रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या काजव्यांचा समूह पाहणे सुखद असतं. आपण चित्रपटांमध्ये असे दृश्य बघितले असतील पण प्रत्यक्षात अशा क्षणांचा आनंद घेण्याची बाब वेगळीच आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी फायरफ्लाइज फेस्टिव्हल म्हणजेच काजवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी सोडायची नसेल तर जाणून घ्या हा महोत्सव कधीपर्यंत आणि कुठे असणार आहे.
हा महोत्सव जूनअखेरपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील राजमाची गाव, सिद्धगड वाडी, प्रबळमाची गाव, भंडारदरा, घाटघर, कोथळीगड, कोंढाणे लेणी आणि पुरुषवाडी यांसह अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवासाठी शिबिरे आयोजित केली जात आहे. पर्यटक या ठिकाणांवर भेट देऊन महोत्सवचा आनंद घेऊ शकतात. यासोबत नाईट ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद देखील घेता येऊ शकतो.
पुरुषवाडी फायरफ्लाइज फेस्टिव्हल 26 जूनपर्यंत असणार आहे तर राजमाची फायरफ्लाइज ट्रेक आणि कॅम्प 25 जूनपर्यंत असेल. लोणावळ्याजवळीक राजमाची फायरफ्लाइज फेस्टिव्हल आणि भंडारदरा फायरफ्लाइज फोटोग्राफी बूट कॅम्प 4- 5 जून रोजी आयोजित केले जाणार आहे. माळशेज घाट फायरफ्लाइज कॅम्पिंग देखील 25 जूनपर्यंत असेल.
या ठिकाणी काजव्यांचा तालबद्ध वावर पाहायला मिळणार कारण हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडू लागतात. तसेच याच काळात त्यांची संततीही वाढवतात.