सकाळच्या घाईत किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी 'रवा इडली' हा सर्वात उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ आहे.मऊ आणि लुसलुशीत इडली १० ते १५ मिनिटांत तयार करू शकता.
साहित्य-
बारीक रवा १ कप
दही (ताजे)१/२ कप
पाणीगरजेनुसार
इनो किंवा खाण्याचा सोडा१ छोटा चमचा
मीठचवीनुसार
तेल१ मोठा चमचा
फोडणीसाठीमोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची
कृती-
सर्वात आधी एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात रवा २-३ मिनिटे हलका भाजून घ्या. आता एका बाऊलमध्ये भाजलेला रवा, दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम स्वरूपाचे बॅटर तयार करा. आता हे मिश्रण ५ मिनिटे झाकून ठेवा म्हणजे रवा छान फुलेल. ५ मिनिटांनंतर मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी नीट करून घ्या.
आता एका लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून फोडणी तयार करा. ही फोडणी पिठात घालून व्यवस्थित मिक्स करा. इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा आणि इडलीच्या साच्यांना तेल लावून घ्या. आता पिठात इनो किंवा सोडा घाला आणि त्यावर १ चमचा पाणी टाकून हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करा. आता तयार पीठ लगेच साच्यांमध्ये भरा आणि १०-१२ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.
काही खास टिप्स-
दही जास्त आंबट नसावे. दही ताजे असेल तर इडलीला चव छान येते. जर तुम्हाला इडली अधिक पौष्टिक हवी असेल, तर पिठात किसलेलं गाजर किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. इडली पात्रातून काढण्यापूर्वी २ मिनिटे थंड होऊ द्या, म्हणजे ती साच्याला चिकटणार नाही. तर चला तयार आहे आपली रवा इडली रेसिपी, नारळाची चटणी किंवा सांबारसोबत गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik