रायगड किल्ल्यावर 300 पेक्षा अधिक वाडे होते. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. इतिहासाच्या पुस्तकांत तसं कधीच वाचलं नाही. पण ही माहिती शंभर टक्के खरी आहे.
नुकतेच एरिअल सर्व्हेमध्ये पूर्वी असे वाडे होते याचे अवशेष दिसले आहेत. त्यातल्या 6 वाड्यांचं उत्खनन पुरातत्व खात्याने केलंय. उरलेले वाडे अजूनही प्रकाशझोतात यायची वाट पाहतायत.
बीबीसी मराठीची टीम तीन दिवस रायगडावर फिरून तज्ज्ञांकडून या कामांची माहिती समजून घेत होती.
रायगड किल्ल्यावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होतंय. गेली तीन वर्षं हे उत्खनन सुरू आहे. गेली अनेक शतकं मातीच्या आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली दडलेला रायगडचा नवा इतिहास त्यामुळे प्रकाशात येऊ शकेल. रायगडावरचा संपूर्ण परिसर साधारण बाराशे एकर इतका आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली रायरी किल्ला जिंकला आणि त्याचं रायगड हे नामकरण करत 1662 मध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केला. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली.
आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. पण आता या उत्खननामुळे शिवकालीन वाड्यांसोबतच मातीची भांडी, आभूषणं, कौलं अशा अनेक गोष्टी सापडतायत.
या उत्खननाखेरीज रायगडावर वास्तूचं जतन आणि संवर्धन देखील सुरू आहे. रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व खातं यांच्या तज्ज्ञ टीम्स हे काम करतायत.
राज्य सरकारने या कामासाठी 606 कोटींचा निधी मंजूर केलाय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतका निधी एखाद्या ऐतिहासिक वास्तूला प्रकाशात आणण्यासाठी दिला जातोय.
जिजामाता वाडा आणि ते आसन
रायगडावरचं उत्खनन आणि संवर्धनाचं काम पाहण्यासाठी आम्ही पोहचलो. गडाकडे जाताना पायथ्याच्या डाव्या बाजूला शिवाजी महाराजांच्या आई जिजामातांचा वाडा दिसतो.
जवळपास साडे नऊ एकरमध्ये या वाड्याचा परिसर आहे. या वाड्यात चार विहीरी आहेत. त्यातल्या एका विहीरीजवळ एक उशीच्या आकाराचा आणि बसण्याच्या आसनाच्या आकाराचा एक दगड आहे.
"तिथे जिजामाता टेकून बसत आणि छत्रपती शिवराय त्यांच्या पायाशी बसून हितगुज करत असल्याची कहाणी प्रसिद्ध आहे." म्हणून या विहीरीला तकियाची विहीर म्हणतात. या वाड्याच्या जोत्यांचंही उत्खनन केलं जाणार आहे.
तिथून पुढे गेल्यानंतर एका उंच बुरूजावर लावलेला किल्ले रायगडचा फलक दिसतो. त्या बुरूजाचं नाव खुबलढा बुरूज... तिथून वर जाण्यासाठी दगडी पायर्यांचा छोटा रस्ता आहे. पूर्वी तिथून वर जाण्यासाठी छोटा रस्ता होता.
पण आता गडाचं संवर्धन करताना पायर्यांचा दगडी रस्ता करण्यात आला आहे. पण बघताना या रस्त्यावरच्या पायर्या काही वर्षांपूर्वीच्या असल्यासारख्या वाटतात.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्यांच्या बांधणीमध्ये एक रांगडेपणा जाणवतो. या किल्याचं संवर्धन करताना तो रांगडेपणा कायम राहावा असा आमचा प्रयत्न आहे." रायगड विकास प्राधिकरणाचे आर्कीटेक्ट वरूण भामरे सांगत होते.
वरूण हे कन्झरव्हेशन आर्कीटेक्ट आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते रायगड विकास प्राधिकरणाच्यामार्फत गडाचं जतन आणि संवर्धनाचं काम करतायत. याआधी त्यांनी युनेस्कोच्या काही प्रकल्पांमध्ये संवर्धनाचं काम केलंय.
रायगडाच्या कामाची माहिती देण्यासाठी ते आमच्या सोबत होते.
चुना, गुळ, उडीद डाळ आणि वाळू
पुढे आम्ही खूबलढा बुरूजावर गेलो. तिथे दगडांना नंबर्स देण्याचं काम सुरू होतं. आसपासच्या परिसरात मिळालेले दगड हे याच बुरूजाचे असल्याचे संशोधन केल्यानंतर तज्ज्ञांच्या लक्षात आलं. त्यामुळे हेच दगड पारंपारिक मिश्रण वापरून बुरूजावर लावले जात होते.
नेहमीच्या बांधकामापेक्षा हे मिश्रण वेगळं होतं. आर्किटेक्ट वरूण भामरे त्या कामावर देखरेख ठेवत होते.
वरूण यांनी माहिती दिली की, "पुरातत्व विभागाच्या नियमानुसार इथे सिमेंट क्रॉंक्रीट वापरता येत नाही. त्यामुळे जुन्या बांधकाम पद्धतीचा वापर केला जातो. या मिश्रणात चुना, बेल फळाचं पाणी, गूळ, उडीद डाळ, वाळू, विटांची भुकटी हे वापरलं जातं."
पुढे वरती चढताना बरचसं बांधकाम चुन्याच्या मिश्रणातून झालेलं दिसतं. या बुरूजाकडून नाणे दरवाज्याकडे एक शॉर्टकट जातो. पण गडाचा मुख्य प्रवेश हा चित्त दरवाज्याच्या बाजूने जाणार्या छोट्या रस्त्यावरून असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. आम्हीही चित्त दरवाज्याच्या बाजूच्या रस्त्याने नाणे दरवाज्याच्या दिशेने पुढे चालू लागलो.
नाणे दरवाजा पुन्हा उभा राहणार?
साधारण 15-20 मिनिटं चालल्यावर समोर समांतर अश्या दोन गोलाकार दगडी कमानी दिसतात. हाच तो शिवकालीन राजदींडीचा मार्ग म्हणजे दरवाजा. नाणे दरवाज्याला लागून वरती एक उंच बुरुज आहे. जवळच एक छोटंस हनुमानाचं मंदिर.
याच नाणे दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराज येत-जात असल्याचे संदर्भ आहेत. इंग्रज वकील हेन्री ओकझेडन यांनी शिवराज्याभिषेकाला या दरवाज्यातून प्रवेश केल्याचं ऐतिहासिक दस्तावेज सांगतात. नाणे दरवाजा डोंगराच्या कुशीत मध्यभागी आहे, म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या येण्याजाण्यासाठीचा सुरक्षित मार्ग असावा.
नाणे दरवाज्याची पडझड झाली असली तरी त्याची भव्यता नुसती पाहूनही लक्षात येते.
पावसाळ्यात नाणे दरवाज्याच्या वरती पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह असतो. या दरवाज्याच्या भागात आक्रमणं झाल्याचे संदर्भ कुठेही नाहीत, मग याची पडझड कशी झाली? याचा शोध वरूण आणि त्यांच्या टीमने घेतला.
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे दगड पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले असावेत. मग बाजूच्या दरीत याचा शोध घ्यायला सुरवात केली. तेव्हा एक-दोन नाही तर चक्क या दरवाज्याचे 350 दगड सापडले. हे सगळे दगड दोरी बांधून वरती आणण्यात आली. प्रत्येक दगडाला नंबर देण्यात आला.
हे दगड याच दरवाज्याचे होते हे कसं कळलं?, असा प्रश्न आम्ही आर्किटेक्ट वरूण भामरेंना विचारला.
"यामध्ये बांधकामाचे दगड, तुळ्यांचे दगड आणि कमानीचे दगड होते. यातला कोणता दगड कोणत्या भागात लागू शकतो याचं ड्रॉईंग करायला सुरुवात केली. तेव्हा आज या 350 दगडांपैकी कोणत्या दगडाची जागा कोणती आहे हे आमच्या लक्षात आलं आहे," वरुण सांगत होते.
आता लवकरच बनवलेल्या ड्रॉईंगच्या सहाय्याने नाणे दरवाजाची पुनर्बांधणी होणार आहे.
पहिल्या वाड्याचं उत्खनन
महादरवाजा तटबंदी ओलांडून पुढे गेल्यानंतर आम्ही मुख्य बालेकिल्ल्याच्या भागात पोहचलो. हा संपूर्ण परिसर फक्त पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.
रोप वे च्या एक्झिटपासून पुढे उजव्या हाताला दगडी जोते आणि त्यावर विटांचं बांधकाम दिसत असलेली एक वास्तू दिसते. हाच तो उत्खनन केलेला पहीला वाडा. याच वाड्यामध्ये शिवकालीन जवळपास 800 छोट्या मोठ्या वस्तू सापडल्या आहेत. कौलं, मातीची भांडी, लोखंडी खिळे, दारूगोळे त्याचबरोबर काही दागिनेही सापडले आहेत.
आता सापडलेल्या अवशेषांवरून वाड्यांचे जोते जरी दगडी असले तरी त्यावरचं बांधकाम हे लाकडी आणि कौलारू असावं, असा संशोधकांचा अंदाज आहे. या वाड्याच्या बाजूला लोखंडी कड्या आहेत. या कड्या शामियाने उभे करण्यासाठी असाव्यात. त्यावरचं विटांचं बांधकाम हे पेशवेकालीन किंवा त्यानंतरच्या काळातील असावं असा अंदाज आहे. याचं कारणं शिवकाळात विटांचा शोध लागला नव्हता.
गडावर झालेल्या आक्रमणांमुळे अनेक गोष्टींची पडझड झाली असावी का?
"रायगडाला अनेक वेढे पडले, आक्रमणं झाली. पण ती आक्रमणं ही थेट गडावर येऊन झाली असावीत. ज्यामुळे दगडी बांधकाम तशीच राहीली आणि लाकडी, कौलारू बांधकामांची पडझड झाली असावी," असंही संशोधक सांगतात.
तिथून पुढे गेल्यावर मोठमोठे दगडी चौकोन आणि त्यावर मातीचे ढीगारे दिसतात. हे सुध्दा वाड्यांचे अवशेष आहेत. पण याचं उत्खनन व्हायचं बाकी आहे.
एरियल सर्व्हेमध्ये बालेकिल्ल्याच्या पृष्ठभागावर 300 हून अधिक वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. त्यापैकी 6 वाड्यांचं उत्खनन पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. इतर किल्यांचं उत्खनन व्हायचं बाकी आहे. ते कधीपर्यंत होणार? याचं उत्तर मात्र कोणत्याही अधिकार्याकडे नाही.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी या कामाच्या वेगाबाबत बीबीसी मराठीकडे खंत व्यक्त केली. ते म्हणाले, "वेगाने काम केलं पाहीजे. आता ज्या वेगाने काम सुरू आहे त्याच वेगाने झालं तर अजून 25 वर्षे लागतील. सतत सरकार यासाठी फंड देईल की नाही याची शाश्वती नसते. खरं म्हणजे कामाचा वेग वाढवण्याची गरज आहे.".
रायगडावर 84 पाण्याचे स्रोत?
रायगडाची वास्तूरचना पाहीली तर एक लक्षात येत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्यांवर बांधकामावेळी सर्वांत आधी पाण्याचा विचार केला असावा.
रायगडावर एकूण आठ तलाव असल्याची माहिती होती. पण एरियल सर्व्हेमध्ये 84 पाण्याचे स्त्रोत असल्याचं आढळलं आहे. छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या, हौद, विहीरी हे त्याकाळी निर्माण करण्यात आले होते. आजही गडावर स्थानिक लोक पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. पाण्याचा निचरा होण्यासाठी दगडी गटारंही दिसतात. पाण्याचं नियोजन उत्तमरित्या केलं होतं याचा अंदाज येतो.
गंगासागर तलाव रायगडावरचा सर्वांत मोठा तलाव आहे. बालेकिल्याच्या मागील बाजूला हत्ती तलाव आहे. हत्ती तलावाच्या भोवती दगडी भिंतीतून पाण्याची गळती होत होती. ही गळती काढण्यासाठी प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले. पण त्यात अपयश आलं होतं.
मग या हत्ती तलावाचा अभ्यास करण्यात आला. या तलावाच्या बाजूला असलेल्या दगडी भिंतींमधून चुन्याचं मिश्रण वाहून गेल्याने दगडांना खाचा पडल्या होत्या. तेव्हा रायगड विकास प्राधिकरणाने विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ही गळती थांबवण्याचा प्रयत्न केला. हे काम जवळपास 80 % काम पूर्ण झालंय. याचाच परिणाम म्हणून गेल्या पावसाळ्यात तलाव पूर्णपणे भरलेला दिसला.
जगभरातील लोक रायगड पाहतील?
रायगड संवर्धनाच्या कामाबाबत खासदार संभाजी राजे छत्रपती सांगतात, "आपल्या शिवरायांचा इतिहासाची जगाने नोंद घ्यावी अशी खूप इच्छा आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत महाराष्ट्रातला एकही किल्ला नाही. सध्या युनेस्कोने 12 किल्यांची दखल घेतली आहे. पण नोंदणी होण्याच्या या प्रक्रियेत किमान 5 किल्ल्यांची तरी निवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आम्ही चांगलं काम करू."
शिवाजी महाराजांनी रायगडाचं महत्व ओळखूनच त्याला राजधानीचा दर्जा दिला होता. शिवराज्याभिषेक, गडावरच्या नाट्यमय घडामोडी, शिवरायांचं निधन, मोगलांचं वर्चस्व आणि ब्रिटीशांचा ताबा अशा अनेक घटनांचा रायगड साक्षीदार राहिलाय.
ब्रिटीशांची राजवट आल्यानंतर अनेक वर्ष या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं होतं. पहिले शिवचरित्रकार महात्मा फुले यांनी 1880 साली रायगडावर गेल्याची आणि महाराजांची समाधी शोधून काढल्याची नोंद सापडते. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू करताना रायगडला भेट दिली होती. पुढे मात्र ब्रिटीश पुरातत्व खात्याने किल्ल्याच्या जतनाकडे दुर्लक्ष केलं होतं.
आज रायगडचा ऐतिहासिक वारसा जगापर्यंत पोहचवण्यासाठी रायगडवर तज्ज्ञांची टीम मेहनत घेतेय. यातूनच रायगडचा सोनेरी इतिहास लिहिला जाणार आहे.