Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'असा ये ना...' हे गुलाबी गाणं रसिकांच्या भेटीला

'असा ये ना...' हे गुलाबी गाणं रसिकांच्या भेटीला
, शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (19:27 IST)
मराठी संगीत क्षेत्रात कायम नवनवीन प्रयोग होत आहेत. गीतलेखनापासून संगीत दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर विविध प्रकारची संगीत निर्मिती होत आहे. आजच्या सिंगल्सच्या काळातही मराठी सिंगल्सचा खूप बोलबाला आहे. आजवर बऱ्याच सिंगल्सनी रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. हिच परंपरा पुढे सुरू ठेवत रसिकांना मंत्रमुग्ध करणारं 'असा ये ना...' हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. या गुलाबी गाण्यात प्रेक्षकांना एका छोट्याशा हळूवार प्रेमकथेचाही अनुभव घेता येईल.
 
धरणी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मात्या सुनीता नायक यांनी 'असा ये ना...' या गाण्याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी मोहन नामदेव राठोड यांनी सांभाळली आहे. 'असा ये ना...' हे गाणं गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहिलं असून रोहित राऊत आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या सुमधूर आवाजात सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'असा ये ना...' या सुमधूर गाण्यात रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची अफलातून केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याच्या निमित्तानं अभिनेत्री अंजली नान्नजकर आणि अभिनेता अमित डोलावत यांना एकाच फ्रेममध्ये आणण्याची किमया दिग्दर्शक मोहन राठोड यांनी साधली आहे.

या गाण्यात प्रेमाचा एक वेगळाच रंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यात राठोड यांनी एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी सादर केली आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाच्या स्वप्नातील हे गाणं आहे. या सैनिकाची पत्नी घरी आहे. पती सीमेवर देशाच्या रक्षणाची, तर पत्नी घरी संसार सांभाळण्याची जबाबदारी चोख बजावत असताना ते मनांच्या माध्यमातून दोघे एकत्र येतात आणि त्यातून हे गाणं तयार होतं. या गाण्याचं शूटिंग सातारा येथे करण्यात आलं आहे. मोहन राठोड यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेलं 'मन काहूर...' हे गाणं खूप गाजलं आहे. याखेरीज 'दणका...' या धमाल गाण्यानं खरोखर दणका उडवला होता. 'मन धुंद पायवाट...' हे राठोड यांचं गाणं रसिकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणारं ठरलं. याखेरीज 'मेरा जहां...' या राठोड यांच्या हिंदी गाण्यानेही संगीतप्रेमींना ताल धरायला लावला आहे. आता 'असा ये ना...' हे रोमँटिक साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे. 
धरणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदाबादची असून त्यांनी सर्वप्रथम मराठी गाण्याची निर्मिती करायचं ठरवलं. धरणी प्रोडक्शन बॅनरखाली तयार झालेलं पहिलं गाणं म्हणजे 'असा ये ना...' या गाण्याच्या निर्मात्या सुनीता नायक या अहमदाबादच्या रहिवासी आहेत. चित्रपटक्षेत्राची खूप आवड असल्यामुळे त्यांनी मराठीमध्येच काम करायचं ठरवलं. प्रत्येक उत्सवाला एक गाणं स्वतःच्या यूट्यूब चॅनल वर रिलीज करायचं आणि नवीन टॅलेंटला प्रोत्साहन द्यायचं हा निर्मात्या सुनीता नायक यांचा मुख्य हेतू आहे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलाला एकच गुण मिळाला