Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरात विद्यापीठात नमाज पठण करणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला, म्हणाले-शिक्षण कसं पूर्ण करणार?

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2024 (14:14 IST)
"आम्हाला खूप भीती वाटत आहे. आमचं पुढच शिक्षण कसं पूर्ण होणार हा विचार आमच्या मनात सुरू आहे?"एका विदेशी विद्यार्थ्यानं बीबीसी प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांच्याशी बोलताना अशाप्रकारे चिंता व्यक्त केली.शनिवारी (16 मार्च) रात्री गुजरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये नमाज पठणाच्या तथाकथित मुद्द्यावरून विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. त्यानंतर सध्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.युनिव्हर्सिटी हॉस्टेलच्या 'ए' ब्लॉकमध्ये अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, आफ्रिका आणि इतर देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांवर 25 जणांच्या समूहानं शनिवारी रात्री हल्ला केला. त्यात दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात न्यावं लागलं.
 
एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी आणि गुजरात काँग्रेसचे नेते ग्यासुदीन शेख यांनी या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात सरकारच्या संपर्कात असून या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
 
आधीही गैरवर्तन झाल्याचा आरोप
बीबीसी गुजरातीची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा हॉस्टेल ब्लॉकमध्ये सगळीकडं पोलिस आणि विद्यापीठाचे अधिकारी दिसत होते.त्याशिवाय घटनास्थळी आम्हाला दगड पडलेले दिसून आले. अनेक गाड्यांची तोडफोड झालेली होती. त्यामुळं दगडफेकीचे संकेतही मिळत होते. हॉस्टेलचे विद्यार्थीही घाबरलेले आणि उदास होते.अफगाणिस्तानातून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक नोमान यानं याबाबत बीबीसीबरोबर चर्चा केली."आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता इथं राहणं कठीण ठरत आहे. हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे. लोक याठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं कसे आले याची चौकशी व्हायला हवी. इथं नेहमी लोक येतात आणि 'जय श्रीराम म्हणा, नाहीतर चाकू मारू' अशी धमकी देतात. आधीही अशा घटना घडल्या आहेत. बाहेरच्या देशातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हे अत्यंत धोकादायक आहे."अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पण अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
 
या प्रकरणी एका व्यक्तीची ओळख पटली असून लवकरच त्या व्यक्तीला अटक होईल, असं पोलिसांनी सांगितलं.शनिवारी रात्री सोशल मीडियावर काही व्हीडिओ समोर आले. ते या घटनेचे असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात हल्लेखोर जमावाकडून विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
व्हिडिओमध्ये हल्लेखोर धार्मिक घोषणा देतानाही दिसत आहेत.
 
कुलगुरू म्हणाले-दोन गटांतील जुना वाद
काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला आणि माजी आमदार ग्यासुद्दीन शेखही घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णालयात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची भेटही घेतली.
या दोन्ही नेत्यांनी घटनेचा निषेध केला आहे. तसंच गुजरात पोलिस आणि सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.माजी आमदार ग्यासुद्दीन शेख यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट केली.
 
"मी आणि आमदार इम्रान खेडावाला लोकशाही धर्मनिरपेक्ष भारतात, वसुधैव कुटुंबकमची घोषणा देणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात, गुजरात विद्यापीठातील मुस्लिम विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी करतो." मात्र, गुजरात युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू नीरजा गुप्ता यांनी हे प्रकरण, "दोन गटांतील आधीपासून असलेल्या मतभेदाचं असल्याचं सांगितलं.""दोन्ही गटांत आधीपासूनच मतभेद होते. नंतर ही घटना समोर आली. हे नेमकं का घडलं हा चौकशीचा विषय आहे.""काही विद्यार्थी हॉस्टेलबाहेर नमाज पठण करत होते तेव्हा त्यांचा जमावाशी वाद झाल्याचं समोर आलं. युनिव्हर्सिटीनं प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. तसंच पोलिसांनी रात्रीच एफआयआर दाखल करून घेतला आहे," असंही त्यांनी म्हटलं.
 
पोलीस काय म्हणतात?
स्थानिक माध्यमांमधील बातम्यांनुसार राज्य सरकारच्या गृह विभागानं या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आहे. मात्र, त्याची पुष्टी होऊ शकत नाही.रविवारी (17 मार्च) संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर अहमदाबाद शहर पोलिस आयुक्त जी. एस मलिकही घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी माध्यमांना या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली.
 
"या हॉस्टेलमध्ये जवळपास 75 विद्यार्थी राहतात. रात्री हॉस्टेलच्या इमारतीच्या बाहेर काही विद्यार्थी नमाज पठण करत होते. त्याचवेळी काही लोक आले आणि इथं नमाज का करत आहात? असं त्यांनी विचारलं."त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि नंतर मारहाण आणि संघर्ष झाल्याचं पोलिस आयुक्त म्हणाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री 10.51 मिनिटांनी एक मेसेज मिळाला होता. त्यानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा रक्षकानं याबाबत तक्रार केली होती. घटनास्थळी 25 लोकांनी दगडफेक केली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
 
"आम्ही याप्रकरणी 20-25 लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आमची पथकं सध्या तपास करत आहेत," असं पोलिस आयुक्त म्हणाले. "यात सहभागी असणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहआयुक्त यांच्या देखरेखीत होईल."दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल असून त्यापैकी एक श्रीलंकेतील आणि एक ताझकिस्तानातील असल्याचं मलिक म्हणाले.
 
ओवेसींचे, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना प्रश्न
फॅक्ट चेकिंग न्यूज वेबसाईट ऑल्ट न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद झुबेर यांनी या घटनेचा (दावा असलेला) व्हायरल झालेला व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे.
तसंच एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही याप्रकरणी टीका केली आहे. हा प्रकार लोकांना सामूहिकरित्या कट्टर बनवण्याचा नाही तर दुसरं काय आहे? असा प्रश्न त्यांनी एक्सवर उपस्थित केला."मुस्लीम शांततेच्या मार्गानं त्यांच्या धर्माचं पालन करत असताना तुमची आस्था आणि धार्मिक घोषणा बाहेर येतात हे किती लज्जास्पद आहे? मुस्लीम दिसताच तुम्हाला प्रचंड राग येतो. हे सार्वजनिकरित्या कट्टर बनवणं नाही तर दुसरं काय आहे? हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचं राज्य आहे. ते कठोर संदेश देण्यासाठी हस्तक्षेप करणार का? मला तर काहीच आशा नाही," अशी पोस्ट त्यांनी केली.
 
परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुजरात युनिव्हर्सिटीतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबरोबर नमाजवरून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी वक्तव्य केलं आहे."अहमदाबादेत गुजरात युनिव्हर्सिटीत हिंसाचाराची घटना घडली. राज्य सरकार दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. यात दोन विदेशी विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाला रुग्णालयातून सुटी मिळाली आहे," असं त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं. परराष्ट्र मंत्रालय गुजरात सरकारच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments