Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाशिवरात्री : शिवलिंग कशाचं प्रतीक आहे, शिवलिंगाची पूजा कोणकोणत्या धर्मात होते?

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (08:42 IST)
जान्हवी मुळे
हिंदू धर्मियांमध्ये शिव ही देवता शंकर, महादेव, रूद्र, पशुपती, नटराज अशा अनेक नावांनी ओळखली जाते. या देवाची वेगवेगळी रूपंही आहेत, पण भारतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा ही शिवलिंग स्वरुपातच होताना दिसते.
 
अर्थात शिवलिंगाच्या रूपातही प्रांतानुसार आणि परंपरेनुसार फरक पडलेले दिसतात. उदा., मुखलिंग (शिवलिंगावर शंकराचं मुख), लिंगोद्भवमूर्ती (शिवलिंगातच साकारलेली पूर्ण शिवमूर्ती), पिंडीका किंवा पिंडी आणि लिंगायत पंथियांचं इष्टलिंग.
 
शिवलिंगाचा आकार नेमकं कशाचं प्रतिक आहे, याविषयीही मतमतांतरं दिसून येतात. काहींच्या मते शिवलिंग अग्नीच्या स्तंभाचं प्रतीक आहे, ज्याचा उल्लेख शिवपुराणात 'अनलस्तंभ' म्हणून येतो. या स्तंभाचा अंत आणि सुरुवात नाही, असंही पुराणातली कथा सांगते. 'ज्योतिर्लिंग' ही संकल्पना तिथूनच पुढे येते.
 
साधारणपणे उभट, दंडगोल आकार आणि त्याभोवती शाळुंका असा शिवलिंगाचा आकार बहुतेकांना परिचयाचा आहे. या आकाराला सयोनीज शिवलिंगही म्हटलं जातं आणि इथे उभं लिंग हे पुरुषाच्या जननेंद्रियाचं तर शाळुंका हे स्त्रीच्या योनीचं प्रतिक आहे, अशी एक धारणा त्यामागे आहे.
 
पण जननेंद्रियांचं प्रतीक असलं तरी त्यामागे कुठलीही कामुक भावना नसते, तर ते एक पावित्र्याचं चिन्हं आहे हे जाणकार आवर्जून स्पष्ट करतात. काहींच्या मते हे एक प्रकारचं 'अद्वैत'च आहे.
 
'शिवलिंगामागचा अर्थ काय आहे?
लेखक आणि पुराणकथांचे अभ्यासक देवदत्त पटनायक यांनी या प्रतीकामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याविषयी 'शिव टू शंकर - गिव्हिंग फॉर्म टू फॉर्मलेस' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते हिंदू तत्वज्ञानातील वैदिक आणि विचारांनुसार शिवलिंग हे एकतर अमूर्ताचं मूर्त रूप आहे किंवा ते शिव आणि शक्तीचं एकत्रित प्रतिक आहे.
 
पटनायक लिहितात की 'शिव आणि शक्तीचं मीलन हे आपला अंतरात्मा आणि बाहेरचं जग यांच्यातल्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतं.'
 
"शिव म्हणजे आपल्या आतलं पावित्र्य, निरीक्षण करणारी दृष्टी. शक्ती म्हणजे आपल्या आसपासचं पावित्र्य, म्हणजे ज्याचं निरीक्षण करायचं आहे ते जीवन. एकाशिवाय दुसऱ्याचं अस्तित्व असू शकत नाही. हे एकमेकांवरचं अवलंबित्व हिंदूंनी शिवलिंगाच्या रूपात दाखवलं आहे," असं पटनायक सांगतात.
 
'कल्चरल एन्सायक्लोपिडीया ऑफ द पीनस' या पुस्तकात मायकल किमेल आणि ख्रिस्टिन मिलरॉड शिवलिंगाविषयी लिहितात 'जनमानसात लिंग आणि योनी हे पुरुष आणि स्त्रीचे लैंगिक अवयव असल्याची धारणा तुलनेनं अलिकडच्या काळातली, साधारण 19व्या शतकातली आहे. हिंदू धर्माचं पालन करणाऱ्यांच्या दृष्टीनं हे पूर्णत्वाचं प्रतिक आहे, जिथे स्त्री (प्रकृती) आणि पुरुष तत्त्वांचा संगम होतो आणि निर्मिती पूर्ण होते. लिंग आणि योनीचं एकत्र येणं पुरूष आणि स्त्रीत्वाचं एकत्र येणं आहे जिथे पवित्रता साकार होते.'
 
लिंगायत लोक गळ्यात जे 'इष्टलिंग' धारण करतात, ते सत्याचं प्रतीक आहे अशी त्यांची आस्था आहे. स्री आणि पुरुष या सर्वांना हे लिंग धारण करता येतं.
 
केवळ शब्दार्थाचा विचार केला, तर संस्कृतमध्ये लिंगम् या शब्दाचा अर्थ केवळ पुरुषांच्या जननेंद्रियापुरता मर्यादित नाही. स्त्री आणि पुरुषांमधला फरक दर्शवण्यासाठी (स्त्रीलिंग, पुल्लिंग) हा शब्द वापरला जातोच, पण त्याचा एक अर्थ चिन्ह, प्रतीक, सूक्ष्मरूप असाही होतो.
 
'लिंगपूजा' परंपरांचा भाग
हिंदू धर्मसाहित्य आणि ग्रंथांमध्येही शिवलिंगाचं स्थान विशेष आहे. इतकं की त्यावर स्वतंत्र 'लिंगपुराण' आणि 'लिंगाष्टकस्तोत्र'ही रचलं गेलं आहे.
 
प्रोफेसर आणि पुरातत्वज्ज्ञ मंजिरी भालेराव सांगतात की "लिंगपूजा फक्त भारतातच होते असं नाही, तर जगभरात अनेक ठिकाणी आदिम समाजात लिंगपूजा होते. भूतानमध्येही लिंगपूजा होते आणि ती तिथल्या बौद्ध धर्माचाही भाग झाली आहे. पण भारतात एका वेगळ्या शैलीत प्रतीक म्हणून शिवलिंगाची पूजा होते. तर भूतानमध्ये ज्या लिंगाची पूजा होते ते अधिक नैसर्गिक स्वरुपात आहे."
 
हरप्पा संस्कृतीतही लिंगपूजा होताना दिसते पण हरप्पा संस्कृतीतील मूर्ती शिवच आहे, असं आपण म्हणू शकत नाही, असंही मंजिरी सांगतात.
 
इजिप्तिशन आणि रोमन संस्कृतीपासून ते अगदी अमेरिकेतील काही आदिवासी समाजांमध्येही प्रामुख्यानं प्रजननाची देवता म्हणून लिंगपूजा केली जाते. पण शिवलिंग हे केवळ प्रजननाचं प्रतीक नाही, असं देवदत्त पटनायक लिहितात.
 
"पती किंवा संततीची कामना करणाऱ्या हिंदू महिलांना शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शिवाची इजिप्शियन किंवा रोमन देवतांशी तुलना केली जाते. अशी तुलना सोयीस्कर असली, तरी ती शिवाची प्रतीकं, प्रतिमा आणि त्यामागच्या प्रतिमांपेक्षा वेगळी आहे. कारण शंकर हा प्रजनानाचा देव नाही, तर त्याच्या अगदी उलट म्हणजे तपस्या, वैराग्य आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तीचं प्रतीक आहे."
 
पण शिवलिंगाला इतका गूढ अर्थ कसा प्राप्त झाला? याचं उत्तर वैदिक काळापासून आजवर बदलत गेलेल्या शंकराच्या कथेमध्ये आहे.
 
रुद्र ते शिव असा शंकराचा प्रवास
हरप्पा काळात आणि पुढेही भारतात लिंगपूजा होत होती, मात्र ती त्यावेळेस वैदिक धर्मचा भाग नव्हती असं जाणकार सांगतात. वेदांमध्ये 'रुद्र' देवतेचा उल्लेख येतो खरा, पण वेदातील रूद्र हा आजच्या शंकरापेक्षा वेगळा होता.
 
ऋग्वेदात रूद्र हा एकप्रकारे वादळाचा देव आहे. तो उग्र, घोर, भयकंप निर्माण करणारा, ताकदवान असा जटाधारी देव आहे. त्याच्या अस्त्रांचं वर्णन हे वादळादरम्यान चमकणाऱ्या वीजेची आठवण करून देतं.
 
वैदिक काळातच विनाशकारी रूद्राचं शिव हे शांत रूप असल्याचे उल्लेख आहेत. पण पुराणकाळापर्यंत तसंच रामायण आणि महाभारतात शिवाचं रूप आणखी बदलत जातं. श्वेताश्वतरोपनिषदात रुद्र ही एक मुख्य देवता बनते. शिवाचं वाहन म्हणून नंदीचे उल्लेख पुढे येताना दिसतात.
 
एक प्रकारे वैदिक परंपरेनं पुढे लिंगरूपातील देवाचा शिव म्हणून स्वीकार केला अशी जाणकारांची धारणा आहे.
 
मंजिरी भालेराव सांगतात, "वैदिक परंपरेनं लिंगपूजेला नावं ठेवली. कारण त्यांच्या काळातील दस्यू लोक शिश्नदेव, मूलदेव, मलदेव अशांची पूजा करत असत. पण पुढे लिंगपूजा वैदिक लोकांनी मान्य केली आणि पौराणिक काळात दोन्ही रूपं एक झाली. झाडाखाली फक्त शिवलिंगाची पूजा कुषाण काळात होताना दिसते. तसंच किन्नर शिवाची पूजा करताना दाखवले आहेत."
 
शंकराच्या मानवस्वरुपातील मूर्तींची वेगवेगळी रूपं तयार होत गेली, तशी तिसरा डोळा, डोक्यावरचा चंद्र, भस्म, नीलकंठ, नंदी आणि गंगेसारखी प्रतीक जोडली गेली. पण प्रामुख्यानं शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
 
हिंदूधर्मापलीकडचा 'रूद्र'देव
भारतात एकेकाळी शिवपूजा करणारे शैव आणि विष्णूपूजा करणारे वैष्णव असे दोन गटही पडल्याचं दिसतं. शंकराची उपासना करणाऱ्यांमध्येही वीरशैव, शाक्त, लिंगायत असे पंथही निर्माण झाले.
 
बौद्ध धर्माच्या वज्रयान पंथात रूद्राचा उल्लेख आहे. त्यात भयावह अशा रुद्रावर एकादशमुख अवलोकितेश्वरानं मिळवलेल्या विजयाची कथा येते. काहीजणांच्या मते जैन धर्मातील आदिनाथांचं, ऋषभदेवांचं शंकराशी साम्य आहे.
 
म्हणजे काळानुसार, प्रदेशानुसार भारतात शिवलिंग आणि शिवाच्या उपासनेतही फरक पडतो. मंजिरी भालेराव सांगतात, "शिवाचा पगडा समाजात मोठा आहे. तो लोकधर्मातून आलेला देव आहे"
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

गुरुवारचा हा सोपा उपाय तुम्हाला श्रीमंत करेल, आर्थिक संकट दूर होईल

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख