Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरी-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी...मी मराठी!

Webdunia
शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (11:56 IST)
मराठी भाषेचा प्रवास
 
कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढेल या ओळीतून. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस. इ. सन 500-700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. 
 
शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी 'परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।' अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी 'भागवत' ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे 13 व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.> > कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. त्यापैकी 1250 ते 1350 या काळातील यादवी सत्ता, 1600 ते 1700 या काळातील शिवरायांचीसत्ता, 1700 ते 1818 पेशवाई सत्ता आणि 1818 पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्‍हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.
 
शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो. त्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिणसाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. या पत्रांचा समावेश 'मराठी रुमाल' किंवा 'पेशव दफ्तर' या सारख्या संग्रहातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आज्ञापत्रात' मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते. तसेच यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो, हे सिद्ध होते.
 
पेशवेकाळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणारी पंडिती कविता लिहिल्या गेल्या. यातील कथाभाग, अलंकारिकता, अभिजात भाषावैभव या विशेषामुंळे पंडिती कवितेने मराठीला समृद्ध केले आहे. उदा. रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती, स्वयंवर अशी अजरामर काव्ये लिहिली. यानंतरच्या काळात लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली. भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणार्‍या शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचे एक भूषण आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पोवाडा हा प्रकार होय.
 
यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी भाषेच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे इंग्रजी साहितच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे अनेक नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले. 'केशवसुत' हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते. आधुनिक कवितेमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांचा भावनांचा आविष्कार दिसून येतो. कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंधही महत्त्वाचे ठरत असल्याने सामाजिक जाणिवेने मराठी कवितेला नवे वळण देण्याचे कार्य मर्ढेकरांच्या कवितेने 1940-45च्या काळात केले. मानवी जीवनातील असंगतता, मल्यांची पडझड, एकाकीपणा या कवितेतून व्यक्त होताना दिसतो.
 
मराठी भाषेतील पद्य साहित्या आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा 'शेतकर्‍यांचा आसूड' हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकरंचे झालेले हाल, नवीन शैलीने रेखाटले आहे. तनंतर वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
 
- प्रा. डॉ. वंदना भानप

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments