Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज भारत वि. पाकिस्तान सामना, 2007 चा थरार आणि शेवटच्या बॉलवर मिळालेला विजय

Webdunia
रविवार, 9 जून 2024 (14:34 IST)
ट्वेन्टी 20 वर्ल्डकपमधला सगळ्यात बहुचर्चित असा भारत-पाकिस्तान मुकाबला आज अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे.अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
क्रिकेट विश्वात सगळ्यात चुरशीचा सामना हा भारत आणि पाकिस्तानमध्ये होतो. वर्ल्डकपच्या फायनल मॅचएवढेच या देशातील लढतीकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं.
 
या लढतीच्या निमित्ताने ट्वेन्टी20 वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान लढतींचा घेतलेला आढावा..
 
मॅच टाय आणि बोलआऊटचा थरार - 14 सप्टेंबर 2007, डरबान
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपच्या व्यासपीठावर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने.
 
दरबानच्या मैदानावर हाऊसफुल्ल प्रतिसादातला हा मुकाबला चक्क टाय झाला.
 
भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 141 धावांची मजल मारली. रॉबिन उथप्पाने 39 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 33 धावांची वेगवान खेळी केली.
 
पाकिस्तानतर्फे मोहम्मद आसिफने पोषक खेळपट्टीचा फायदा उठवत 18 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या.
 
या छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज ठराविक अंतरात माघारी परतले. पण मिसबाह उल हकने 35 चेंडूत 53 धावांची खेळी करत विजयाच्या आशा जागवल्या.
 
भारतीय बॉलर्सनी शेवटच्या ओव्हर्समध्ये टिच्चून गोलंदाजी करत मिसबाह आणि पाकिस्तानला रोखलं. पाकिस्तानलाही 141 धावाच करता आल्या.
 
त्या वर्ल्डकपसाठी टाय मॅचसाठीच्या नियमानुसार बोलआऊटद्वारे निकाल लागला. बॉलर्सनी बॉलिंग करून स्टंप्सचा वेध घ्यायचा, ज्या संघाचे खेळाडू सर्वाधिक वेळा स्टंप्सचा वेध घेतील तो संघ जिंकेल.
 
अनोख्या नेतृत्वगुणांसाठी प्रसिद्ध धोनीने स्पर्धेआधी खेळाडूंचा बोलआऊटचा सराव करून घेतला होता. याचा फायदा टीम इंडियाला झाला. वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, रॉबिन उथप्पा या तिघांनाही स्टंप्सचा वेध घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला.
 
जोगिंदरची शेवटची ओव्हर, मिसबाहचा चुकलेला स्कूप- 24 सप्टेंबर 2007, जोहान्सबर्ग
प्राथमिक फेरीत पाकिस्तानला नमवून आगेकूच करणाऱ्या भारतीय संघासमोर वर्ल्डकपच्या फायनलमध्येही पाकिस्तानचेच आव्हान उभे राहिले. या सामन्यातही मिसबाह उल हक भारताच्या विजयातला अडथळा होता.
 
भारताने 157 धावांची मजल मारली. यामध्ये सर्वाधिक वाटा होता गौतम गंभीरचा. त्याने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या साह्याने 75 धावांची दिमाखदार खेळी केली. रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. पाकिस्तानकडून उमर गुलने 3 विकेट्स घेतल्या.
फायनलचं दडपण जाणवणाऱ्या पाकिस्तानच्या बॅट्समननी भारतासमोर शरणागती पत्करली होती पण मिसबाहने झुंजार खेळी करत भारताला तंगवलं.
 
महेंद्रसिंग धोनीचा शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला देण्याचा निर्णय फळला. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 6 चेंडूत 13 धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू वाईड गेला. तो चेंडू अवैध ठरला.
 
पहिल्या चेंडूवर मिसबाहला धाव घेता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर मिसबाहने षटकार खेचत पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जिवंत राखल्या.
 
मात्र तिसऱ्या चेंडूवर जोगिंदरचा चेंडू स्कूप करण्याचा मिसबाहच्या प्रयत्न श्रीसंतच्या हातात जाऊन विसावला आणि जगभरातल्या भारतीय चाहत्यांना एकच जल्लोष केला.
 
मिसबाहने सर्वाधिक 43 धावा केल्या तर इरफान पठाणने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. इरफानलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
या वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयचा ट्वेन्टी20 प्रकाराला पाठिंबा नव्हता. या स्पर्धेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. संघाची धुरा महेंद्रसिंग धोनी नावाच्या युवा विकेटकीपर बॅट्समनकडे सोपवण्यात आली.
 
धोनीने बोर्डाचा विश्वास सार्थ ठरवला आणि भारताला जेतेपद मिळवून दिलं. भारतीय संघाचं मायदेशी अभूतपूर्व स्वागत झालं. या यशाने आयपीएल सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला.
 
विराटदर्शन, 30 सप्टेंबर 2012, कोलंबो
एकतर्फी वाटाव्या अशा या लढतीत विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी करत आपली छाप उमटवली.
 
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला पण भारताच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर त्यांना या निर्णयाचा फायदा उठवता आला नाही. पाकिस्तानने 128 धावा केल्या. शोएब मलिकने 28 धावा केल्या.
भारतातर्फे लक्ष्मीपती बालाजीने 3 विकेट्स घेतल्या. रवीचंद्रन अश्विन आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
 
प्रत्युतरादाखल खेळताना भारताने गौतम गंभीरला झटपट गमावलं पण कोहलीने खेळपट्टीवर तळ ठोकत अफलातून खेळी साकारली. कोहलीलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
मिश्राजी छा गये, 21 मार्च 2014, मीरपूर
छोट्या स्कोअरच्या या लढतीत फिरकीपटू अमित मिश्रा चमकला. भारताने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.
 
पाकिस्तानला 130 धावात रोखत बॉलर्सनी हा निर्णय सार्थ ठरवला. मिश्राने 22 धावात 2 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने केवळ 18 धावा देत एक विकेट घेतली. भारताने विराट कोहली (36), सुरेश रैना (35), शिखर धवन (30) यांच्या बळावर हे लक्ष्य गाठलं.
 
पुनश्च कोहलीच, 19 मार्च 2016, कोलकाता
कोलकाताच्या भव्य इडन गार्डन्सवर लाखभर चाहत्यांच्या साक्षीने विराट कोहलीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.
 
पाकिस्तानची फलंदाजी एकदमच ढेपाळली आणि त्यांना फक्त 118 धावाच करता आल्या. शोएब मलिकने 26 तर अहमद शेहझादने 25 धावा केल्या.
भारताकडून सगळ्याच बॉलर्सनी उत्तम आणि भेदक बॉलिंगचं प्रदर्शन केलं. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानेही रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना यांना झटपट गमावलं.
 
पण विराट कोहलीने खंबीरपणे खेळ करत 37 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांची खेळी केली. युवराज सिंगने 24 तर महेंद्रसिंग धोनीने 13 धावा करत युवराजला चांगली साथ दिली. कोहलीलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
 
बाबर-रिझवानचा दणका, 24 ऑक्टोबर 2021
वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करत पाकिस्तानने दणदणीत विजय साकारला. कोरोनामुळे दुबईत झालेल्या या स्पर्धेतील लढतीत भारताने 151 धावांची मजल मारली. पण शाहीन शाह आफ्रिदीच्या तिखट माऱ्यापुढे रोहित शर्मा आणि के.एल.राहुलने शरणागतीच पत्करली. भारत या धक्क्यातून सावरलाच नाही.
 
विराट कोहलीने या सामन्यातही सातत्य कायम राखत 57 धावांची खेळी केली. ऋषभ पंतने 39 धावा करत त्याला चांगली साथ दिली. बाकी बॅट्समनना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. आफ्रिदीने 3 तर हसन अलीने 2 विकेट्स घेतल्या. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने 152 धावांच्या सलामीसह भारताला निरुत्तर केलं.
 
बाबर आझमने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 79 धावांची तर रिझवानने 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. दारुण पराभवामुळे भारतीय संघावर जोरदार टीका झाली.
 
या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यामुळे भारताचं स्पर्धेतलं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. जेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जाणाऱ्या भारतीय संघाला अशा पराभवाची अपेक्षाच नव्हती. शाहीन शाह आफ्रिदीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

यशस्वी जैस्वालने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळताना विक्रमांची मालिका केली

IND vs AUS: यशस्वी-राहुल यांनी विक्रमांची मालिका केली

IND vs AUS:बुमराहने 11व्यांदा डावात पाच विकेट घेत कर्णधार म्हणून विक्रम केला

पुढील लेख
Show comments