Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परुळेकर चौकातला फडणविस

Webdunia
बुधवार, 24 जून 2020 (07:57 IST)
माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविसांनी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना मुलाखत दिली हे कळल्यावर फडणविसांच्या काही चाहत्यांनी, काही मूर्खांनी तर काही स्वतः तयार केलेल्या चौकटीत वावरणार्‍या लोकांनी केली. चाहत्यांनी जर टिका केली असेल तर तो भाग आपण शक्यतो आजच्या लेखात चर्चेसाठी नको घेऊया. कारण चाहते हे भावनिक असतात. मूर्खांचा विषय चर्चेत घेऊन मला त्यांच्या पंक्तीत जाऊन बसायची माझी मुळीच इच्छा नाही. पण संदर्भासाठी आपण त्यांचा समाचार घेऊया. तरी हा लेख स्वतः तयार केलेल्या चौकटीत वावरणार्‍यांना समर्पित आहे असे मी सुरुवातीस जाहिर करतो.
 
सर्वात आधी सांगू इच्छितो की मी परुळेकरांनी घेतलेली फडणविसांची मुलाखत पाहिली आहे, अगदी शब्दान शब्द पाहिली आहे. या मुलाखतीत नेहमीप्रमाणे फडणविसांनी व्यवस्थित आणि योग्य उत्तरे दिली आहेत. नेहमीप्रमाणे परुळेकरांनीही मुलाखत छान घेतली. पूर्वी मी निखिल वागळे आणि परुळेकरांनी घेतलेल्या मुलाखती खूप पाहिल्या आहेत. निखिल वागळे हे कानठळ्या बसवणारे पत्रकार आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण परुळेकरांच्या मुलाखती नेहमी चांगल्याच होतात. कितीही राजकीय विरोध असला तरी आणि विशेषतः सावरकरांबद्दलची त्यांची जी बदललेली मते आहेत, ती ध्यानात घेतली तरी हे सत्य आहे.
 
आता लोकांचा या मुलाखतीला आक्षेप का होता? तर चाहत्यांना असं वाटत होतं की जे परुळेकर सावरकरांवर संदर्भहीन टिका करतात, अनेक भाजपच्या नेत्यांवर टिका करतात, स्वतः ज्ञानी असूनही मुद्दामून अज्ञानीप्रमाणे मोदींवर टिका करतात तर त्या माणसाला मुलाखत देऊ नये. मूर्खांची टिका काय होती? तर संघ आणि भाजप नेहमीच विरोधकांना जवळ करतो आणि स्वकीयांना संपवतो, असा त्यंचा समज आहे आणि स्वतः तयार केलेल्या राजकीय वा सामजिक चौकटीत वावरणार्‍यांना असं वाटत होतं की राजू परुळेकरांना मुलाखत देऊन त्यांचं महत्व वाढवू नये.
 
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि मुलाखत पाहिल्यावर आपल्या हे लक्षातही आलं असेल की परुळेकर आणि फडणविसांचे संबंध आधीपासून पुष्ट आहेत. सामाजिक, राजकीय आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये खूप मोठा फरक असतो. मी स्वतः अनेकांवर टिका करतो पण माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. माझ्यावर अनेक लोक टिका करतात तरी आमचे चांगले संबंध आहेत. काही लोकांनी मी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय मतांवर टिका केली म्हणून वैयक्तिक संबंध तोडून टाकले आहेत. हेच संघ संस्कृतीच्या विरोधात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच आपल्या विरोधकांनाही सन्मान दिलेला आहे. हीच लोकशाही आहे आणि हा हिंदुत्वाचा महत्वाचा भाग आहे. तुम्ही विरोधी किंवा तुमच्यापेक्षा वेगळ्या विचारांना थारा देतात. असं हिंदूत्वाने केलं नसतं तर इस्लामी आणि ख्रिस्ती जगतामुळे जी परिस्थिती उद्भवली ती इथे उद्भवली असती. इथे चार्वाक झाला नसता, इथे महावीर जन्मले नसते, आपण बुद्धाचे अमृत चाखता आले नसते.
 
सावरकर म्हणाले होते की राजकारणात शत्रू नसतात विरोधक वा प्रतिस्पर्धी असतात. पण सावरकरांनंतर हिंदुमहासभेच्या नेत्यांनी विरोधकांना अस्पृश्य केलं आणि अशा व अनेक राजकीय चुकांमुळे आज तो पक्ष राजकीय दृष्ट्या खूप मागे टाकला गेला आहे. असो. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही कुणाला अस्पृश्य मानलं नाही आणि भाजपा हा संघाच्या मुशीतून निर्माण झालेला पक्ष आहे. तसंच देवेंद्र फडणविसांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. मी अनेकदा त्यांच्याबद्दल ऐकलंय की ते मैत्रीला जागणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याशी मैत्री केली तर ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसत नाही. ज्यावेळी निखिल वागळे फॉर्ममध्ये होते आणि आतासारखी अवस्था त्यांची झाली नव्हती तेव्हा ते हिंदूंवर घसरायचे. उजवे कार्यकर्ते वागळेंवर टिकाही करायचे पण उजव्या नेत्यांची मात्र वागळेंना मुलाखत द्यायची इच्छा असायची. त्या पठडीतले फडणविस नाहीत. ते वेगळे आहेत. आपल्याला झळकायला मिळेल म्हणून मुलाखत दिलेली नाही तर आताची योग्य राजकीय व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन ही मुलाखत दिलेली आहे.
 
काही लोकांनी असंही म्हटलं की मोदींनी अनेक पत्रकारांना मुलाखती द्यायच्या सोडल्या तर हे चुकीचं आहे. त्यांच्या विरोधात पेरलेल्या खोट्या बातम्यांना मात्र त्यांनी प्रत्युत्तर द्यायचं सोडलेलं आहे. अगदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा. पण त्यांच्या जुन्या मुलाखती काढून पाहता येतील. अगदी राजदीप सरदेसाईंपासून सगळ्यांना त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत, अर्थात उठसूठ कुणी मुलाखती देत बसत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, विरोधकांना जवळ करताना सुद्धा काही डावपेच असतातच. जेव्हा नरेंद्र मोदींनी पीडीपीशी युती केली तेव्हा मी म्हटलं होतं की लिहिलं होतं की मोदी लवकरच ३७० हटवतील. राणे सुपुत्राने सावरकरांवर आधी गलिच्छ टिका केली होती. पण भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यातल्या त्याच सुपुत्राने दिलगिरी व्यक्त करत म्हटलं की मला सावरकर कळले नव्हते पण आता कळायला लागले. ते भाजपात आले आणि राजकीय फायद्यासाठी म्हणा किंवा खरोखर म्हणा पण त्यांच्यात परिवर्तन आलंच ना? राष्ट्रीय स्वयंसेवकाने मुस्लिम मंचाची स्थापना केली तेव्हा अनेकांनी टिका केली. पण संघाच्या जवळ असणार्‍या मुस्लिमांनी कधीही देशद्रोही भूमिका घेतली नाही, त्यांनी सीएए आणि एनआरसीवरुन दंगली घडवल्या नाही. ज्येष्ठ पत्रकार मुज्जफर हुसैन यांच्यावर ते संघाचे म्हणून बरीच टिका व्हायची. त्यांचे कोणतेही लेख काढून बघा त्यात राष्ट्रवादच झळकतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमच्या विचारांचा पाया किती मजबूत आहे यावर सगळं अवलंबून असतं.
 
राजू परुळेकर हे इन्फ्ल्युंसर आहेत. उजवी कडच्या लोकांना हे पटत नसलं तरी डावीकडच्या लोकांना उजवीकडे वळू नये यासाठी असे इन्फ्ल्युंसर कामाला येतात आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी ते उपयोगी पडतात. मी त्यांची जितकी पुस्तके वाचली आहेत, व्याख्याने पाहिली आहेत त्यावरुन मला पूर्वी कधी ते उजवे वा डावे वाटते नाही. त्यांच्या विचारांचा अतिरेकपणा बर्‍याचदा जाणवला. आता ते मुद्दामून डावीकडे वळले आहेत. म्हणजे आपल्याच पूर्वीच्या मतांपासून ते दूर पळत आहेत म्हणून ते राजू परुळेकर राहिले नसून राजू "पळू"रेकर झाले आहेत. असो. देवेंद्र फडणविसांनी परुळेकरांना मुलाखत देऊन आपला संदेश अजून व्यापक केलेला आहे. तुमच्यावर जे सतत टिका करतात त्यांना मुलाखत देऊन तुम्ही तुमचा चांगुलपणा लोकांना दाखवता, त्यांना मानणार्‍या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. बर्‍याचदा असं केल्याने त्यांना मानणारा वर्ग मनात नसतानाही आपला चाहता होतो आणि देवेंद्र फडणविसांच्या व्यक्तिमत्वात चाहते निर्माण करण्याची खुबी आहे. या मुलाखतीमुळे फडणविस राजू परुळेकरांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचले आहेत आणि या गोष्टीचा त्यांना पुढे फायदाच होणार आहे. त्यांचे जे समर्थक आहेत, जे स्वतःच्या राजकीय चौकटीत वावरतात, ते मुळात राजकारणी नाही, लोकांचं परिक्षण करु नये पण काही अपवाद सोडला तर ते सामाजिक जीवनातही नाहीत. त्यामुळे तुम्हाला राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरायचं असेल तर ही अस्पृश्यता तुम्हाला सोडलीच पाहिजे. हे लेख वाचणारे सगळेच मच्युर्ड आहेत म्हणून हे उदाहरण देतोय. या उदाहरणाचा चुकीचा अर्थ काढून व्यसनमुक्ती वगैरे बोंबलणार्‍यांना माझा आताच दूरुन नमस्कार. तर सामाजिक आणि राजकीय जीवनात असं वावरायचं की ज्या व्यक्तीवर तुम्ही सकाळी टिका करता किंवा जी व्यक्ती तुमच्यावर टिका करते त्या व्यक्तिसोबत संध्याकाळी बसून गप्पागोष्टी रंगवत तुम्हाला मद्याचे प्याले रिचवता आले पाहिजे. तरच तुम्ही सामाजिक आणि राजकीय जीवनात टिकू शकता. सामाजिक आणि राजकीय जीवनात अस्पृश्यता नसते. टिकेमुळे वैयक्तिक संबंध बिघडू द्यायची नसतात.
 
म्हणून राजू परुळेकरांना मुलाखत देऊन फडणविसांनी योग्य काम केलं आहे. त्यांचे जे चाहते आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी फडणविस कलाकार किंवा नकलाकार नसून ते राजकारणी आहेत आणि आपण एका राजकीय नेत्याचे चाहते आहोत. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं मन दुखावणार नाही. ही मुलाखत जर कुणी पाहिली नसेल तर अवश्य पाहा. यात फडणविस खूप जवळून कळतात. कारण ही म्हणावी तशी राजकीय मुलाखत नाही. त्या दिलखुलास गप्पा आहेत. फडणविसांवर रागावण्यापेक्षा त्यांचे चाहते त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणू शकतात. वारे उलट्या दिशेने वाहायला सुरुवात झालेली आहे. हा परुळेकर चौकातला फडणविस आहे.  म्हणजेच विरोधकाच्या शिबिरात जाऊन आपला झेंडा रोवणारा, योग्य वेळी योग्य पाऊल उचलणारा एक सुजाण नेता.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments