लग्नसराईचे मुहूर्त संपले तरीही सोने दर खाली येतच नाहीत. तर दुसरीकडे सोने दराने मागील सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 34 हजार 700 रुपयांवर पोहोचला असून, इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे सोन्याचा भाव वाढले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढत आहेत. दिल्लीत सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून तो 34,470 रुपये प्रतितोळ्यावर होता. मुंबईतही ट्रेडिंग बंद होईपर्यंत सोने दराने 34,588 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने दराने उच्चांक गाठला आहे. तर देशात रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचं धोरण स्वीकारल्याने गुंतवणूकदार बँकेऐवजी सोन्यात गुंतवणूक पसंत करत आहेत. अमेरिका, चीन, इंग्लंड, भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशात व्याजदरात कपात होत आहे. त्यामुळे या सर्व देशांतील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे आता या पुढे काही दिवस तरी सोने दर वाढणार असून हीच मोठी संधी आहे की सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे जेणे करून त्याचा फायदा उचलता येईल.