Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणूक निकाल : 'हे' साडेसात मुख्यमंत्री झाले पराभूत

Webdunia
गुरूवार, 10 मार्च 2022 (22:07 IST)
पाच राज्यांच्या निवडणुकांनी साडेसात मुख्यमंत्र्यांना आस्मान दाखवलंय. पंजाब आणि उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री, इतर 5 माजी मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री ही निवडणूक हरले. कोण आहेत हे?
 
1. चरणजित सिंग चन्नी
निवडणुका होण्यापूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसच्या समस्या कमी नव्हत्या. सरकारच्या अगदी शेवटच्या काळात आलेले चरणजित सिंग चन्नी या निवडणुकीत दोन जागांवर लढले, भदौर आणि चमकौर साहिब आणि दोन्ही जागांवर पराभूत झाले.

चमकौर साहिब जागेवर मुख्यमंत्री चन्नी यांच्याविरुद्ध आम आदमी पक्षाने डॉ. चरणजित सिंह चन्नी नावाचेच उमेदवार दिले होते. त्यांचा 6 हजारांच्या फरकाने विजय झाला. तर भदौरमध्ये आपच्याच लाभ सिंह उगोके यांनी 36 हजार मतांनी चन्नींचा पराभव केला.
 
2. प्रकाश सिंह बादल
शिरोमणी अकाली दलाचे veteran आणि आजवर पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल यांचा लांबी मतदारसंघातून आपच्या गुरमीत सिंह खुड्डियां यांनी 11,396 मतांनी पराभव केलाय.
लांबीचा मतदारसंघ बादल परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत अकाली दलाने 94 वर्षांच्या बादल यांना पुन्हा निवडणुकीत उतरवलं तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण आपच्या धडाक्यात बादलही आपली जागा राखू शकले नाहीत.
 
3. अमरिंदर सिंग
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये जोरदार नाट्य घडलं. पाच वर्षं सतत खदखदत असलेल्या अमरिंदर विरुद्ध सिद्धू संघर्षात अखेर काँग्रेस पक्षाने अमरिंदर यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि सिद्धूंना राखलं.
अमरिंदर यांनी निवडणुकीपूर्वी पंजाब लोक काँग्रेस नावाचा पक्ष काढत स्वतःची वेगळी चूल मांडली. त्यांनी भाजपशीही जवळीक केली. पण आजवर दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या कॅप्टन अमरिंदर यांना पटियालाच्या आपल्या पारंपरिक गडात पराभव पत्करावा लागला.
 
4. राजिंदर कौर भट्टल
पंजाबच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांचा मालवा प्रांतातल्या लहरा मतदारसंघात आपच्या उमेदवारानेच पराभव केला. बरिंदर कुमार गोयल वकील यांनी भट्टल यांचा पराभव केला. राजिंदर या आजवरच्या पंजाबच्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत.
 
5. पुष्कर सिंह धामी
उत्तराखंडमध्ये भाजपने 2017 पासून निवडणुका होईपर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री बदलले. अलिकडेच मुख्यमंत्रिपदावर बसलेले पुष्कर सिंह धामी यांचा खटिमा मतदारसंघात काँग्रेसच्या भुवन चंद्र कापरी यांनी पराभव केला.
8 हजारांच्या फरकाने धामी यांचा पराभव झाला. धामींचा पराभव झाला पण भाजपने मात्र उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
 
6. हरिश रावत
पुष्कर सिंह धामी यांच्यासारखंच हरिश रावत यांच्या नावापुढेही माजी मुख्यमंत्री इतकंच लिहीलं जाईल. हरिश रावत यांचा लालकुवा मतदारसंघातून पराभव झाला. भाजपच्या मोहन बिश्त यांनी रावत यांचा 14 हजार मतांनी पराभव केला.
10 मार्चच्या सकाळी माध्यमांशी बोलताना रावत यांनी काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवेल, असं म्हटलं होतं. पण आपला आणि पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना उद्विग्न रावत म्हणाले, "इतकी महागाई असतानाही लोक भाजप झिंदाबाद कसं म्हणतायत हे मला कळत नाही."
 
7. चर्चिल आलेमाओ
गोव्यात या निवडणुकीत आपने खातं उघडलं आणि ते सुद्धा एका माजी मुख्यमंत्र्याला हरवत. आपचे उमेदवार वेंझी वेगास यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या चर्चिल आलेमाओ यांना हरवलं.
1271 मतांचा फरकाने वेगास जिंकले. यापूर्वी आलेमाओ यांनी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आत-बाहेर करून झालंय.
 
साडेसातवे मुख्यमंत्री कोण?
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री, शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि प्रकाश सिंह बादल यांचे चिरंजीव सुखबीर बादल यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.
प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री असताना सुखबीर बादल त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments