Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सध्याचे हॉटेलिंगचे वेड....

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (12:07 IST)
एक विचार करण्याचा मुद्दा.
 
हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेलमधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. 
 
मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणि मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे....
 
मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतून आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगून अंतर्धान पावतो.....
 
बसणाऱ्यांच्या हिशोबाने मिळालेले टेबल कसेतरी पुरेसे असते. 
 
मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसून चेहेऱ्यावर कृत्रिम आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. 
 
१-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच ठरलेल्या भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते....
 
तेव्हढयात वेटर येऊन मेनुकार्ड भरभर उचलून पाणी 'साधे का बिसलेरी’ असे विचारतो......
 
दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असूनसुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो....
 
मग बराच वेळ ताटकळत ठेऊन, 
 
८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", कोल्डींग इ. गोष्टी येतात....
 
या सर्व गोष्टी आल्यावर, हातच काय पण बोटसुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही, पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो.... 
 
सहाजिकच स्टार्टर्सची क्वांटीटी कमी असल्याने, जेमेतेमे एक-एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो...पण आम्ही एकदम मस्त मुडमधे !
 
मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटरकडे आपण आशाळभूतासारखे पाहून थोडासा अवधी मागून घेतो....
 
कोणी व्हेज, कोणी जैन फूड असे ठरत ठरत आपण शेवटी, वेटरनी ’सजेस्ट’ केलेले पदार्थ ऑर्डर करतो..... 
 
त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेशमधे राहिलेले स्टार्टर्सचे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस इ.पदार्थांचे सेवन, सो-कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते.....
 
तोपर्यंत आजुबाजूला असलेल्या एखाद्या ग्रुपमधे जोरदार हसण्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो.....तो उसनी श्रीमंती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो.
 
त्यातच एखादे अगम्य "म्युझिक" (?) बॅकग्राउंडला लावलेले असते...
 
थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतय, पण ए.सी. तर चालू असतो. मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला’ सांगतो,  तो ’वाढवल्यासारखे’ करून निघून जातो, थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही. मग खूपच गर्दी आहेना, ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्सच्या वाटणीच्या मागे लागतो....
 
काही चांगल्या, काही अपेक्षाभंगीत, काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मूडमधे जेवण सुरू करतो....
 
मग सुरूवातीला काही विनोद, मग एस.एम.एस, मग ’नेबर्स’ बद्द्ल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्कींग प्रॉब्लेम... इ. इ. इ. विषय ’डिस्कस’ करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणि वातट रोटी अजून शिल्लक आहे......
 
मग ती रोटी कशीबशी संपवून न-वाफाळणारा ’स्टीम राईस’ समोर येतो... आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल’ सांगितली, जाते जी डाल, राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा किवा दह्या बरोबर ढकलला जातो......
 
लगेच फिंगर ’बाउल’ ची आज्ञा सुटते आणि नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बाउल येतात.....
 
कसेतरी बुचकळून हात ’साफ’ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. ...
 
बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो-कॉल्ड ’डेझर्ट’ आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.....
 
एका पापडाचे 30/50 रू; 
एका रोटीचे 30/50 रू;   
एका सुपचे 125/175रू; 
एका भाजीचे 200/300रु; 
व डेझर्ट आर्डर केले असेल तर तर एका डीशचे 250/300रू; 
असे एकुण 3500/5000 रू. चे बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो. ....
 
मग त्या बिलाचा राग म्हणा किवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा, पण आपण सुगंधीत बडीशोप, चवळ्या मटक्या व टूथपिक, भरभरून घेतो.....
 
बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्यासारखा, आपण १०-२० रू. टीप ठेवतो आणि बाहेर पडतो. 
 
मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत’ करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.....
 
जरा विचार करा की आपण खालेल्या पदार्थांचे मूल्यांकन पटण्यासारखे असते का? कितपत स्वादिष्ट व आरामदायक होते ते जेवण ? किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ? 
 
हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी, जेमेतेमे २०-२५ मिनिटांच्या गप्पा, आणि निम्याहून अधिक खिसा रिकामा!
 
मला हे अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठिकाणी नसेलसुध्दा पण बहुसंख्य ठिकाणी आहेच.....
 
त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरतो ? 
का नेहमी स्वत:चीच समजूत घालत बसतो ? 
आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे पण म्हणून का असे पैसे उडवायचे...?
 
त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक -एक पदार्थ करून आणून घराच्या हॉलमधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा...?
 
तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितीतरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर तो  जेमतेम 15-20 % होतो.....
 
बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते....
 
"रिलॅक्सेशन" हे कारण असते हॉटेलिंग करण्यामागे, पण वाटत नाही की प्रत्येक वेळेस ते साध्य होते....!
 
बघा हे तुम्हाला पटतंय का!
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय करा

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

पुढील लेख
Show comments