Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सराव सामन्यात कांगारू ठरले सरस

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (08:45 IST)
फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने अध्यक्षीय संघाचा 103 धावांनी दणदणीत पराभव करताना भारताच्या दौऱ्यात विजयी सलामी दिली. भारताच्या या छोट्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. येत्या रविवारी उभय संघांमधील पहिला एकदिवसीय सामना रंगणार असून त्याआधी पाहुण्यांसाठी आजचा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा होता.
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथ व सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंसह ट्रेव्हिस हेड व मार्कस स्टॉइनिस यांनी झळकावलेली शानदार अर्धशतके आणि यष्टीरक्षक मॅथ्यू वेडची झंझावाती खेळी यामुळे नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 347 धावांची मजल मारली. त्यानंतर अध्यक्षीय संघाचा डाव 48.2 षटकांत सर्वबाद 244 धावांवर गुंडाळताना ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात शानदार विजयाची नोंद केली.
 
विजयासाठी 348 धावांच्या आव्हानासमोर श्रीवत्स गोस्वामी (43) व मयंक आगरवाल (42) वगळता वरची फळी अपयशी ठरल्याने अध्यक्षीय संघाची 8 बाद 156 अशी घशरगुंडी झाली होती. अक्षय कामेवार (40) आणि कुशांग पटेल (नाबाद 41)यांनी नवव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करीत कडवी झुंज दिली. परंतु कामेवार बाद होताच अध्यक्षयी संघाचा डाव 244 धावांवर संपुष्टात आला. ऍश्‍टन ऍगरने 4, तर केन रिचर्डसनने 2 बळी घेतले.
 
त्याआधी सलामीवीर हिल्टन कार्टराईट शून्यावर परतल्यानंतर बांगला देश दौऱ्यात दोन शतके झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 48 चेंडूंत 11 चौकारांसह 64 धावा फटकावताना कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला वेगवान पायाभरणी करून दिली. स्मिथने 68 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 55 धावांची खेळी केली.
 
वॉर्नर व स्मिथ बाद झाल्यावर ग्लेन मॅक्‍सवेल (14) फार काळ टिकला नाही. परंतु 4 बाद 158 अशा घसरगुंडीनंतर ट्रेव्हिस हेड व मार्कस स्टॉइनिस या जोडीने पाचव्या विकेटसाठी 88 धावांची भर घालताना ऑस्ट्रेलियाची आगेकूच कायम राखली. केवळ 63 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 65 धावा करून ट्रेव्हिस हेड बाद झाल्यावर स्टॉइनिसने मॅथ्यू वेडच्या साथीत सहाव्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाल आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
 
स्टॉइनिसने केवळ 60 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 76 धावा फटकावल्या. तर मॅथ्यू वेडने केवळ 24 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 45 धावांची झंझावाती खेळी केली. अध्यक्षीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदरने 23 धावांत 2, तर कुशांग पटेलने 58 धावांत 2 बळी घेतले. आवेश खान, कुलवंत खेजरोलिया व अक्षय कामेवार यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments