Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सौर वादळ म्हणजे काय? पृथ्वीवर त्याचा काय परिणाम होणार आहे?

Webdunia
सोमवार, 12 जुलै 2021 (23:15 IST)
ऋजुता लुकतुके
सूर्याच्या वातावरणात तयार झालेल्या एका वादळामुळे मोबाईल फोन, सॅटेलाईट टीव्ही सेवा खंडित होण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेतली प्रसिद्ध हवामान अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय.
 
सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. आणि सोमवारी ते पृथ्वीवरही धडकू शकतं.
सोलार स्टॉर्म किंवा सौर वादळामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? पृथ्वीवर तापमान अचानक वाढेल का?
 
इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? आणि याहूनही बेसिक म्हणजे मूळात सौर वादळ म्हणजे नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया…
 
सौर वादळ म्हणजे काय?
अमेरिकेतली अंतराळ संस्था नासानेही या येऊ घातलेल्या सौर वादळाबद्दल बरीच माहिती दिलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, 3 जुलैला सकाळी 10 वाजून 29 मिनिटांनी सूर्याच्या वातावरणात एक मोठा स्फोट होऊन वादळ तयार झालंय.
 
हे वादळ प्रती तास 1.6 मिलियन किलोमीटर वेगाने अंतराळात फिरतंय. या वेगाने रविवार (11 जुलै) किंवा सोमवार (12 जुलै) ला ते पृथ्वीवर धडकू शकेल असं म्हटलं जातंय.
 
विचार करा. सूर्यापासून पृथ्वी 9 कोटी 30 लाख मैल दूर आहे. पण या सौर वादळाचा वेगच असा आहे की, नऊ दिवसांत ते पृथ्वीच्या जवळ येऊन ठेपलंय.
 
नासातल्या शास्त्रज्ञांच्या मते सूर्याच्या वातावरणात झालेला स्फोट शंभर मेगाटन क्षमतेचे हायड्रोजन बाँब एकाच फुटण्या इतका मोठा होता. त्यातून आपल्याला या वादळाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकेल.
 
पण, मूळात सौर वादळ म्हणजे काय? आणि पृथ्वीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
सोप्या शब्दात सांगायचं तर सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या सनस्पॉट्स म्हणजे चमकणाऱ्या ठिपक्यांमधून चुंबकीय उर्जा उत्सर्जित होत असते त्यांचा सूर्याभोवतालच्या वातावरणात झालेला स्फोट.
 
या स्फोटातून तयार झालेलं वादळ कधी कधी सूर्याचं चुंबकीय क्षेत्र ओलांडून सौरमालिकेत सगळीकडे पसरतं.
 
तसंच काहीसं आता झालंय. मोठ्या क्षमतेच्या या वादळामुळे ते सूर्यापासून अंतराळात प्रवास करून आता पृथ्वीच्या दिशेनंही सरकलंय. यात आहेत सूर्याच्या वातावरणात असलेले प्रोटॉनचे कण आणि इलेक्ट्रॉन पार्टिकल्स.
साधारणत: सूर्याचा जो पृष्ठभाग पृथ्वीच्या दिशेला असतो, त्या पृष्ठभागावर झालेले स्फोट पृथ्वीवरून दिसू शकतात किंवा अनुभवता येतात.
 
पण, त्यांचा पृथ्वीवर थेट परिणाम होतोच असं नाही. कारण, ती अंतराळातच विरतात. पण, आताचं वादळ थेट पृथ्वीपर्यंत पोहोचलंय.
 
या सौर वादळाचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सौर वादळांची क्षमता किंवा तीव्रता ही इंग्रजी आकड्यांवरून मोजली जाते. म्हणजे ए-टू-झेड. यातलं सगळ्यांत कमी क्षमतेचं A वादळ तर X खूप मोठ्या क्षमतेचं. आताच्या वादळाची तीव्रता शास्त्रज्ञांनी एक्स-1 (X -1) असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला तीव्रता लक्षात येईल.
 
आणि म्हणून यावेळी पृथ्वीवर या वादळाचा दृश्य परिणामही दिसू शकतो.
 
वादळ पृथ्वीपर्यंत पोहोचल्यामुळे पृथ्वीभोवतालचं वातावरण गरम होऊन अंतराळातल्या उपग्रहांकडून येणारे संदेश खंडित होऊ शकतात.
 
किंवा विस्कळीत होऊ शकतात. जीपीएस, मोबाईल फोन, सॅटेलाईट टीव्ही या सेवांवर त्यामुळे परिणाम होऊ शकतो. पण, जीपीएस बंद पडण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
वीज पुरवठ्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. आणि काही ठिकाणी वीजेचे ट्रान्सफॉर्मर जळू शकतात.
 
उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरच्या देशांना मात्र या काळात रात्रीच्या वेळी अवकाशात सूर्याचं अप्रतिम रुप दिसू शकतं.
 
सौर वादळ ही घटना अंतराळ विज्ञानाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे आणि यावेळच्या वादळाची काय वैशिष्ट्य आहेत जाणून घेण्यासाठी बीबीसीने खगोलशास्त्र विषयक लेखन केलेले आणि खगोल मंडळाचे माजी संचालक प्रदीप नायक यांच्याशी संपर्क साधला.
 
त्यांच्या मते, खगोल शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही घटना खूप महत्त्वाची आहे. आणि सौर वादळ थेट पृथ्वीवर आदळणार असल्यामुळे वादळांचा अभ्यास त्यांना करता येईल.
 
"सूर्याच्या अकरा वर्षांच्या एका सायकलमध्ये अशी भरपूर वादळं होत असतात, पण, शास्त्रज्ञांना आतापर्यंत त्यांची भाकीत वर्तवता आलेली नाहीत. ही वादळं कधी होतील, त्यांचा नेमका काय परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर होईल याचं भाकीत वर्तवता येईल अशी माहिती गोळा करण्यासाठी खगोल शास्त्रज्ञ आताच्या वादळाकडे आशेनं बघत आहेत," प्रदीप नायक यांनी सांगितलं.
 
बाकी सर्वसामान्य लोकांवर त्याचा फारसा परिणाम होईल असं नायक यांना वाटत नाही. 1990च्या अशा सौर वादळाचं उदाहरण ते देतात, जेव्हा कॅनडामध्ये वीजेची ग्रीड उध्वस्त होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. पण, सर्वसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झाला नाही.
 
"आताही पृथ्वीच्या वातावरणात हे वादळ धडकणार असल्यामुळे उपग्रहांकडून येणारे संदेश कदाचित आपल्यापर्यंत नीट पोहोचणार नाहीत. त्यामुळे सॅटेलाईट टीव्ही, मोबाईल टेलिफोन यावर वादळांचा काही काळ परिणाम होईल. ही सेवा थोडीशी विस्कळित होईल.
 
"आपण आपल्या जगण्यावर परिणाम होणार नाही. उलट उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळ असलेल्या देशांना मध्यरात्रीच्या सुमारास सूर्याचं सुरेख दर्शन होऊ शकेल, ज्याला नॉर्दन आणि सदर्न ऑरोरा असं म्हणतात. हे दृश्य विहंगम असतं," नायक यांनी आपलं बोलणं पूर्ण केलं.
 
थोडक्यात सौर वादळ ही काही घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही. अकरा वर्षांत सूर्याच्या वातावरणात अशी दीड हजारच्या वर वादळं तयार होत असतात. आणि त्यातली साधारण दीडशे आताच्या वादळाच्या म्हणजे 'क्ष' तीव्रतेची असतात.
 
पण, यावेळी पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर आहे तिथूनच हे वादळ येत असल्यामुळे ते पृथ्वीवर पोहोचण्याची शक्यता बळावलीय. पण, जेव्हा ते पृथ्वीसमोर येतं तेव्हा अंतराळ शास्त्रज्ञांना आपलं विश्व ज्या ताऱ्याभोवती फिरतं त्या सूर्याची ओळख व्हायला उलट मदतच मिळते.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments