Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न ठेवणं आरोग्यासाठी घातक असतं का? जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (21:25 IST)
ऑफिसला जाताना सँडविच नेण्यासाठी, फ्रिझरमध्ये अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी आणि उरलेले खाद्यपदार्थ मायक्रोव्हेवमध्ये गरम करण्यासाठी आपण प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करत असतो. परंतु ते सुरक्षित आहेत का आणि आपल्याला त्यासाठी पर्याय शोधण्याची गरज आहे का?
 
आपल्यापैकी अनेकजणांसाठी प्लास्टिक कंटेनर्स हे दैनंदिन जीवनाचा भाग आहेत; विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची साठवण करण्यासाठी, फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी, गरम करण्यासाठी आणि खाद्यपदार्थ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो.
 
परंतु काही वैज्ञानिकांना अशी काळजी वाटतेय की, प्लास्टिकमधील रसायनांमध्ये आपल्या शरीराचं नुकसान करण्याची क्षमता आहे.
 
प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले हजारो घटक हे आपण खात असलेले खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये मिसळू शकतात, असं अभ्यासातून आढळून आलं आहे.
 
परंतु असे कंटेनर्स बनवणारे आणि अन्न सुरक्षा अधिका-यांचं असं म्हणणं आहे की, याचं प्रमाण इतकं नगण्य आहे की त्याचा माणसांच्या आयोग्यावर कोणताच विपरित परिणाम होणार नाही.
 
अन्न मानकांच्या एजन्सीतर्फे तयार करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये प्लास्टिक तयार करताना खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणा-या कोणत्या घटक पदार्थाचा वापर करावा आणि कशाचा करू नये याबद्दल माहिती आहे.
 
या नियमांअंतर्गत निर्मात्यांनी पदार्थांना अपायकारक ठरेल इतक्या प्रमाणात रसायनं सोडणा-या घटकपदार्थाचा वापर करणं बेकायदेशीर आहे.
 
प्लास्टिकचा वापर कोणकोणत्या परिस्थितीत केला जाणार आहे, ज्यामध्ये पदार्थाचं तापमान, पदार्थांचा प्रकार आणि पदार्थ साठवण्याचा कालावधी याचादेखील निर्मात्यांनी विचार करायला हवा.
 
अन्न मानक एजन्सीच्या मते, उत्पादनांची चाचणी आणि कायद्याचं पालन केल्याचं निर्मात्यांना सिद्ध करता आलं पाहिजे.
 
तथापि, काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या नियमांची अंमलबजावणी होत नाही आणि विशेषत: ज्यामध्ये गरम पदार्थ ठेवले जातात किंवा पदार्थ गरम करण्यासाठी वापरले जाणारे खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कंटेनर्स आपल्या शरीरास हानी पोहचवत नाहीत, हे दावे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आकडेवारी उपलब्ध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
आकडेवारीचा अभाव
ब्रिटिश प्लास्टिक फेडरेशनच्या मते, सर्वसाधारणपणे खाद्यपदार्थांचं पॅकेजिंग करण्यासाठी पॉलीप्रोपायलीन (वेफर्स ते बिस्किटांपासून सर्व प्रकारच्या पाकिटांमध्ये त्याचा वापर केल्याचं दिसतं) प्लास्टिकचा वापर केला जातो.
 
आपल्यापैकी अनेकजण टेक-अवे खाद्यपदार्थांचे कंटेनर्स साठवून ठेवतात किंवा त्याचा पुनर्वापर करतात, तेसुध्दा याच प्रकारच्या किंवा पॉलिथेलीन या दुस-या प्रकारच्या प्लास्टिकपासून किंवा दोन्हींपासून बनवले जातात.
 
परंतु उत्पादनाच्यावेळी इतर अनेक रसायनंदेखील मिसळली जातात. उदाहरणार्थ- रंगद्रव्ये आणि कंटेनरला लवचिक बनवण्यासाठी अतिरिक्त पदार्थांचा वापर केला जातो.
 
“प्लास्टिकची रासायनिक रचना अतिशय गुंतागुंतीची आहे,” असं फूड पॅकेजिंग फोरम या स्वित्झर्लंडस्थित गैर-नफा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. जेन मुनके म्हणतात.
 
उत्पादनाच्यावेळी रसायनं एकमेकांच्या संपर्कात आल्यानेच फक्त त्यामध्ये बदल होत नाही, तर मिश्रणात अज्ञात घटक देखील टाकले जातात. हेतूशिवाय समाविष्ट केलेले घटक म्हणून ते ओळखले जातात.
 
प्लास्टिकमधून काही रसायनं खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये शोषली जातात आणि काही आपल्या शरीरात शोषली जातात याबाबत कोणताही वाद नाही.
 
"आम्हाला हे देखील माहित आहे की रसायनं मोठ्या प्रमाणात हस्तांतरित होण्यासाठी विशिष्ट प्रकारचं अन्न देखील कारणीभूत ठरू शकतं,” असं डॉ मुनके म्हणतात.
 
उदाहरणार्थ- आम्लयुक्त पदार्थ (टोमॅटो सॉस) किंवा चरबीयुक्त पदार्थ (लसाने) इतर पदार्थांपेक्षा प्लास्टिकच्या कंटेनरमधून जास्त रसायनं शोषून घेतात.
 
“गरम पदार्थांमधून देखील मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होतं. याचा अर्थ असा आहे की, जे प्लास्टिकचं कंटेनर तुम्ही सॅलड साठवण्यासाठी वापरता त्याच कंटेनरमध्ये अन्न मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात रसायनं शरीरात जाण्याची शक्यता अधिक असते.”
 
2022 साली शास्त्रज्ञांच्या एका गटाने 388 ‘चिंताजनक रसायनां’ ची एक यादी प्रसिद्ध केली, जे अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या उत्पादनांमध्ये वापरले जाऊ शकतात.
 
कर्करोगासाठी कारणीभूत ठरणा-या अथवा इतर मार्गांनी आरोग्याला हानी पोहचवण्याच्या किंवा लहान कणांमध्ये रूपांतरीत होऊन वातावरणात साचत जाण्याच्या आणि प्रवाही राहण्याच्या संभाव्य क्षमतेमुळे ‘चिंताजनक रसायनां’मधील घटक धोकादायक मानले जातात.
 
‘अन्नाच्या संपर्कात येणा-या चिंताजनक पदार्था’ मधील 388 पैकी 197 पदार्थ हे खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणाऱ्या प्लास्टिकच्या निर्मितीमध्ये वापरले जातात, ज्यामध्ये खाद्यपदार्थ पॅकेजिंग, अन्न साठवण्याचे कंटेनर, जेवणासाठी वापरण्यात येणारी ताटं, काटे-चमचे आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होतो. यामधील अनेक रसायनं अन्नपदार्थांमध्ये हस्तांतरित होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
 
डॉ. मुनके म्हणतात, "दरदिवशी यापैकी कोणत्याही रसायनांच्या संपर्कात आल्याने तुम्हाला कर्करोग किंवा आरोग्याच्या इतर समस्या भेडसावतील हे निश्चित नाही. परंतु दररोज अशा रसायनांच्या संपर्कात न येण्याच्या तुलनेत संपर्कात आल्याने जुनाट आजार बळावण्याचा धोका वाढतो."
 
चिंताजनक रसायनं
हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील तज्ञांच्या मते, आपण फार कमी कालावधीसाठी रसायनांच्या संपर्कात आलो तरी प्लास्टिकमधील अनेक रसायनं 'काळजी करण्यासारखी' असतात.
 
“परिणामी, उतरत्या वयात आरोग्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात," असं डॉ रुस हॉसर हे हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाइटवर लिहितात.
 
"आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण एकाच वेळी अनेक रसायनांच्या संपर्कात असतो ज्यांचे अतिरिक्त प्रतिकूल परिणाम होऊ शकतात".
 
प्लास्टिकमध्ये आढळणारी खासकरून दोन रसायनं विवादास्पद आहेत: फॅथलेट्स (phthalates) (प्लास्टिक मऊ करण्यासाठी वापरतात) आणि बिस्फेनॉल ए, जे सामान्यपणे ‘बीपीए’ (BPA) (अतिशय टणक प्लास्टिक बनवण्यासाठी वापरतात) म्हणून ओळखलं जातं.
 
दोघांना ‘एन्डोक्राइन डिसरप्टर्स’ म्हणून ओळखलं जातं, याचा अर्थ ते शरीरातील हार्मोन्समध्ये हस्तक्षेप करतात आणि त्याचे संभाव्य परिणाम सामान्यपणे होणारी वाढ, प्रजनन आणि प्रजोत्पादन यासारख्या जैविक प्रक्रियांवर होऊ शकतात.
 
अलीकडे, युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी (इएफएसए) ने ‘बीपीए’ बद्दलच्या पुराव्यांचं परीक्षण केलं आणि ते आरोग्यासाठी घातक असण्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे दैनंदिन जीवनातील सेवनाच्या सहनशीलतेत (TDI) लक्षणीयरीत्या घट झाली - ज्याचं सेवन आरोग्य धोक्यात न घालता आयुष्यभर दररोज केलं जाऊ शकतं.
 
नवीन TDI हा परीक्षणापूर्वीच्या तुलनेत 20,000 पट कमी आहे.
 
इंग्लंडमध्ये अर्भक आणि लहान मुलांच्या वापरण्यासाठी असलेल्या वस्तूंमध्ये म्हणजेच दूध पाजण्याच्या बाटल्या आणि औषधांची मापं यामध्ये ‘बीपीए’चा समावेश करता येत नाही.
 
‘एफएसए’ आणि अन्न, ग्राहकपयोगी उत्पादनं आणि पर्यावरणातील विषारी रसायनं यावर काम करणारी सरकारची स्वतंत्र कमिटी सध्या ‘बीपीए’ वरील ताज्या पुराव्यांचं परीक्षण करतेय.
 
पॉलीप्रोपीलीन किंवा पॉलीथिलीन किंवा दोन्हीचे मिश्रण असलेल्या प्लास्टिकच्या खाद्यपदार्थांच्या कंटेनर्समध्ये सामान्यपणे बीपीए किंवा फॅथलेट्सचा समावेश नसतो, असं ब्रिटीश प्लास्टिक फेडरेशनने म्हटलंय.
 
सावधगिरी बाळगताना होणारी चूक
मग, आपल्या अन्नामध्ये कोणत्याही प्रकारची रसायनं शोषली जाऊ नयेत याची काळजी घ्यायची असेल तर कोणत्या प्रकारची भांडी वापरायला हवीत?
 
“समस्येपैकी एक गोष्ट म्हणजे प्लास्टिकची रचना सतत बदलत असते,” असं वॉशिंग्टनमधील नॅशनल सेंटर फॉर हेल्थ रिसर्चच्या अध्यक्ष डॉ. डायना झुकरमन म्हणतात.
 
"बहुतांश लोकांप्रमाणे माझं स्वयंपाकघरसुद्धा जुन्या प्लास्टिकच्या कंटेनरने भरलेलं आहे आणि त्यामध्ये काय ठेवलंय याची मला कल्पना नाही."
 
प्लास्टिकमध्ये कोणतंही रसायन असलं तरी कालांतराने त्याचं विभाजन होतं आणि काही प्रमाणात ते अन्नपदार्थांमध्ये आपला अंश सोडू शकतं.
 
"जेव्हा प्लास्टिक गरम केलं जातं किंवा जुनं होतं, वारंवार वापरलं जातं आणि धुतलं जातं तेव्हा असं होण्याची शक्यता असते," असं त्या म्हणाल्या.
 
प्लास्टिकमधील रसायनं आणि ते किती प्रमाणात अन्नाला चिकटू शकतात याबद्दलच्या माहितीचा अभाव लक्षात घेता, विशेषतः गरम अन्नासाठी आणि अन्न मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी डॉ झुकरमन काचेच्या किंवा सिरॅमिक कंटेनरची निवड करण्याचा सल्ला देतात.
 
“उत्पादनांवर जेव्हा कंटेनर मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित आहे, असं लिहिलं असतं, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याचा अंश पदार्थात जाणार नाही," असं डॉ झुकरमन म्हणतात.
 
“मी प्लास्टिकमध्ये काहीही गरम करत नाही – मी ते एका काचेच्या किंवा पायरेक्स कंटेनरमध्ये ठेवतो आणि पेपर टॉवेल किंवा प्लेटने अन्न झाकतो. इतरांनीही तेच करावं, असा सल्ला मी देतो.”
 
अन्न साठवण्यासाठी कोणतं प्लास्टिक सुरक्षित?
अॅकेडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स ही अमेरिकेतील अन्न आणि पोषण व्यावसायिकांची जगातील सर्वात मोठी संस्था थंड अन्नपदार्थ साठवण्यासाठी ग्राहकांना फक्त प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करण्याचा सल्ला देते.
 
खाद्यपदार्थांच्या बहुतांश प्लास्टिक कंटेनर्समध्ये तळाशी एक त्रिकोण असतो ज्यामध्ये एक ते सात क्रमांक असतात, ज्यावरून ते तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आलाय, हे ओळखता येतं.
 
अॅकेडमीच्या मते, अन्नासाठी क्रमांक एक, दोन, चार आणि पाच हे पर्याय वापरासाठी सर्वात सुरक्षित आहेत. अमेरिकन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सने तीन, सहा आणि सात कोड असलेले प्लास्टिक कंटेनर टाळण्याची शिफारस केली आहे.
 
‘बीपीए’च्या प्रवक्त्याने सांगितलं की, अन्नपदार्थांशी संपर्कात येणारं कोणतंही प्लास्टिक उत्पादन मंजूर करण्याआधी त्याने ‘एफएसए’च्या 'अत्यंत कठोर' मानकांची पूर्तता करणं आवश्यक आहे. त्यांनी म्हटलं की, हेतुशिवाय समाविष्ट केलेले घटक सहसा केवळ रिसायकल केलेल्या प्लास्टिकमध्ये आढळतात.
 
परंतु "सध्या थेट अन्नाच्या संपर्कात येणा-या रिसायकल केलेल्या पॉलीप्रोपीलीन किंवा पॉलिथिलीनला (रिसायकल केलेल्या पॉलिथिलीनच्या दुधाच्या बाटल्या वगळता) मान्यता देण्यात आलेली नाही, त्यामुळे यात कोणतीही अडचण असता कामा नये.”
 
प्लास्टिकचे डबे आरोग्यासाठी धोकादायक आहेत, असं सर्वच तज्ज्ञांना वाटत नाही. इंग्लंडच्या कॅन्सर रिसर्चच्या डॉ. रॅचेल ऑरिट म्हणतात की, प्लास्टिकच्या वापरामुळे कर्करोग होतो याचे सबळ पुरावे नाहीत.
 
"प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे आणि अन्न साठवण्यासाठी प्लास्टिकचे कंटेनर आणि पिशव्या वापरणं याचा यामध्ये समावेश होतो,” असं त्या म्हणतात.
 
"या कंटेनर्समध्ये अन्न एकावेळी तासभर गरम केलं तरी त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढत नाही."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

जास्वंदा पासून बनवलेल्या कंडिशनरने केसांना चमक आणा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळा विशेष रेसिपी : मटारचे पराठे

नियमित मल्टीविटामिन घेणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?

पुढील लेख
Show comments