंनी त्यांच्या पहिल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली.
 
पुढच्या 9 महिन्यांत त्यांनी देशाचा काना-कोपरा प्रचारासाठी पिंजून काढला होता. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण हे सोशलिस्ट पार्टीच्या प्रचारातील प्रमुख चेहरे होते. तर जनसंघाच्या प्रचाराची धुरा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर होती.
 
पहिल्या निवडणुकीचा निकाल
निवडणूक निकालाच्या बाबतीत काँग्रेसने आघाडी घेतली. संसदीय निवडणुकीत काँग्रेसला 45 टक्के मतं मिळाली. तर त्यांना मिळालेल्या जागांची संख्या 75 टक्के होती. म्हणजेच काँग्रेसने पहिल्या निवडणुकीत 364 जागा जिंकल्या.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीने 16 जागा जिंकल्या. त्यातल्या 8 जागा त्यांना मद्रास प्रांतातून मिळाल्या होत्या.
भारतीय जनसंघाने एकूण 49 जागांसाठी निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी 3 जागांवर त्यांना विजय मिळवता आला.पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतः दक्षिण कलकत्ता मतदारसंघातून लढले आणि निवडणूक जिंकून लोकसभेवर गेले.

शेतकरी कामगार पक्षाने एकूण 144 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण त्यांचे केवळ 9 उमेदवार लोकसभेवर निवडून गेले.जयप्रकाश नारायण आणि राममनोहर लोहिया यांच्या सोशलिस्ट पार्टीने 254 जागा लढवल्या पण त्यातील केवळ 12 जागांवर त्यांना विजय मिळवता आला.देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चवही चाखावी लागली होती.यामध्ये होते घटनाकार आणि देशाचे पहिले कायदा मंत्री डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि शेतकरी कामगार प्रजा पक्षाचे मोठे नेते आचार्य कृपलानी.
या पहिल्या वहिल्या निवडणुकीच्या निकालानंतर जवाहरलाल नेहरूंनी प्रचंड बहुमताचं काँग्रेस सरकार बनवलं आणि नेहरू देशाचे पहिले निर्वाचित पंतप्रधान झाले.

Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजप जो काही निर्णय घेईल शिवसेना त्याला पाठिंबा देईल-एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी बोलावली पत्रकार परिषद, कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री?

निवडणूक निकालाबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना दिल्या या सूचना

मुंबईत भरधाव कार दुभाजकाला धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

PKL 2024: तमिळ थलायवासने यूपी योद्धास 14 गुणांनी पराभूत केले

पुढील लेख
Show comments