Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रयान-3 : विक्रम लँडरची चंद्रावर टुणकन उडी, इस्रोचा हा प्रयोग का महत्त्वाचा?

Webdunia
सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (15:13 IST)
चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरनं पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट लँडिंग' केल्याचं भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रोनं सोमवारी (4 सप्टेंबर 2023) जाहीर केलं आहे. यालाच 'हॉप एक्सपेरिमेंट' म्हणजे प्रयोग असं म्हणता येईल.
 
विक्रमनं या मोहिमेतली सर्व उद्दिष्टे पूर्ण केल्यावर हा प्रयोग करण्यात आला. याआधी प्रज्ञान रोव्हरनंही त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली असल्याचं इस्रोनं म्हटलं होतं.
 
23 सप्टेंबरला चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग केल्यानंतर या मोहिमेचा चंद्राच्या भूमीवर 14 दिवसांचा नियोजित टप्पा आता हळूहळू संपत आला आहे.
 
विक्रम, प्रज्ञान आणि चंद्रयान-3 च्या प्रपल्शन मोड्यूलनं आतापर्यंत चंद्रावर कोणते प्रयोग केले आणि निरीक्षणं नोंदवली, जाणून घेऊया.
 
चंद्रावर विक्रमची 'उडी'
उडी मारण्याच्या प्रयोगादरम्यान विक्रम लँडरचे इंजिन सुरू करण्यात आले. त्यानंतर हे यान हवेत सुमारे 40 सेमी उंच उडालं आणि त्यानं साधारण 30-40 सेमी अंतरावर पुन्हा लँडिंग केलं.
 
हा प्रयोग आगामी चांद्र मोहिमांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.
 
भविष्यात चंद्रावरचे नमुने घेऊन यान पृथ्वीवर आणायचं असेल किंवा अंतराळवीरांना पुन्हा माघारी आणायचं असेल तर चंद्राच्या पृष्ठभागावरून परत उड्डाण करण्याची क्षमता आपल्या यानात असल्याचं इस्रोनं दाखवून दिलं आहे.
 
या प्रयोगानंतरही विक्रम लँडरवरची सर्व उपकरणं व्यवस्थित काम करत आहेत.
 
उडी मारण्याआधी विक्रमवरची ChaSTE (चेस्ट) आणि ILSA (इल्सा) ही उपकरणं बंद करण्यात तसंच प्रग्यानला बाहेर काढणारा रँप गुंडाळण्यात आला.
 
विक्रमनं पुन्हा सॉफ्ट लँडिंग केल्यावर रँप आणि ही उपकरणं पुन्हा सुरु करण्यात आली.
 
प्रज्ञान ‘स्लीप मोड’वर
प्रज्ञान रोव्हरवर सोपवलेली कामं पूर्ण झाली असून हे यान सुरक्षित जागी थांबवण्यात आल्याचं इस्रोनं 2 सप्टेंबरला जाहीर केलं आहे.
 
प्रज्ञानची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यात आली असून, त्याला आता ‘स्लीप मोड’वर टाकण्यात आलं आहे. म्हणजे या रोव्हरवरची इलेक्ट्रॉनिक आणि वैज्ञानिक उपकरणं बंद करण्यात आली आहेत.
 
प्रज्ञान रोव्हरवरची अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) ही उपकरणं बंद करण्यात आली आहेत.
 
प्रज्ञानवरचं सोलर पॅनेल अशा दिशेनं वळवण्यात आलं आहे जेणेकरून चंद्रावर पुन्हा सूर्योदय होईल, तेव्हा तो प्रकाश पॅनेलवर पडेल. त्याचे रीसीव्हर सुरू ठेवण्यात आले आहेत.
 
22 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रावर पुन्हा सूर्योदय होईल तेव्हा प्रज्ञान जागा होण्याची आशा इस्रोचे वैज्ञानिक करत आहेत. हे अशक्य नसलं तरी कठीण मात्र आहे.
 
प्रज्ञान या 14 दिवसांच्या शीतनिद्रेतून जागा झाला नाही, तर तो भारताचा कायमस्वरूपी दूत म्हणून चांद्रभूमीवर राहील, असं इस्रोनं म्हटलं आहे.
 
प्रज्ञान रोव्हरची 'सेंचुरी'
प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावर 100 मीटरचं अंतर कापल्याचं इस्रोनं 2 सप्टेंबरला जाहीर केलं.
 
या 100 मीटरच्या प्रवासातच प्रज्ञाननं अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत.
'शिवशक्ती पॉइंट'वर विक्रम लँडर उतरल्यापासून आसपासच्या प्रदेशात कुठवर प्रज्ञाननं संचार केला, हे दाखवणारा फोटो इस्रोनं पोस्ट केला आहे.
 
त्याआधी विक्रम लँडरवरच्या कॅमेऱ्यानं टिपलेला व्हिडियो इस्रोनं प्रसारीत केला होता. त्यात प्रज्ञान सुरक्षित मार्गावर वळत असतानाचं दृश्य टिपलं गेलं होतं.
 
‘हे म्हणजे जणू एक बाळ चंदामामाच्या अंगणात बागडतंय आणि त्याच्याकडे आई कौतुकानं पाहते आहे, नाही का?’ असं इस्रोनं हा व्हिडियो पोस्ट करताना म्हटलं होतं.
विक्रमनं चंद्रावर नोंदवला 'भूकंप'?
विक्रम लँडरवरचं इन्स्ट्रूमेंट फॉर ल्युनर सेस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी अर्थात ILSA (इल्सा) हे उपकरण भूकंपाची नोंद करू शकतं.
 
या उपकरणानं चंद्रावर प्रज्ञान रोव्हर आणि इतर उपकरणांच्या हालचालींची नोंद केली आहे. पण या उपकरणानं 26 ऑगस्ट 2023 रोजी कंपनांची नोंद झाली आहे, ज्यामागचं कारण नैसर्गिक असण्याची शक्यता आहे.
 
विक्रम लँडरवरच्या 'रंभा' (रेडियो अ‍ॅनाटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अ‍ॅटमॉस्फियर - लँगमुईर प्रोब) या उपकरणानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची पाहणीही केली.
 
प्राथमिक मोजणीनुसार चंद्राच्या या भागात प्लाझ्माचं प्रमाण तुरळक आहे. हे निरीक्षण भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठीही महत्त्वाचं आहे, कारण प्लाझ्मामुळे सॅेलाईटशी रेडियो संपर्क साधण्यात अडथळा येऊ शकतो.
 
प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर कोणते पदार्थ सापडले?
चंद्रयान-3 मोहिमेनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सल्फरचं अस्तित्व असल्याचा पहिला थेट पुरावा मिळवला आहे.
 
प्रज्ञान रोव्हरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन अशा मूलद्रव्यांची नोंद केली आहे.
 
इस्रोने मंगळवारी (29 ऑगस्ट 2023)ला ही माहिती दिली, “सुरुवातीच्या परीक्षणात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अल्युमिनिअम, सल्फर, कॅल्शिअम, आयर्न, क्रोमिअम, टायटेनियम, मॅंगनीझ, सिलिकॉन आणि ऑक्सिजन सापडलं आहे.”
 
इथे हायड्रोजनच्या उपलब्धतेबाबत पडताळणी सुरू आहे.
 
प्रज्ञान रोव्हरवरच्या लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अर्थात LIBS (लिब्ज) या उपकरणाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. हे उपकरण एखाद्या पृष्ठभागावर लेकराचं मारा करून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट (स्पेक्ट्रम) तपासतं आणि त्यातून त्या ग्राहावर कोणती खनिजे आहेत यांचा अंदाज येतो.
 
त्याआधी चंद्रावर भारताने पाठवलेल्या प्रज्ञान रोवर पृथ्वीवर राहणाऱ्यांसाठी एक संदेश पाठवला आहे. तो आणि त्याचा मित्र विक्रम (लँडर) दोघंही एकदम बरे असल्याचा संदेश त्यांनी पाठवला आहे.
 
प्रज्ञान रोव्हर थोडक्यात बचावला!
27 ऑगस्ट 2023 रोजी प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात तीन मीटर अंतरावर एक विवर असल्याचं दिसून आलं. या विवराचा व्यास साधारण 4 मीटर होता.
 
त्यानंतर रोव्हरला माघारी फिरण्याची आज्ञा देण्यात आली. आता तो नव्या वाटेवर मार्गक्रमण करत आहे, अशी माहिती इस्रोनं दिली आहे.
इथे डावीकडच्या फोटोत प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात आलेलं विवर दिसत असून, प्रज्ञान मागे फिरल्यावर उमटलेले चाकांचे ठसे उजवीकडे दिसत आहेत.
 
चंद्रावर सूर्यास्त होण्यापूर्वी तिथल्या पृष्ठभागाच्या जास्तीत जास्त भागात प्रवास करण्याचं काम प्रज्ञानला
 
पार पाडायचं आहे.
 
विक्रम लॅंडरने नोंदवले पहिले निरीक्षण
चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर तापमानाविषयी पहिलं वैज्ञानिक निरीक्षण नोंदवलं.
 
27 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोनं त्याविषयी माहिती दिली.
 
विक्रम लॅंडरवरील ‘चंद्राज सर्फेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट’ अर्थात ChaSTE (चेस्ट) या उपकरणाने इथल्या मातीचं तापमान मोजलं. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 सेमी वर पोहोचून तापमान नोंदवण्याची क्षमता या उपकरणात आहे.
ChaSTE नं पाठवेलल्या माहितीनासर चंद्राच्या मातीत 1 सेंटीमीटर खाली तापमान 50 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असून मातीमध्ये केवळ 8 सेंटीमीटर खाली तापमान -10 अंश सेल्सियस आहे.
 
म्हणजे केवळ 8 सेंटीमीटरमध्येच तापमानात साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त फरक दिसून येतो आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशातले हे अशा प्रकारचे पहिलेच निरीक्षण आहे.
 
इस्रोचे वैज्ञानिक बीएचएम दारुकेशा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, “पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दोन-तीन सेंटीमीटरवर गेलं, तर तापमानात जेमतेम दोन तीन अंशांचा फरक पडतो. पण चंद्रावर हा फरक 50 अंशांपेक्षा जास्त आहे. हे खूप लक्षणीय आहे.”
 
पुढच्या दहा दिवसांत हे उपकरण तापमानात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवेल.
 
प्रज्ञान रोव्हरचा शिवशक्ती पॉइंटवर संचार
विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यावर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला.
 
त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावरच्या ‘शिवशक्ती’ पॉइंटवर संचार करत असल्याचा व्हिडियो इस्रोनं प्रसारीत केला आणि चंद्रयान-3 मोहिमेचं दुसरं उद्दीष्टं पूर्ण झाल्याचं जाहीर केलं.
 
चंद्रयान-3 मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, रोव्हर फिरवणं आणि वैज्ञानिक प्रयोगांची उद्दिष्टे इस्रोनं समोर ठेवली आहेत.
 
पृथ्वीबाहेर एखाद्या ग्रह किंवा उपग्रहाच्या पृष्ठभागावर असा रोव्हर फिरवण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ आहे. तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात नियंत्रित संचार करणारं हे पहिलंच यान ठरलं आहे.
 
चंद्रावरचा पहिला फोटो
चंद्रयान-3 चा विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरला, त्यानंतर लँडिंग इमेजर कॅमेऱ्यानं हा फोटो टिपला.
 
यात चंद्रयान-3 ची लँडिंग साईट म्हणजे विक्रम जिथे उतरला ती जागा दिसते, तसंच विक्रमचा एक पाय आणि पायाची सावलीही दिसते आहे.
 
चंद्राचा दक्षिण ध्रुवीय प्रदेश तसा खडबडीत आणि विवरांनी भरलेला आहे. पण विक्रम लँडरनं उतरण्यासाठी तुलनेनं सपाट जागा निवडल्याचं दिसतं.
 
चंद्रावर सुरक्षितपणे लँडिंग करण्याचं चंद्रयान-3 मोहिमेचं पहिलं उद्दीष्ट पूर्ण झाल्याचं हा फोटो दर्शवतो.
 
प्रपल्शन मोड्यूलचाही संशोधनात वाटा
चंद्रयान-3 चा विक्रम लँडर प्रपल्शन मोड्यूलपासून 17 ऑगस्टला वेगळा झाला.
 
पण प्रपल्शन मोड्यूल पुढचे काही महिने किंवा कदाचित काही वर्ष चंद्राभोवती कक्षेत फिरत राहणार आहे.
 
हे यानही महत्त्वाची माहिती गोळा करतंय. या यानावर स्पेक्ट्रो-पोलॅरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ म्हणजेच SHAPE हे उपकरण बसवण्यात आलं आहे.
 
हे SHAPE उपकरण पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवेल. त्याची तुलना सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या अशाच प्रकारे घेतलेल्या निरीक्षणांशी करता येईल.
 
त्यातून पृथ्वीसारख्या जीवन असलेल्या ग्रहांचा शोध घेण्यात मदत होऊ शकते.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments