Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परतीचा पाऊसः सोयाबीन सडलंय, कापसाची बोंडं काळी झालीत, आता दिवाळी गोड कशी होणार?

farm
, गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (11:35 IST)
- नीतेश राऊत आणि श्रीकांत बंगाळे
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात कापणीला आलेली पिकं पावसामुळे सडायला लागली आहेत.
 
विदर्भात पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन या पिकाला बसला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चांदुर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथील शेतकरी दत्तात्रय पुनसे यांनी तीन एकरात सोयाबीनची लागवड केली होती.
 
मात्र सततच्या पावसानं त्यांच्या शेतातली सोयाबीन खराब झालीय. सोयाबीनची अशी परिस्थिती आहे की, त्यांना आता तिची काढणीही परवडणारी नाहीये. दत्तात्रय यांचं जवळपास तीस ते चाळीस हजारांचं नुकसान झालंय.
 
शेतातील सोयाबीनकडे पाहत ते सांगतात, "शेतात जवळपास कंबरेइतकं पाणी साचलं होतं. इतक्या पाण्यात शेतात जाणंही शक्य नव्हतं. तीन एकरात लागवडीसाठी 40 हजारांचा खर्च आलाय. पण आता अशी परिस्थिती आहे की सोयाबीन काढायलाही परवडत नाही. आमचं मोठ नुकसान झालं आणि अजूनही पाऊस उघडायला तयार नाही."
 
एकट्या दत्तात्रय यांचंच नुकसान झालं असं अजिबात नाहीये. तर चांदूर रेल्वे तालुक्यात निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे.
 
काही शेतकऱ्यांनी पीक काढून शेतात गंजी लावली. पण 17 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसानं शेतमाल ओला झाला. पावसामुळं सोयाबीन काळं पडत असल्याचं शेतकरी सांगतात.
 
शेतकरी अमोल नाखले यांनी सोयाबीनची कापणी करून शेतातच गंजी लावली. पाणंद रस्त्यावर पावसामुळे चिखल झाल्यानं ते शेतमाल बाजारापर्यंत नेऊ शकत नव्हते. नाखले यांच्याकडे 15 एकर शेती आहे. त्यापैकी 12 एकरमध्ये त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती.
 
ते सांगतात, "शेतात सोयाबीनची गंजी लाऊन ठेवली आहे. पण रस्त्याची एवढी बिकट अवस्था आहे की रस्त्यानं चलता येणं शक्य नाही. झाडाला असलेली 40 टक्क्यांपेक्षा अधिक सोयाबीन खराब झाली आहे. त्यात आणखी काही दिवस सोयाबीन शेतात राहिलं तर शेतमालाची प्रतवारी खराब होऊन भाव मिळत नाही," नाखले सांगतात.
 
सध्या ओल्या सोयाबीनचे दर 3000 तर सुकलेल्या सोयाबीनचे दर 4000 ते 4200 प्रतिक्विंटल आहे.
 
सोयाबीनचे भाव हे गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे आणि असाच पाऊस असला तर सोयाबीन फेकण्याशिवाय पर्याय राहणार नाही, नाखले त्यांची चिंता व्यक्त करतात.
 
नाखले सांगतात, "पुढे सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचा फायदा आम्हाला होईल की नाही याची ही चिंता आहे. या रस्त्याच्या टोकापासून तर तीन किलोमीटर शेवटपर्यंत रस्त्याची अशीच अवस्था आहे. जर हा रस्ता चांगला झाला नाही तर मला वाटत नाही की शेतमाल घरी येईल आणि शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल."
 
एकीकडे सोयाबीनचं झालेलं नुकसान आणि दुसरीकडे काढणी झालेल्या सोयाबीन उघड्या डोळ्यानं खराब होताना पाहणं हे पुरुषोत्तम शेलोकर यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे.
 
ते सांगतात, "3 एकर शेतात अतिवृष्टीनं घात केला. त्यातून वाचून सोयाबीनची गंजी लाऊन ठेवली तिलाही आता वास सुटलाय. व्यापारी या मालाला भाव पाडूनच मागतील," पुरुषोत्तम म्हणतात.
 
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही दाणादाण
सुखदेव चाळगे हे जालना जिल्ह्यातल्या जळगाव सोमनाथ इथं राहतात. अतिपावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन आणि मका पिकांचं नुकसान झालंय.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आमची सोयाबीन पाण्यात आहे. तिला खालून कोंबं फुटायला लागलेत. 7 एकरवर सोयाबीन पेरली होती. त्यापैकी 2 एकर तर पाण्यातच आहे. दररोज पाऊस सुरू आहे. तो जर असाच सुरू राहिला तर मग काढलेल्या सोयाबीनमध्येही पाणी शिरलं."
 
किती नुकसान झालं असं विचारल्यावर ते सांगतात, आमचं जवळपास 60 % नुकसान झालं आहे. यंदा मला 60 क्विंटल सोयाबीन निघाली असती, ती आता 30 क्विंटलच्या आसपास निघेल.
 
सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली, 6 हजार कोटी रुपये दिले, अशा बातम्या येत आहेत.
 
यावर चाळगे सांगतात, "कशाची दिवाळी गोड केली. जेव्हा पैसे आमच्या खात्यावर येतील तेव्हा काहीतरी दिलासा मिळेल. पीक विमा तर कंपन्यांनी फेल केलाय. 50 ते 60 % नुकसान होऊनही आम्हाला विमा मिळत नाहीये. मग दिवाळी कशी गोड होणार?"
 
चाळगे यांच्या गावात अतिवृष्टीमुळे शेतात डोक्याइतकं गवत वाढलं साचलं आहे. यामुळे सोयाबीन काढणीही अवघड होऊन बसलंय.
 
मराठवाड्यातील कापूस पिकालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
 
जालना जिल्ह्यातील शेतकरी सिद्धू जंगले त्यांच्या गावातील परिस्थितीविषयी सांगतात, "इतका पाऊस पडलाय की ऊस सोडून बाकी पिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेलीय. कापसाचे बोंड काळे पडलेत. एक-दोन दिवस अजून पाऊस आला तर काहीच हाती लागणार नाही. जेवढा खर्च लावलाय तेवढाही निघणार नाही."
 
मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकरी, आता जसं जमेल तसं कापूस वेचून तो वाळू घालत आहेत.
 
पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रोहोकडी गावचे तरुण शेतकरी अजित घोलप सांगतात, "विदर्भ मराठवाड्यात जसं सोयाबीन, कापसाचं जसं नुकसान झालंय तसंच आमच्याकडे पण झालंय. याशिवाय पावसामुळे कांद्याच्या रोपांचंही नुकसान झालंय. जवळपास 90 % कांद्याच्या रोपाचं नुकसान आहे.
 
"एकीकडे पाऊस सुरू आहे, पण दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र ठप्प आहे. आमच्या गावात आज (19 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे, लाईट नाहीये."

ओला दुष्काळ काय असतो?
राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय.
 
यासोबतच शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, अशीही मागणी त्यांनी केलीय.
 
पण, हा ओला दुष्काळ म्हणजे काय भानगड असते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ओला दुष्काळ ही दुष्काळाच्या विरुद्ध परिस्थिती असते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत पाऊस पडल्यास त्यामुळे होणारं शेतीचं नुकसान म्हणजेच ओला दुष्काळ होय.
 
एखाद्या भागात दिवसभरात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास आणि या पावसामुळे 33 टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास त्या भागाचा समावेश ओला दुष्काळग्रस्त भागात केला जातो.
 
याअंतर्गत कोरडवाहू शेती आणि बागायती शेतीसाठी सरकारद्वारे निश्चित अशी नुकसानभरपाई दिली जाते.
 
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर भरपाईबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.
 
ते म्हणाले, "शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले की किती हेक्टरमध्ये नुकसानं झालेलं आहे, कापूस, सोयाबीन, मका असं कोणत्या पिकांचं किती नुकसान झालंय, ते समजेल.
 
"आतापर्यंत 6 हजार कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पीक विम्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी सातत्यानं संपर्कात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चितच दिली जाईल."
 
ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना काय फायदा?
अतिवृष्टीमुळे शेतमालाचं नुकसान झाल्यास ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि विरोधी पक्ष नियमितपणे करतात. पण, यामुळे नेमका काय फायदा होतो, असा प्रश्न आम्ही शेती तज्ज्ञ विजय जावंधिया यांना विचारला.
 
ते सांगतात, "ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची फी माफ होते. दुसरं म्हणजे कर्जाची वसुली थांबते. कर्जाचे हप्ते पाडले जातात आणि शेतकऱ्यांनी नवीन कर्ज दिलं जातं."
 
"सध्या सरकार शेतकऱ्यांना जी मदत देत आहे ती तुटपुंजी आहे. कारण पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती खूप वाईट आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी वेळेत घेतला नाही तर महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त कसा होणार?," असा सवाल जावंधिया उपस्थित करतात.
 
एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा आणि त्यासाठीचं धोरण ठरवण्याचा संकल्प केला आहे.
 
पंचनामे करण्याचेमुख्यमंत्र्यांचे निर्देश
 
अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
"राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
"अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा," अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
 
याआधी जाहीर केलेली मदत अशी...
राज्य सरकारनं 22 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णय जाहीर करत जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचं जे नुकसान झालंय, त्याच्या भरपाईसंदर्भात आदेश दिले आहेत.
 
त्यानुसार, कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी 13 हजार 600 रुपये, तर बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टर 36 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिरोळमधील शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटात