दोघांचीही निवृत्ती झाली होती
साठी कधीच ओलांडली होती
अजूनही परिस्थिती ठीक होती
हातात हात घालून ती चालत होती
तो राजा ती राणी होती
जीवन गाणे गात होती
झुल्यावरती झुलत होती
कृतार्थ आयुष्य जगत होती
अचानक त्याची तब्बेत बिघडते
मग,मात्र पंचायत होते
तिची खूपच धावपळ होते
पण,कशीबशी ती पार पडते
आता तो सावध होतो
लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो
वारसाची पुन्हा खात्री करतो
मृत्यू-पत्राची तयारी करतो
दुसर्या दिवशी बँकेत जातो
पासबुक तिच्या हातात ठेवतो
डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो
तिलाच पैसे काढायला लावतो
पुन्हा तिला सोबत घेतो
वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो
तिलाच रांगेत उभं करतो
बिल भरायचं समजाऊन सांगतो
अचानक तिला सरप्राईज देतो
टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो
वाय-फाय, नेटची गंमत सांगतो
नवा सोबती जोडून देतो
बाहेरच्या जगात ती वावरू लागते
प्रत्येक व्यवहार पाहू लागते
कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो
निश्चिंत होत तो हळूच हसतो
बदल त्याच्यातला ती पहात असते
मनातलं त्याच्या ओळखतं असते
थोडं थोडं समजतं असते
काळजी त्याचीच करत राहते
एक दिवस वेगळेचं घडते
ती थोडी गंमत करते
आजारपणाचा बहाणा करते
अंथरूणाला खिळून राहते
भल्या पहाटे ती चहा मागते
अन् किचन मध्ये धांदल उडते
चहात साखर कमी पडते
तरीही त्याचे ती कौतुक करते
नाष्ट्यासाठी उपमा होतो
पण,हळदीच्या रंगात खूपच रंगतो
दिवसा मागून दिवस जातो
अन् किचनमधला तो मास्टर होतो
कोणीतरी आधी जाणार असतं
कोणीतरी मागं रहाणार असतं
पण,मागच्याच आता अडणार नसतं
अन् काळजीच कारण उरणार नसतं
सह-जीवनाचं नाणं उडत असतं
जमीनीवर ते पडणार असतं
आधी, काटा बसतो की छापा दिसतो
प्रश्न एकच छळत असतो...