Varanasi news: यूपीच्या वाराणसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका गॅस एजन्सीतून 147 सिलिंडर गायब झाले असून ते गायब करणारे गुन्हेगारही फरार झाले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण वाराणसी जिल्ह्यातील मिर्झामुराद पोलीस स्टेशन हद्दीतील छतेरी गावचे आहे. येथे गॅस सिलिंडर एजन्सीमधून 147 गॅस सिलिंडर घेऊन चोरट्यांनी पलायन केले होते. एका पोलीस अधिकारींनी रविवारी याला दुजोरा दिला असून ही घटना दरोडा की चोरीची आहे याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघात घडलेल्या या घटनेवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे, जो निषेधार्ह आहे.
तसेच गोमती झोनचे पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, मिर्झामुराद पोलिस स्टेशन हद्दीतील छतेरी गावात असलेल्या गॅस सिलिंडर एजन्सीमधून शनिवारी रात्री 147 गॅस सिलिंडर चोरट्यांनी पळवून नेले. हा दरोडा आहे की चोरी याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.