Dharma Sangrah

चिऊताई दार उघड

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (17:02 IST)
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
 
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
 
दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
 
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
 
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .
 
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
 
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
 
दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !
 
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
 
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
 
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
 
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
 
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
 
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
 
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
 
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
 
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
 
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
– मंगेश पाडगावकर
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

४० वर्षांच्या वयातही प्रजनन क्षमता कायम राहील, Ovaries म्हातारे होण्यापासून वाचवतील हे '३ मॅजिकल फूड्स'

Holi Special ओठावर ठेवताच विरघळणारी रसाळ पाकातील करंजी

Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

या कडू गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, इतर फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments