पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें
दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें
नाशासि पारसिक तेहि पलांत गेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें
जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, त
ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें
त्याही महाप्रथित रोमकपत्तनाचें
हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही
उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं
हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें
विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?
-विनायक दामोदर सावरकर