Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक का लढत आहेत?

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (15:56 IST)
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. आज किंवा येत्या दोन दिवसांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होऊन ते निवडणुकीसाठी अर्ज भरतील असं बोललं जात आहे.
 
1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून स्वतः बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा इतर कोणाही ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने प्रत्यक्ष निवडणूक लढवली नव्हती. मात्र आता हा इतक्या वर्षांचा पायंडा मोडून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्ष स्थापन होऊन सलग 50 वर्षे झाल्यानंतर थेट तिसऱ्या पिढीतील नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे त्याची विशेष चर्चा होत आहेत.
 
'मला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे,' असं म्हणत आपल्या जनआशीर्वाद यात्रेद्वारे जोरदार मोर्चेबांधणी याआधीच केलेली आहे.
 
राज ठाकरे शिवसेनेत असताना यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती. त्यांनी मनसे हा नवा पक्ष काढल्यानंतर शिवसेनेने विद्यार्थी सेनेच्या जागी युवा सेना स्थापन केली.
 
2010 सालच्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली. गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या विषयांवर मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी निवडक मुद्द्यांवर 'आंदोलनं' केली आहेत. या विषयांच्या निवडींवरून आणि 'आंदोलनां'च्या स्वरूपांवरून त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती कळते.
 
2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.
 
आदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यासाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुल्या जिमही सुरू केल्या.
 
वरळीच का?
आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेने वरळी मतदारसंघाची निवड केली आहे. वरळी मतदारसंघामध्ये 2014 साली शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. आता सचिन अहिर स्वतःच शिवसेनेत सामिल झाले आहेत.
 
तसेच 1990, 1995, 1999, 2004 असे सलग चारवेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असावा आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली असावी.
 
मुंबईतील वरिष्ठ पत्रकार आणि "बाळ ठाकरे अॅंड, द राईज ऑफ द शिवसेना" पुस्तकाचे लेखक वैभव पुरंदरे यांच्यामते, "आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना साहजिकच सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी करणार यात शंका नाही. त्यामुळेच वरळीचा विचार केला गेला असावा."
 
पुरंदरे म्हणतात, "ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आता थेट लोकांमधून निवडून जाण्याचा निर्णय घेत आहे हे स्वागतार्ह आहे कारण निवडणुकांपासून दूर राहून राजकारण करण्यापेक्षा असं उत्तरदायी असणं जास्त चांगलं आहे. मात्र त्याचवेळेस उमेदवाराचं ऑटोमॅटिक सिलेक्शन होणं हे घराणेशाहीचं लक्षण आहे. ऑटोमॅटिक सिलेक्शन हे कोणत्याही लोकशाहीसाठी चांगलं चिन्ह नाही. कारण त्यामुळे उमेदवारीचे निकष बाजूला ठेवले जातात."
 
युवासेनेचे सेक्रेटरी वरुण सरदेसाई यांनी मात्र अजूनही वरळी मतदारसंघावर शिक्कामोर्तब झालं नसल्याचं सांगितलं." आदित्य ठाकरे यांच्यासाठी माहिम, वरळी, शिवडी, धाराशिव, कोल्हापूर, दिग्रस अशा पाच ते सहा मतदारसंघांचा विचार सुरू होता असं ते म्हणाले.
 
वरळीच्या मतदारसंघाबाबत बोलताना सरदेसाई सांगतात, "आज वरळीमध्ये शिवसेनेचा मेळावा आहे आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येणार आहेत. परंतु अजून वरळी मतदारसंघाची घोषणा झालेली नाही. आदित्य ठाकरे गेली दहा वर्षे युवासेनेचे अध्यक्ष आहेत. तसेच या काळात ते वेळोवेळी राज्यभरात दौरे करत आहेत. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आज देशात किंव राज्यात 29-30 वयाचा दुसरा कोणताही राजकीय नेता नाही. इतर युवा समजले जाणारे नेते चाळीशीच्या पुढचे आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांनी राज्यभरात युवासेनेची बांधणी केली आहे."
 
निवडणुकीनंतर खरी परीक्षा
"आदित्य ठाकरे यांची खरी परीक्षा निवडणुकीनंतर असेल," असं मत पत्रकार आणि 'द कझिन्स ठाकरे' पुस्तकाचे लेखर धवल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
 
ते म्हणाले, "शिवसेना आता किंगमेकरच्या ऐवजी किंग होण्यासाठी निवडणुकीच्या राजकारणात उतरत असावी. वरळी मतदारसंघामधील सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे तेथे फारसा विरोध होणार नाही. या मतदारसंघात झोपडपट्टीत राहाणारे गरीब आणि उंच टॉवर्समध्ये राहाणारे श्रीमंत असे दोन्ही वर्ग आहेत. या मतदारसंघातून पं. भगीरथ झा हे उत्तर भारतीय उमेदवारही विजयी होऊन विधानसभेत गेले आहेत. म्हणजेच हा मतदारसंघ मिश्र स्वरुपाचा आहे. यापुढे आदित्य ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेचा मूळचा रफ अँड टफ मतदार वर्ग टिकवून ठेवणे तसेच नव्या मराठी उदयोन्मुख वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणे तसेच निवडून आल्यावर स्थानिक मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही आव्हाने असतील."
 
ठाकरे कुटुंबीय आणि मुख्यमंत्रिपद
ठाकरे कुटुंबातील व्यक्तींनी आजवर निवडणुकीच्या राजकारणात समावेश न करण्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
 
ते म्हणाले, "मुख्यमंत्री होणार नाही असं शिवसेनाप्रमुखांनी 1995 पूर्वी म्हणजे शिवसेना-भाजपाची सत्ता येण्यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे सत्ता आल्यावर मनोहर जोशी आणि नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र या सत्ता आल्यावर या पदांमध्ये किती ताकद असते शिवसेनेच्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरे यांना समजले. 2004 साली त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केलेही होते. मात्र युतीची सत्ताच आली नाही."
 
"युतीला सत्ता का मिळाली नाही असं शिवसेनाप्रमुखांना विचारल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी 'एक फूल और दो माली' असं उत्तर दिलं होतं. म्हणजेच त्यांनी या चर्चेचा रोख नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या दिशेने वळवला होता. 2004 साली शिवसेनेच्या जागा आणखी वाढल्या असत्या तर कदाचित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेही असते. त्यामुळे निवडणुकीत न उतरण्याची भाषा सत्तेत येण्यापूर्वीची होती हे लक्षात घ्यायला हवं," अकोलकर यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments